मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ४१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल कथा पुढे सांगती । शंकरासी गजाजन दूतासवें पाठविती । तो जाऊनी लोभासुराप्रती । काय सांगे तें ऐक दक्षा ॥१॥
शिव म्हणे लोभासुरा ऐक वचन । हितकारक जें प्रसन्न । सामोपचारें तें ऐकून । सदा सुखी तूं होशील ॥२॥
गजानन स्वयं साक्षात्‍ असत । ब्रह्मनायक जो अद्‌भुत । तो सुर मुनींनी परिवृत  आला असे लढावया ॥३॥
नगराच्या सीमेपासून । आला असे दहा योजन । त्याच्या आज्ञेवरुन । दूतत्व स्वीकारुन मी आलों ॥४॥
दैत्येशा माझ्या वरदानें जगांत । निर्भय तूं झालास बलवंत । म्हणोनी तुझें संरक्षण करण्या सांप्रत । प्रभूनें त्या मज पाठविलें ॥५॥
ब्रह्मांडा वश करुन । सांप्रत झालास सर्वेश महान । परी देवांसी पशूंसी मानुनी समान । दैत्यहस्तें पीडिलेंस ॥६॥
आता वैर सोडून । स्नेह जोडावा महामते तूं श्रेय जाणून । देवास त्यांची स्थानें देऊन। ब्राह्मणां करु दे यज्ञकर्मे ॥७॥
गजाननाचा मित्र होऊन । राही तूं दानवा एकनिष्ठमन । भोग विविध महाभागा भोगून । निर्भय करी स्वजीवित ॥८॥
अन्यथा तो गजानन । तुझें करील निश्चित हनन । शिवाचें ऐकून वचन । क्रोधसंतप्त महा असुर ॥९॥
महादेवाचा करुन तिरस्कार । मदोन्मत्त बोले लोभासुर । कोण हा गजानन भयंकर । भेदकर तूंच वाटसी ॥१०॥
मज मोहविसी सांप्रत । देवांचा पक्षधर । तूं शठ वाटत । तुज मारीन क्रोधयुक्त । परी इलाज माझा न चाले ॥११॥
काय करुं तू अससी दूत । म्हणोनि सोडितों तुज जिवंत । जाऊनी त्या गजाननाप्रत । सांग माझा निरोप त्यासी ॥१२॥
देवांसहित समस्त । हनन करीन तुझें निश्चित । पहा माझें पौरुष अद्‌भुत । रणांगणावरीं सत्वरीं ॥१३॥
ऐसी निर्भर्त्सना घडत । तें शंभू जाहला कोपयुक्त । डोळे लाल होऊन अत्यंत । महादैत्या त्या म्हणे ॥१४॥
अरे दुर्मतें मृत्युयोग दिसत । पापिष्ठा तुझा सांप्रत । यांत संशय कांहीं नसत । म्हणोनि गजानना निंदिसी ॥१५॥
ब्रह्मनायका न जाणसी । जाहली दुर्बुद्धी तुजसी । ऐसें पुनः पुन्हा बोलून तयासी । शंकर गेले परतून ॥१६॥
गजाननाप्रत जाऊन । प्रणाम करुन करी कथन । वृत्तान्त समस्त तो ऐकून । क्रोधें संतप्त गजानन ॥१७॥
लोभासुराचें ऐकून क्रूर वचन । क्रोधें रक्ताक्ष गजानन । परशु फेंकिला अभिमंत्रून । कालासही भयंकर जो ॥१८॥
तो परशु दैत्यपुरींत । ज्वल माळांनी युक्त । तेजोमय तत्क्षणी प्राप्त । भयभीत तें दैत्यगण ॥१९॥
महास्त्र तें पाहून धावत । दशदिशांत दैत्य समस्त । हाहाकार सर्वत्र माजत । सभेंत होता लोभासुर तें ॥२०॥
दानववीर भयग्रस्त । सभेंत येऊन सांगत । लोभासुर सुखासीन असत । म्हणती राजा संकट आलें ॥२१॥
काय बैसलात स्वस्थ सुखांत । दारुण रुप सर्वां भिववीत । ऐसें महाअस्त्र आपुल्या सेनेंत । जाळीत असे दानवांसी ॥२२॥
त्यांचें ऐकून वचन । भयहर्षयुक्त बोले अचल मन । दानवाधीशांवरी रागावून । अत्यंत संतप्त होऊन ॥२३॥
गजानन अमर वीरांसहित । आला असावा निश्चित । ज्याचें अस्त्र सामर्थ्ययुत । एवढें भयप्रद विनाशी ॥२४॥
सभेंत जे दानवेंद्र बसले । ते तत्क्षणीं लोभासुरा म्हणाले । प्रणामांजली जोडून उद्‌गारले । भय न धरावें दानवोत्तमा ॥२५॥
तुझ्या पुढयांत मानदा त्वरित । गजाननास मारुं निश्चित । ऐसी शेखी मिरवून जात । युद्धमदें अंध झाले ॥२६॥
रणांगणावरी जाऊन पाहती । मृत्युसम भयंकर अस्त्रदीप्ती । ब्रह्मपतीच्या अस्त्राची शक्ती । ज्वलंत अजेय प्रलयकर ॥२७॥
त्या सर्व दानवेंद्रास जाळित । तीक्ष्ण तेजें परशु क्षणांत । हाहाकार मोठा उठत । पळाले भयें जे वांचले ॥२८॥
कांहीं दानवेंद्र तेव्हां सोडिती । मेघास्त्र दक्षा झटिती । जलधारा प्रचंड वर्षती । मेघमाला सर्वत्र ॥२९॥
परी तें सर्व जल शोषित । महास्त्र गजाननाचें क्षणांत । मेघ सारे निस्तेज होत । दैत्यमुख्यां जाळी परशू ॥३०॥
तें परम आश्चर्य ऐकत । तेव्हा लोभासुर स्वतः जात । रथारुढ रणांगणांत । महास्त्रातें निवारण्या ॥३१॥
दैत्यराजाच्या पुढयांत । ज्वाला अकस्मात उफाळत । घोडयांसह रथास जाळित । शस्त्रें ही सर्व जळाली ॥३२॥
नंतर दैत्येंद्र लोभासुर पळून जात । शुकाचार्यास भेटत । त्यास प्रणाम करुन म्हणत । कविवरा गुरो शत्रू आला ॥३३॥
स्वामी देव गजानन सांप्रत । महाबळी आला रणांगणांत । माझा रथ दहन केला त्वरित । त्याच्या दिव्य शस्त्रानें ॥३४॥
त्याचें निवारण कैसें करुं? । परचक्र हें कैसें परतवूं? । कैसा टाळू माझा संहारु । हें कांहीं न कळे मज ॥३५॥
म्हणौनि शरण नाथा तुजप्रत । रक्षी मुने तूं सांप्रत । मनोवाणीमय जें जें असत । त्यापासून मरण न मला ॥३६॥
तो नामरुपधारी गजानन । कैसें करील माझें हनन । जरी ओढवलें मरण दुर्मन । तैसें होवो आज मुने ॥३७॥
परी मी देवांस शरण । जाणार नाहीं जरी आलें मरण । म्हणोनि महाभागा उपाय सांगून । हित माझें करावें ॥३८॥
तूंचि माझा आधार । योगींद्र जीवन तूंच उदार । ऐसें वचन गौरवप्र । लोभासुराचें ऐकिलें ॥३९॥
नंतर सर्वज्ञ शुक्रमुनि म्हणत । भय करुं नको वत्सा सांप्रत । माझें वचन हितप्रद सतत । तें ऐकून तैसा वाग ॥४०॥
दैत्येंद्रा ऐसें वागशील । तरी क्षेम तुझें होईल । पुनरपि प्राप्त होईल बल । शुक्र म्हणे त्या वेळीं ॥४१॥
प्रसन्नात्मा गजानन । जें जें इच्छील त्याचें मन । तें तें सत्यरुप होऊन । प्रभाव त्याचा पडेल ॥४२॥
महासुरा यांत संशय नसत । ब्रह्मांचा नायक तो वर्तत । विनयपूर्वक तूं त्वरित । शरण जाई तयासी ॥४३॥
हा केवळ देवाधिदेव नसत । सुरांआ नायक निष्णात । परी जगताचा प्रभु बलवंत । सर्वश्रेष्ठ तेज त्याचें ॥४४॥
ऐसें ऐकता शुक्र वचन । लोभासुर विचार प्रश्न । खेदें निःश्वास सोडून । गुरुजी संशय दूर करावा ॥४५॥
जरी परब्रह्म हा गजानन । तरी देवांआ पक्ष घेऊन । युद्धार्थ कां आगमन । केलें त्यानें सांगावें ॥४६॥
जरी मध्यस्थ तो असता । कोणाचाही पक्ष न घेता । तरी मज लाज न वाटता । शरण त्यांस मीं गेलों असतों ॥४७॥
स्वामी संशय हा चित्तात । दूर करावा आपण त्वरित । तेव्हां शुक्रगुरु त्यास सांगत । सत्य रुप गणेशाचें ॥४८॥
देहरुप महत ब्रह्म । देही आत्मा हा योग परम । त्या उभयतांचें निदर्शन उत्तम । ‘असि’ पदानें होत असे ॥४९॥
हा संसारबोध नाश होत । तें विदेहरुप ब्रह्म प्राप्त । सौख्य तें सुसिद्धिद असत । अतींद्रिय भवातीत ॥५०॥
हे महादैत्या तें ब्रह्म । जाण तूं गजाननरुपें निरुपम । सर्वांचे आदि बीज परम । ज्याचें परी बीज नसे ॥५१॥
तेंच हें गजवाचक । वेद वर्णिती ब्रह्म निःशंक । गजचिन्हानें गजाननाप्रत पावक । योगी जाती सर्वदा ॥५२॥
त्या नावें तो ज्ञात । मुनी तत्त्वज्ञ ऐसें वर्णित । जैसा मुखावरुन मानव जात । गजचिन्हानें ब्रह्म तैसें ॥५३॥
योगी त्यास सदा जाणिती । त्यानेंच केली विश्वाची स्थिती । बोधरुप स्वधर्मयुत रीती । प्राणिमात्रांच्या मर्यादा ॥५४॥
पाताळलोकीं दानवा देत । राज्य देवांस स्वर्गांत । पृथ्वीवरी मानव वसत । ऐसी रचना त्रिविध केली ॥५५॥
जेव्हां देव होती लोभयुक्त । मदान्वित ते वर्तत । जेव्हां महाभागा दैत्यांप्रत । पीडादायक ते होती ॥५६॥
पाताळांत ते जाती । आपुलें स्थान सोडिती । दैत्यगणांसी मारिती । तेव्हां वर देत हा दैत्यांसी ॥५७॥
देवांसी विघ्न आणित । सर्वज्ञ हा दैत्यां बळदेत । देवांवरी ते करिती मात । बलिष्ठ होती तदनंतर ॥५८॥
परी तेही होऊन उन्मत्त । जेव्हां देवांचे वैभव हरित । देवांचा नाश साधण्या करित । यज्ञकर्माचें खंडन जें ॥५९॥
तेव्हां विघ्नेश्वर देह घेऊन । दानवांचें करितो हनन । त्यांसी स्वलोकीं दडपून । धर्मपालक न्याय करी ॥६०॥
जेव्हां सुरअसुर स्वधर्मरत । तेव्हां हा ब्रह्मरुप घेत । चिंतामणि ध्यानयुक्त । चित्तीं विश्राम घेतसे ॥६१॥
चित्तरुपा बुद्धि साक्षात । भ्रांतिरुपा सिद्धि वर्तत । त्या उभयतांच्या साहाय्यें खेळत । ब्रह्मनायक गजानन ॥६२॥
त्याचें स्वसंवेद्यापासून । मन होतें निर्माण । त्यायोगें गणप हें अभिमान । स्वानंदवासी यास म्हणती ॥६३॥
म्हणौनि त्यासी शरण जात । त्यास शाश्वत सुखलाभ प्राप्त । ऐसें रहस्य जाणून त्वरित । शरण त्यास जाशील ॥६४॥
तरी आपुलें हित साधून । दैत्यागणां वाचवशील प्रसन्न । अन्यथा सकल दानवांसहित हनन । करशील तूं लोभासुरा ॥६५॥
गजाननाचें हें शस्त्र असत । ब्रह्ममय अजिंक्य अद्‍भुत । त्यास भक्तिभावें प्रणत । होई तेणें शांतिलाभ ॥६६॥
ऐसें हें गणेशरुप रहस्य सांगून । लोभासुरा हित उपदेशून । शुक्रें धरिलें नंतर मौन । दैत्यराज विचार करी ॥६७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते शुक्रोपदेशवर्णनं नामैकत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP