भागीरथीबाई - अभंग संग्रह ५१ ते ६०

श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .


पद ५१

चाल -जन्मा येऊनि केलेस०

चारी वर्णाचे आम्ही गुरु । आम्हां नाही कर्माऽचारु ॥ध्रृ०॥

ब्रह्म जाणुनी घेतले आम्ही । वेद पुराणांची पोत खोलूं ॥१॥

उपनिषद -शास्त्रे आम्ही त्यागूं । स्वस्वरुप निश्चय करुन देऊं ॥२॥

श्रुतिस्मृतीसी मौन्यचि ठेवूं । उन्मनीचे स्थीती नेऊं ॥३॥

म्हणे भागीरथी अहो जीवा । चैतन्य स्वरुप करुन ठेवूं ॥४॥

पद ५२

चाल -अवघा तूंचि हरि०

आतां तूं नाही तूं नाही ॥ अवघाऽमीऽऽच पाही ॥ध्रृ०॥

सद्गुरुनाथ भोळा । मीतूंपणाचा केला गोळा ॥१॥

चंद्र सूर्य तारा । अवघा मीच भरला सारा ॥२॥

वेद शास्त्र पुराणां । मीच विस्तार केला जाणा ॥३॥

मी मी म्हणतां विस्तार झाला । व्यष्टि समेष्टी गुंतुनि पडला ॥४॥

बलभीम राणा ठरला । भागीरथिभाव ’ मी ’ मधे गेला ॥५॥

पद ५३

चाल -सुदिन उगवला०

धन्य जाहले , आजी संत पाहिले ॥

आजी सद्गुरु भेटले ॥ध्रृ०॥

त्रिविध ताप गेले । मन उल्हासले ॥

चित्तवृत्तीसि निरोधिले ॥१॥

बोध प्रबोध ऐकिले । निजबोध नयनिं दाविले ॥

त्वम ततपद ऐक्य केले ॥२॥

जीव शीव नांव उडविले । असिपदासि मेळविले ॥

कैवल्यपदी बसवीले ॥३॥

बलभीमराये ऐसे केले । अन्वय व्यतिरेक पूर्ण दाविले ॥

भागिरथीस निजानंदि बसविले ॥४॥

पद ५४

चाल -अहंमेला मरुन०

अहं मेली मरुनी गेली वाया ॥

बुद्धि मुंडुनि बसवीली एके ठाया ॥ध्रृ०॥

संध्यापत्र हातीचे सोडिले ॥

त्रीसुताचे जानवे तोडिले ॥१॥
त्रिकाळीची सध्यां म्यां सोडिली ॥

मीतूंपणाची शेंडी काढीली ॥२॥

ऐसे सख्य बलभीमाचे ॥

दास्य भागीरथी करी त्यांचे ॥३॥

पद ५५

चाल -अवघड मोठा मोठा गड०

बनारस चोळी , चोळिग जरतारी ।

लेवविली प्रेमे बहु भारी ॥ध्रृ०॥

चौदेहाची , देहाची घडी बनवी ।

अस्ति भाति रुप हळद लावी ।

चिदानंद कुंकू , भाळि शोभे चीरी ॥१॥

नवलक्ष पातळ , नेसुनि मी सजले ।

नामरुप पाटावर बसले ।

चोळिची अजब , अजब कारागिरी ॥२॥
निजबोधाचे बांधोनि मंगळसूत्र ।

गळसरी मुहूर्त मणि हार ।

पीत कंकण बांधुनिया करी ॥३॥

चारि पुरुषार्थ , करुनि जोडवे ।

विरोद्यासहित सदा नवे ।

हिरवी कांकणे , हाति नागमोडी ॥४॥

नाकी नथ , नथ सर्जेदार ।

ब्रह्मानंदि करुनि ठेविले स्थीर ।

उजळली प्रभा , स्वरुपसागरी ॥५॥

बलभीम सद्गुरु , सदुगुरु कलाधारे।

लेवविले सौभाग्य परोपरी ।

भागिरथी म्हणे , प्रेमे बाळुताई ।

दोघे खेळू एके ठायी ॥६॥

पद ५६

चाल -राम स्मरावा राम०

माया असे अनिवार , प्रभु तुझी ॥ध्रृ०॥

मायबाप पुत्र भ्रतार । यांतचि गुंतले फार , सदोदित ॥१॥

वर्णाश्रम गृह धनहि मानिले ।

कर्माचा अभिमान , सदोदित ॥२॥

चित्त मन चंचल निशिदिनि असतां ॥

चरणिं न राहे भाव , सदोदित ॥३॥

भागिरथीही प्रार्थितसे तुज ।

बलभीमचरणी राहो सदोदित ॥४॥

अभंग ५७

येग येग विठाबाई । पांडुरंगे माझे आई ॥१॥

गाई वत्स घेउनि येई । प्रेमपान्हा मज देई ॥२॥

उपमन्यूसि सागर दिधला । मज काय दूर केला ॥३॥
बलभीमा माझे आई । भागिरथीसी हृदयी घेई ॥४॥

पद ५८

चाल -बिघडले मी सुधरते०

बिघडले मी सुधरते कैची ॥ साक्ष देते श्रृतिस्मृतीची ॥ध्रृ०॥

नाही मायबाप मजसी । कुटुंब न कबिला मजशी ॥१॥

ग्वाही देते आपुल्या मनाची ॥१॥

दुकान घातले कलावंतिणीचे । सुरती वाजवुनि देते ॥

आला गेला भोगी " मी " शी ॥२॥

भिक्षा मागते घरोघरी । राहते मी सद्गुरुद्वारी ॥३॥

नाही घर -दार मजशी । लागुं नका माझ्या संगतिशी ॥

तुमची ही गती होईल मजऐशी ॥४॥

शास्त्रपुराणे मज नको ती । उपनिषदे भाष्ये तेवी ॥

वेद लागती पायापाशी ॥५॥

बलभीम बालक बोले । गोविंद कांत पाहे ॥

भागिरथीही निरंजनी राही ॥६॥

पद ५९

चाल -निःसंग मुरली झाले०

अहो या ख्यालीचे घर रीघाले ।

ख्याल पाहून आनंदले ॥ध्रृ०॥

चार तत्त्वांचा करुनी महाल ।

शून्याचे छत दिधले ॥१॥

चंद्रसूर्यप्रकाश त्यांमधे ।

चांदण्याचे प्याले लाविले ॥२॥
वनस्पतीचा बाग लाविला ।

नरतनूचे फूल लागले ॥३॥

गंगादि नद्या रक्तवाहिन्या ।

विचारांचे फोये उडाले ॥४॥
बलभीमअंकी शेज करुनी ।

ठकु निरंजनी लोळे ॥५॥

पद ६०

चाल -श्रीमंत पतीची राणी .

तुझी माझी एकचि राशी ।

म्हणुनिया प्रेम घालिसी ॥ध्रृ०॥

त्वंपद अस्ति भाति प्रीय । तत्पद सच्चिदानंद ॥

मिळणी पाहतां एकचि रुप । जाहले रुप अपरुपशी ॥१॥

त्वंपद हा अर्धा चंद्र । ततपद हा अर्था चंद्र ॥

दोहोंचि मिळणी पाहता । उदय पूर्ण चंद्रासी ॥२॥

त्वंपद ततपद मिळुनी । असिपद आकाश पूर्ण ॥

तीहींची मिळणी होतां । पाहि एका कर्दमासी ॥३॥

बलभीमचरणी लीन । दास ठकू बाळ तान्हा ॥

विनविते होऊनि दीन । माय पाजी आनंदपान्ह्यासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP