मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ४४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दक्ष म्हणे मुद्‌गलाप्रत । धन्य धन्य मज वाटत । मुद्‌गला स्वामी माझे उदात्त । भाग्य जेणें तुमचा सांग ॥१॥
लोभासुराची शांति । कैसी झाली त्याची वार्ता सुखश्रुती । ऐकिली मी परी तृप्ति । झाली नाही अद्यापी ॥२॥
अमृताचें करितां पान । जैसें न विटे कधी मन । तैसें गजानन माहात्म्य अनुपम । ऐकतां वीट न ये कदापी ॥३॥
गजाननानें भक्तिप्रीत्यर्थ घेतले । जे अवतार ख्यात झाले । ते महाभागा प्राज्ञा मजसी कथिले । पाहिजे तुवां सर्वज्ञा ॥४॥
सूत सांगे मुनींप्रत । हें वचन ऐकून मुद्‌गल सांगत । गजाननाचें चरित्र अद्‌भुत । दयायुक्त अन्तःकरणें ॥५॥
गजाननाचे अवतार अनंत । भक्तांची कार्यसिद्धि करवित । त्यांचे वर्णन यथार्थ जगांत । करणें अशक्य सर्वथैव ॥६॥
तथापि दक्षा अवतारचरित । सांगतों संक्षेपें तुज पुनीत । पार्वती आणि शंकर आराधित । गणनायकासी पूर्वी ॥७॥
दिव्य वर्षे सहस्त्रानंतर । प्रसन्न झाले गजवर । पूजोनिया त्यास स्तविती नंतर । त्यासी पार्वती परमेश्वर ॥८॥
हे गजानना तूं प्रसन्न । देण्या आलास वरदान । तरी स्वामी आमुचा पुत्र होऊन । संसारातून उद्धार करा ॥९॥
‘तथास्तु’ ऐसें देऊन वचन । गणेश पावला अन्तर्धान । सिंधुदानववधार्थ त्यांचा पुत्र होऊन । मयूरेश नामें ख्यात झाला ॥१०॥
सिंधु दानवासी मारुन । महावीर गेला स्वपुरीं परतून । स्वानंदलोकांत दृढमन । नाना अवतार घे शिवगृहीं ॥११॥
आठ कोटी अवतार । गणेशाचे प्रख्यात समग्र । अंशभावें शिवपुत्रत्व उदार । गजानन प्रभू घेतसे ॥१२॥
कांहीं अवतार शिवापासून । कांही उद्‌भवले शक्तीतून । कांहीं उभयतांच्या मिलनांतून । कलांश अन्य जाहले ॥१३॥
ज्या प्रकारचें संकट आले । तैशापरी जन्मरुप घेतलें । कलांशयोगें प्रयत्न पावले । सुखदायक गजानन ॥१४॥
त्या त्या समयीं कार्यसिद्धि करुन । स्वानंदलोकीं जाय परतून । तेव्हां शिवपार्वती मनीं खिन्न । अत्यंत संतप्त होत असती ॥१५॥
कांहीं अन्य अवतार । कश्यपादींच्या घरीं अंशत्वे सुंदर । गजाननानें घेतले सुखकर । त्यांचें वर्णन अशक्यप्राय ॥१६॥
सर्वसिद्धिप्रदायक इतिहास । सांगेन तुज मीं सुरस । गजानन अवतारें युक्त जो खास । दक्ष प्रजापते सांप्रत ॥१७॥
एके समयीं ब्रह्मदेव निद्रित । तें शंभू तया भेटण्या जात । काही कार्यास्तव त्यास उठवित । तोही उठला तत्पर ॥१८॥
परी झोपमोड होऊन न देत । जांभई मोठी क्रोधसंयुत । त्या जांभईतून जन्मत । पुरुष एक रक्तवर्ण ॥१९॥
त्याच्या कांतीस सुगंध येत । शोभनरुप तो वर्तत । त्यास पाहून ब्रह्मा विस्मित । महाबळीस त्या विचारी ॥२०॥
ब्रह्मा विचारी त्या पुरुषाव्रंत । कोण तूं श्रेष्ठा आलास सांप्रत । सांग सर्व हें मजप्रत । मेघगंभीर स्वरें तें तो वदे ॥२१॥
तुमच्या जांभईतून उत्पन्न । पुत्र तुमचा मी महान । देवनायका नामादिक देऊन । जनका स्थान भषणादी सांग ॥२२॥
तेव्हां ब्रह्मा अति हर्षित । पाहून तें महा अद्‌भुत वृत्त । त्या पुत्राचा वर देत । बहुविध संतुष्ट होऊन ॥२३॥
तुझें शरीर सुगंधयुक्त रक्त । म्हणोनि सिंदुर नामें तूं ख्यात । नानाविध भोग भोगी जगांत । सर्वत्र तूं पुत्रा ॥२४॥
तुझ्या सम कोणाचें बळ नसेल । चराचरांत तूं मान्य होशील । ब्रह्मांड सारें जिंकशील । माझ्या आज्ञेनुसार सुता ॥२५॥
जें जें इच्छिशील चित्तांत । तें तें पावशील निश्चित । क्रोधे ज्यास आलिंगन लाभत । तुझें तो होय भस्मसात ॥२६॥
ऐसे नाना वर देऊन । प्रपितासह घाली सुखासन । त्यास प्रणाम करुन । सिंदुर गेला भूतलीं ॥२७॥
शौनक विचारी सूताप्रत । तपोहीन जरी तो पुत्र असत । अत्यंत दुर्लभ वर देत । त्यास कां विधि कारण सांग ॥२८॥
माझ्या हृदयीं संशय महान । त्याचें कारण न उमजे भ्रांत मन । म्हणोनि संदिग्धता दूर करुन । रहस्य मजला सांगावे ॥२९॥
सूत म्हणे तयास वचन । इच्छासंकल्प सिद्धिस्तव महान । करीत असतां देहपतन । होतसे ज्या साधकाचें ॥३०॥
पुढील जन्मीं तो प्राज्ञ जें जन्मत । त्या तपाचें फळ लाभत । स्वल्प श्रमेंही संतुष्ट होत । देव त्यासी वरदाता ॥३१॥
ऐसें हें सर्व तुज सांगितलें । संशयच्छेदक वृत्त भलें । आता कथानक पुढें जें घडलें । तें सांगतों ऐकावें ॥३२॥
मार्गक्रमण करितां सिंदूरसुर मनांत । ऐसा विचार तें करित । तपोहीन असूनही मजप्रत । ब्रह्मदेवें वर का दिला? ॥३३॥
हा वर सत्य कीं अनृत । विधीनें मज फसविलें निश्चित । त्या विधीसच आलिंगून क्षणांत । पाहतों सत्यता या वराची ॥३४॥
जर मी आलिंगितां मरेल । तर वर हा सत्य ठरेल । ऐसा विचार करुन प्रबल । गेला ब्रह्मदेवाजवळी ॥३५॥
क्रोध त्यासी अनिवार । गर्जना करुनी तो उग्र । आलिंगन देण्या सत्वर । विधात्या समीप तो गेला ॥३६॥
तें परम आश्चर्य पाहत । ब्रह्मा तें सिंदुरासुरा म्हणत । माझा वर लाभून विनाश इच्छित । दुष्टा दैत्या तूम सांप्रत ॥३७॥
तूं अभागी अससी । यांत संशय नसे मजसी । पुत्रासम मानून तुजसी । सुदुर्लभ वर मीं तुल दिला ॥३८॥
परी हा उपकार विसरलास । मलाच मारण्या आलास । तरी पावशील विनाशास । गजाननाच्या हस्तें तों ॥३९॥
अरे कुलाधमा करी विचार । उपकारकर्त्यासी अपकार । जगतीं जो करितसे नर । त्याचा अन्त येत जवळीं ॥४०॥
ब्रह्मदेवें ऐसें बोलून । तत्क्षणीं केलें पलायन । आपुलेंच वरदान । उलटलें पाहून आपणावरी ॥४१॥
वैकुंठी जाऊन शरण जात । विष्णूस तो भयकंपित । नारायणसमीप जात । सिंदुरासुर त्या समयीं ॥४२॥
विधीनें सर्व वृत्तान्त । कथिला नारायणप्रत । तो ऐकून निःश्वास सोडित । विष्णुदेव विचार करी ॥४३॥
ब्रह्मदेवास पुजून । नारायण एकाग्र करी मन । तोवरी सिंदुराचें आगमन । वैकुंठलोकीं जाहलें ॥४४॥
अव्यक्त विष्णूस तो म्हणत । होता क्रोधभरें दीप्त । तरी संरक्षण देशील विधीप्रत । तरी त्यासह तुज ठार करी ॥४५॥
मज शाप देऊन तव समीप आला । विधी जो मज घाबरला । माझें पौरुष अजिंक्य जगाला । पहा आता याची प्रचीती ॥४६॥
तेव्हां विष्णुदेव त्यास म्हणत । मी सत्त्वगुणी ख्यात जगांत । हा ब्रह्मदेव वेदाध्ययनांत । सदैव तत्पर राहतसे ॥४७॥
आम्हीं शौर्यलालस नाहीं मनांत । आम्हां मारुन तुज काय लाभत । महादैत्या यश नसे यांत । आम्हीं दोघें तुझ्या अधीन ॥४८॥
जो तुज जगीं शरण येत । त्यास कां मारिसी तूं बलवंत । शंकर असे सर्वसंहारक निश्चित । त्यापासून तुज भीती ॥४९॥
तो तुझें यश हरील । हें ऐकतां विचार करी खल । चतुर्मुखास विष्णूस सोडून प्रबल । तत्क्षणीं गेला कैलासीं ॥५०॥
युद्धलालसा मनांत । सिंदुरासुराच्या विलसत । तो शंकरासमीप जात । ध्यानस्थ तेव्हां जो बैसला ॥५१॥
त्यास ध्यानमग्न पाहत । असुर मनीं विचार करित । ह्या नग्नरुपासी मारण्यांत । काय शौर्य माझें असे? ॥५२॥
हा तप करीतसे अशक्त । मूर्खासम मी लढण्या उद्युक्त । याच्या वामांगी बसली असत । अप्रतिम सुंदर एक नारी ॥५३॥
ह्या लावण्यलतिकेस नेऊन । करीन मी क्रीडा प्रसन्न । ऐश्या नारीसंगें काम भोगून । माझी प्रतिष्ठा वाढेल ॥५४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते सिंदूरशिवसमागमो नाम चतुचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP