मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय २८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । भाद्रपदी संकष्टीचें महिमान । सांगितलेंत तुम्हीं प्रसन्न । आतां आश्विनीचें वृत्तान्त कथून । उपकृत मजसी करावें ॥१॥
ऐसें दशरथें प्रार्थिलें । तें वसिष्ठें मानिलें । वृत्त तें सारें सांगितलें । सर्वसिद्धिप्रदायक ॥२॥
पार्वती शंकर तप करिती । दिव्य वर्षे सहस्त्र व्रत आचरितो । गणेशासी तें प्रार्थितो । पुत्र जाहला तो तयांचा ॥३॥
त्यांच्या वीर्यापासून । जन्मला होता कार्तिकेय प्रसन्न । गणेशावरती तेवढा स्नेह न वाटून । पक्षपात जाहला ॥४॥
कार्तिकेय गणेशासी स्पर्धा करित । नित्य त्यासवें भांडत । माझ्यानंतर तुझा विवाह निश्चित । होईल ऐसें गणेशा म्हणे ॥५॥
ऐशी त्यांची स्पर्धा चालत । शिवपार्वती तें विचार करित । विवाह पुत्रांचा करण्या उद्यत । मानसीं चिन्ता तयांच्या ॥६॥
हा विघ्नेश्वर साक्षात । ब्रह्मरुप आहे संशयातील । झाला जरी क्षोभित । पदभ्रष्ट करील विशेषें ॥७॥
म्हणोनि जरी औरस पुत्राप्रत । सांगावें आपुलें हृद‌गत । तूं ज्येष्ठ असलासी तरी संकल्पित । तुजपूर्वी विवाह गणेशाचा ॥८॥
तरी तो सेनानी रागावेल । त्याचाच विवाह आधी शोभेल । म्हणोनि कपट करुनी निभावेल । प्रश्न हा अति कष्टप्रद ॥९॥
ऐसा विचार शिव पार्वती करिती । उभय पुत्रांस बोलाविती । पृथ्वीप्रदक्षिणा करोनि आम्हांप्रती । प्रथम पुत्र जो परतेल ॥१०॥
त्याचा विवाह प्रथम करीन । ऐसें ऐकता शिववचन । गणनाथा म्हणे रागावून । ज्येष्ठ मजला कां त्यागितां ॥११॥
स्थूल देह माझा असत । उंदीर वाहन वर्तत । पृथ्वीप्रदक्षिणा करणें नसत । शक्य मजला सदाशिवा ॥१२॥
ऐसें बोलून गणाधीश राहत । आपुल्या सदनीं निवांत । स्कंद झाला हर्षभरित । मोरावरी आरुढला ॥१३॥
वेगानें पृथ्वीप्रदक्षिणा करित । इकडे गणेश माया दाखवित । पार्वती शंकरांसी पूजित । प्रदक्षिणा घातली तयांसी ॥१४॥
तदनंतर म्हणे शंकरा । आता माझा विवाह करा । मातापित्यांची प्रदक्षिणा अवधारा । पृथ्वी प्रदक्षिणेसम ॥१५॥
ऐसें शास्त्र सांगत । ऐकून हा गणेशाचा तर्क कंपित । शंकर म्हणें बाळा त्वरित । करीन मी तुझा विवाह ॥१६॥
परी तूं क्रोधे नको करुं । विवाह मंगल तुझें करुं । तेव्हां एकान्तीं भेटता हरु । पार्वती विचारी मायेनें ॥१७॥
कार्तिकेयास सोडून । ढुंढीचा कां केलांत मान । तेव्हां तिजप्रती शंकर वचन । म्हणे ऐक शैलतनये ॥१८॥
हा गणेश जरी रागावेल । तरी सर्वस्व आपुलें हरील । म्हणोनि स्नेह सोडून आतां अचल । राख धर्म सनातन ॥१९॥
हा पुत्र नसे ब्रह्म साक्षात । आपुल्या घरीं जन्मला असत । ऐसें बोलून सतीप्रत । शंभूनें योजिला गणेशविवाह ॥२०॥
हृदयीं दुःख न ठेवित । गणेशाचें लग्न लावित । विवाह पूर्ण होतां येत । कार्तिकेय परतोनी ॥२१॥
तेव्हां विघ्नकर विघ्न करित । तेथें एक परम अद्‌भुत । नारद कार्तिकेयासी सांगत । अचानक प्रकट होऊन ॥२२॥
गणेशाचें विवाह कृत्य केलें । मातापित्यांनीं पूर्वींच भलें । तुज सेनानीस फसविलें । निंद्य कर्म हें केवढें ॥२३॥
म्हणोनी तूं न पहावें । मातापित्यांचे मुख वर्जावें । ऐसें सांगून कलह स्वभावें । नारदें कळ लाविली ॥२४॥
स्कंद निःश्वात सोडून । गेला श्रीशैलावरी क्रुद्धमन । पुत्राचा वृत्तान्त ऐकून । पार्वती शंकर शोध करिती ॥२५॥
शोध करीत शैल पर्वतीं जात । तेव्हां कार्तिकेय पळून जात । क्रौचन्ध्रीं जाऊन लपत । तें जाणतां विलाप करिती ॥२६॥
शोकसंविग्न त्यांचें चित्त । तेव्हां मुद्‌गल विपेंद्र तेथ येत । त्यास पाहून सत्कार करित । पूजिती त्यांस यथाविधि ॥२७॥
तो सुखासनीं बैसत । तेव्हां सांगती वृत्तान्त । स्कंदाची भेट आम्हांप्रत । होईल कोणत्या उपायें ॥२८॥
पार्वती शोकाकुल रडत । तेव्हां मुद्‌गल बोले हित । महाभागा शंभू तूं असत । साक्षात्‍ प्रभू सर्वज्ञ ॥२९॥
विद्यारुपा ही आद्या । सर्वार्थदायिनी शक्ति सर्वज्ञा । तथापि युक्ति एक सुसाध्या । सांगतों मी तुम्हांसी ॥३०॥
तुम्हांस द्विविध पुत्र प्राप्त । जैसें कथिलें शास्त्रांत । तुजसम जगीं नसत । अन्य कोणी दैववन ॥३१॥
योगाभ्यासें जन्म विघ्नेश घेत । पुत्र तुमच्या घरांत । ब्रह्मनायक चिंतामणि वर्तत । समाधिज पुत्र तुमचा ॥३२॥
देह शक्तितमय असत । तेथ आत्मा पुरुष ख्यात । त्यांच्यापासून जन्मत । योगबलें ब्रह्मपुत्रक ॥३३॥
अर्धनारीश्वर तूं असत । शंभो तुजपासून गजानन जन्मत । तो ब्रह्मभूतपदाचा पालक जगांत । यांत संशय कांहीं नसे ॥३४॥
भिन्न ही शक्ति असत । भिन्न देहधारी तूं साक्षात । भिन्नभावें जन्मत । तुझा पुत्र स्कंद हा ॥३५॥
स्कंद सर्वत्र संमत देह सौख्यकर । गणेश हा शांतिसौख्यकर । पुत्रभावें दोघेही मोदकर । मोहित तूं झालास ॥३६॥
स्नेहानें शंभो तूं मानित । अधिक प्रेमानें स्कंदाप्रत । ऐसी क्षद्धा तूं न ठेवित । ब्रह्मरुप गणेशावरी ॥३७॥
त्या विघ्नेश्वरावरी नसत । श्रद्धा तुझी म्हणून सांप्रत । तूं झालास विघ्नयुक्त । आतां एकचि उपाय ॥३८॥
त्या विघ्नेश्वरासी भजावें । स्नेहभावें विषय निंदावे । तरीच जाण दूर व्हावे । विषय ताप सत्वर तुझे ॥३९॥
ते स्वयंवश होतील । दुःख सारे टळेल । विघ्नेश्वरापूर्वीं विवाह मंगल । स्कंदाचें कां योजिलें होतें ॥४०॥
शक्तिसहित तूं मनांत । ऐसें पूर्वी आणिलें गुप्त । म्हणोनि सर्व निष्फळ होत । वियोग झाला स्कंदचा ॥४१॥
त्या विघ्नेश्वरासी शरण । जावें आता तूं अशरण । ऐसें बोलून मर्म दारुण । मुद्‌गलमुनी निघून गेले ॥४२॥
त्यांचें वचन सत्य मानून । स्कंदाचा स्नेह सोडून । विघ्नेशाचें करिती पूजन । भजनही त्याचें शिवशक्ति ॥४३॥
तेथ प्रथम आश्विनी संकष्टी येत । ती दोघेंही व्रत करित । माया जी भ्रांतिकरी मोहवित । ती त्यागून शांत झाले ॥४४॥
कोणाचा पुत्र कोण माता । कोण पिता सांगा तत्त्वतां । भ्रमदायक ही सर्व वार्ता । विघ्नेश्वरें कौतुक दाखविलें ॥४५॥
त्यासीच शरण ती जात । तेव्हं तो चमत्कार दाखवित । स्कंदाचा बुद्धिभेद करित । दशरथा तें वृत्त ऐसें ॥४६॥
स्कंद विचारी स्वहृदयांत । मीं अति मूढ असत । शंकर पार्वतीस त्यागून राहत । स्पर्धा करितों गणेशासह ॥४७॥
ज्येष्ठ तो नित्य गणपति । महाप्रभू साक्षात जगतीं । शिवशक्ति तपे आराधिती । तें ब्रह्म पुत्र झालें ॥४८॥
वरदानापरी जन्मत । स्वानंदवासकारी हा असत । सिद्धिबुद्धींचा पति विलसत । योगशांतिस्वरुप तो ॥४९॥
त्याचें रहस्य मीं न जाणलें । केवढें हें मूढत्व घडलें । विचार करुन गमन केलें । कैलासाप्रति तत्काल ॥५०॥
कैलासावर परतून । आधीं विघ्नेशा प्रणाम करुन । भक्तिभावें त्यास पुजून । अथर्वशीर्षे स्तवन केलें ॥५१॥
तदनंतर उमा सदाशिवांचे पूजन । करुन घाली साष्टांग नमन । तेही करिती सन्मान । स्कंदाचा अति प्रेमभरें ॥५२॥
त्यास वरती उठविती । तेव्हां कार्तिकेय म्हणे शिवाप्रती । तुमची आज्ञा मजप्रती । सर्वथा असे शिरोधार्थ ॥५३॥
शांतियोगयुक्त होत । म्हणोनी जरी शिवप्रेरित । तरी विवाहास नकार देत । म्हणे नको मज बंधन ॥५४॥
स्त्री बंधकरी न इच्छित । आता मीं गणपांत रत । अत्याग्रहानें युक्त । स्कंद भजे गणनायकाची ॥५५॥
माया सुख त्यागून । गणेशनिष्ठ तो महान । हें सारें संकष्टीचें महिमान । सर्व संमेलनकर शांतिदायक ॥५६॥
दुसरें ही एक चरित्र तुजप्रत । दशरथा सांगतों पुनीत । एक द्विज होता वंग देशांत । पापकर्मा अत्यंत जो ॥५७॥
ब्राह्मणाचा मार्ग सोडून । नित्य करी मद्यपान । एक यवनी आणून । यवन आपण जाहला ॥५८॥
त्याचे दोष अगणित । वर्णन करण्या शक्य नसत । परदोष उच्चारितीं दोषयुक्त । मानव होतो सर्वदा ॥५९॥
एकदा तो पापी ज्वरयुक्त । आश्विनसंकष्टीं दिनीं होत । त्या दिवसभरी अन्नजल वर्जित । परी चंद्रोदयीं जेवला ॥६०॥
सुपक्व तांदुळाची पेज पिऊन । उपवास सोडिला ज्वरें म्लान । तदनंतर कांही काल जगून । मरण पावला तो द्विज ॥६१॥
त्यास नेऊन ब्रह्मभूत । गणेशाए दूत करित । ऐसा तो महापापी तरत । मुक्ति पावला व्रतप्रभावें ॥६२॥
ऐसे नाना जन भोगून । ऐहिक भोग जे वांच्छी मन । अंतीं मुक्त होऊन । ब्रह्मरुप जाहलें ॥६३॥
हें आश्विन संकष्टीचें महिमान । ऐकेल किंवा वाचील सुमन । तो सर्वार्थ लाभून । अंतीं गणेशसायुज्य मिळवी ॥६४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते आश्विनकृष्णचतुर्थीमाहात्म्यवर्णन नाम अष्टाविंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP