अभंग १०१
चैतन्य साक्षी असे ते पवित्र ।
अपवित्राची वार्ता नसे तेथे ॥१॥
ऐसे हे अक्षर परेहूनी पर ।
सदैव उन्मन असे तेथे ॥२॥
ऐसे ब्राह्मण जाणोनि घालितां जानवे ।
त्वं तत असिपदी गांठ देऊं ॥३॥
चिदानंद मिळणी मिळोनीया दोरा ।
जगामध्ये फिरवा सारिखाची ॥४॥
ठकु म्हणे गणिका गणती करुं नका
परमात्मस्वरुपाशी पार नाही ॥५॥
अभंग १०२
गणतीमध्ये आले वायां तेंचि गेले ।
परमात्मा त्यासी म्हणो नये ॥१॥
परमात्मा जाण अखंड अभेद ।
आहे ठेलंठेल व्यापकत्वे ॥२॥
ब्रह्म हे निश्चळ आणि निराकार ।
त्यासी जाणुनी घेतां ब्राह्मण होय ॥३॥
जाणिवेची जाणीव होणे हेंचि मौजीबंधन ।
विप्र द्वीज जाणा पाठांतरी ॥४॥
झाले मौंजीबंधन गेला देहाभिमान ।
चारी वर्ण भेद स्वरुपी नाही ॥५॥
अनुभवी याचा जाणती अनुभव ।
शास्त्रवेदाध्ययने गमेची ना ॥६॥
ठकु म्हणे आम्ही ऐसियासी वरुं ।
पाहूनियां घेऊं अंतःकरणी ॥७॥
अभंग १०३
ब्राह्मणाची पत्नी म्हणती अर्धांगी ।
पूर्ण आंगे जगी क्रीया करी ॥१॥
प्रत्यक्ष पाहूं जातां अर्धे आंग न दिसे ।
मिरवितसे स्पष्ट सर्व देही ॥२॥
स्थूल देही पत्नी अर्धे आंग नसे ।
पुरुषा आंगी अधी चिदसत्ता ॥३॥
स्थूल ऐशी पत्नी कोणती असावी ।
कैसी जाणुनि घ्यावी कोणे रीती ॥४॥
प्रकृतिपुरुषाचा जोडा निर्मियेला ।
विभागोन झाला कोण्या रीती ॥५॥
ठकू म्हणे मुक्ते आत्मयासी वरुं ।
अखंड सौभाग्ये वैधव्य नसे ॥६॥
पद १०४
ठकु म्हणे ब्राह्मणपत्नीपणा पूर्ण ।
जाण तूं निर्गूण होउनि राहे ॥१॥
जनामाजी बोल दिसताती फोल ।
यासी कदा डोल देऊं नको ॥२॥
जगांतूनी निघतां घाली कासोटा ।
धरी घट्ट अंगुठ सद्गुरुचा ॥३॥
जयाचिये बोली साळू नको गळूं ।
बलभीमवचनी ठेवी दृढ विश्वास ॥४॥
भागिरथी जगी फजीता होवोनि ।
लागलीसे चरणी सद्गुरुच्या ॥५॥
अभंग १०५
जन्मोजन्मी तुझा होईन मी दास ।
ऐसी असे आस अंतरीची ॥१॥
तुझी कृपा मज झालीया वांचोनी ।
जगामाजी तोंड कसे दावूं ॥२॥
मज पासोनीया तुझे बोल घेती ।
नाश ते करीती जगामाजी ॥३॥
म्हणोनी तुझीया दयेचा पाझर ।
करी मजवर गुरुवर्या ॥४॥
भूतां दैवतांसी काम न हे सोपी ।
लांच ते मागती जगामाजी ॥५॥
बकरे कोंबडे बळी मागताती ।
लिंबे द्रव्य नारळ भेट घेती ॥६॥
तरी गुरुराया , तुझे बल देईं ।
सदैव चरणी भागिरथीही ॥७॥
अभंग १०६
गुरुराया तुझा ऐसा हा हुकूम ।
कर्म करुनी दावी जगामाजी ॥१॥
ऐसा भक्तापाठी लाविसी तूं लठ्ठा ।
नाम घेतां जगा दुःख वाटे ॥२॥
ब्रह्म म्हणता जना विटाळ तो होतो ।
तरी ब्रह्माचा आचार कैसा दावूं ॥३॥
पत्थर पूजनी त्यांसी प्रेमाचा उमाळा ।
ब्रह्माचा तिटकारा करीती ते ॥४॥
उपदेश देवा न करवे जगासी ।
तुझे स्वरुप भाव लावी माझा ॥५॥
बलभिमरायासी हेचि वीनवणी ।
तंव चरणी ठेवी भागिरथीसी ॥६॥
अभंग १०७
धन्य आजी दीन वसंतपंचमी ।
माघमासी जाणा येत असे ॥१॥
धन्य सद्गुरुनाथ वसंत हो आले ।
दैवते फुलली आनंदाने॥२॥
माघमासी मार्ग पुसतां हे फार ।
झाला तो दाविता स्वरुप हे ॥३॥
शास्त्र हे प्रचीती आत्म हे प्रचीती ।
गुरु हे प्रचीती महानुभव ॥४॥
महावाक्य ध्वनी वायू हा लागतां ।
झाला तत्त्व झाडा तये काळी ॥५॥
काडपिशा वैराग्याची पाने गळाली ।
बोध काळी झडती सर्व माया ॥६॥
बलभीमचरणी सागरची जाणा ।
ठकु मुक्ताफळ चाखितसे ॥७॥
अभंग १०८
नरतनू देह आम्रवृक्ष झाड ।
फुलले फार बोधप्रबोधाने ॥१॥
आम्रफळे जाणा लागलीसे थोर ।
कोकिळा मधुर बोलताती ॥२॥
या रे लहानथोर वृक्षाखाली बसूं ।
फळ चाखुनी पाहूं कडु गोड ॥३॥
बद्ध हे मुमुक्षु येउनी बसती ।
गोड म्हणुनी खाती आवडीने ॥४॥
साधक हे फार डोलूं हो लागती ।
सिद्ध ते बैसती दटूनीया ॥५॥
बलभीम बाळ करी जयजयकार ।
भागीरथी जाण निजानंदी ॥६॥
अभंग १०९
धनी म्हणावा तो कोण ।
निरसी अज्ञान ॥१॥
कुबेर म्हणावा तो कोण ।
जन्ममरण चुकवी जाण ॥२॥
प्रश्नोत्तरे समाधान । दावी ऐसा प्रत्यय जाण ॥३॥
देव म्हणावा तो कोण । अंधःकार निरसी दोन ॥४॥
पती म्हणावा तो कोण । करी पावन जीवां जाण ॥५॥
मालक म्हणावा तो कोण । दावी विठ्ठचरण ॥६॥
ऐसा बळिवंत असे जो कोण । त्याचे सेवेसी ठकू जाण ॥७॥
अभंग ११०
जे जे मानी गा भगवंत ।
त्यासी सांगे माझे हीत ॥१॥
करुनी दावा गे निश्चित ।
मनोभावे आपुले हीत ॥२॥
एक वेळ देहासी मरण ।
घडोघडी नका करुं स्मरण ॥३॥
ऐसे दाविले सद्गुरुनाथे ।
तेंचि धरी हृदया आंत ॥४॥
झुगारावे मानापमान ।
भक्तिभावे आचरण ॥५॥
बलभीमवचन सेवावे ।
भागीरथी लीन व्हावे ॥६॥