मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ३२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । अधिक मासांत जी संकष्ती येत । तिचें माहात्म्य सांगा मजप्रत । गणेश कथा ऐकोन तृप्त । अद्यापि ना झालें मन ॥१॥
ऐसी दशरथाची प्रार्थना ऐकत । तेव्हां वसिष्ठ तयासी सांगत । आंध्र देशी राजा धर्मदत्त । होता धर्मपरायण ॥२॥
यज्ञयाग तो बहु करित । नीतिज्ञ अखिलास तोषवित । प्रजेपासून षष्ठांशच घेत । सर्वशास्त्र पारंगत ॥३॥
परी त्यासी व्याधी जडत । जलोदर रोगाची अकस्मात । अतिपापें तो पीडित । सार्वभौम भूमिपाल ॥४॥
नाना उपाय तो करित । परी रोगमुक्ति ना प्राप्त । तुलादानादिक करित । महादानें तो भक्तीनें ॥५॥
तीर्थयात्रा हिंडत । देवता आराधन विधियुक्त । तथापि न होय रोगवर्जित । अति दुःखित मानसी ॥६॥
आत्महत्या करण्या उद्युक्त । जाहला नृप तें प्रजा दुःखित । तेव्हां महायोगी अष्टावक्र येत । अकस्मात राजगुहीं ॥७॥
विषप्राशनाचा बेत । नृपानें दूर ठेवून सांप्रत । अष्टावक्र पूजा विधियुक्त । करुन भोजन दिलें तयासी ॥८॥
नंतर प्रणाम करुन विनवित । धन्य माझा जन्म वाटत । तुमच्या दर्शनें योगेश्वरा उदात्त । जीवन धन्य मज वाटतें ॥९॥
मी आत्मघातास उद्युक्त । जाहलो होतों संभ्ररान्त । आतां होऊन दर्शन तुमचें पुनीत । नरकापासून वाचलों मी ॥१०॥
हें ऐकता वर्तमान । वसिष्ठ विचारी प्रसन्नमन । महाराजा देहघाता मन । कोणत्या कारणास्तव झालें? ॥११॥
तू रोगदुःखमुक्त । होशील हयांत संशय नसत । तुझा जाणला मीं वृत्तान्त । चतुर्थीव्रत विसरलासी ॥१२॥
राष्ट्राकडून पाप झालें । तैसेंचि तें तव हस्तें घडलें । चतुर्थीव्रतहीनत्वें आलें । पतितत्त्व नराधमा तुला ॥१३॥
सर्व व्रतांत मुख्य मानावें । चतुर्थीचें व्रत बरवें । तें न करता भोगावें । पापाचें फळ आपुल्या ॥१४॥
म्हणोनि आता प्रजेसहित । पडशील तूं नरकांत । जरी वाचण्या इच्छा असत । तरी हें व्रत राज्यांत करी ॥१५॥
ऐसें बोलून चतुर्थीमाहात्म्य वर्णित । अष्टावक्र करुणायुक्त । तें ऐकून सुविस्मित । धर्मदत्त म्हणे तयासी ॥१६॥
पुण्यपावन हें व्रत । पूर्व पुण्ये कळलें मजप्रत । आतां गणेशस्वरुप उदात्त । दयानिधे वर्णन करी ॥१७॥
त्या देवासी सदैव पूजीन । मुनींद्रा मी अनन्य मन । त्या देवाधिपाचें महिमान । असामान्य मज वाटतें ॥१८॥
अष्टावक्रं सांगी तयाप्रत । महाभागा ऐक उचित । सर्वसिद्धिप्रद असत । स्वरुप त्या गणेशाचें ॥१९॥
निर्गुण गणवाचक वर्तत । जें ब्रह्म तें मस्तक असत । त्याचा देह सगुण ख्यात । योगरुप गजानन ॥२०॥
सिद्धि ती भ्रांतिरुप । बुद्धि भ्रांतिधरा अपाप । त्यांच्या साधनें खेळे विघ्नप । मायासाहाय्यें सत्य हें ॥२१॥
स्वसंवेद्ययोगें लाभत । दर्शन त्याचें महान उदात्त । त्या कारणें योगी वर्णित । स्वानंदवासी प्रभु ऐसें ॥२२॥
संयोगांत हा गकार । योगांत आहे णकार । त्यांचा स्वामी तो थोर । गणेशान विघ्नेश्वर ॥२३॥
शांतियोगें तो लाभत । पंचधा चित्तवृत्ति जी असत । त्यांत पंचधा मोह वसत । समरुप मीं असे ॥२४॥
ऐश्या विचारें चित्त त्यागून । चित्तचालक लाभे पावन । म्हणोनि हा गणनाथ महान  चिंतामणि नामें ख्यात ॥२५॥
त्यास भज तूं महाभागा आतां । त्यायोगें शांतिलाभ भक्ता । शांत होऊनिया जगता । पूजनीय तूं होशील ॥२६॥
ऐसे सांगून त्यास देत । गणेशमालामंत्र उदात्त । विधिपूर्वक नंतर होत । अंतर्धान अष्टावक्र ॥२७॥
धर्मदत्त राजा हर्षयुक्त । आपणासी धन्य मानीत । भाग्यगौरवें उत्साहयुक्त । मलमास कृष्ण चतुर्थी करी ॥२८॥
प्रजाजनांसमवेत आचरित । नृप तेव्हां संकष्टीचें व्रत । व्रतमुख्यत्वें प्रसिद्ध करित । पृथ्वीवरे सर्वत्र ॥२९॥
त्यायोगें रोगविनिर्मुक्त । धर्मदत्त राजा त्वरित । प्रजाजन ही समस्त । झाले निरामय प्रसन्न ॥३०॥
राजा नित्य गणपतीस भजत । अनन्यचित्त भक्त । गणेशप्रीतिस्तव देत । नानाविध दानें तो ॥३१॥
नंतर राज्यावर स्वपुत्रास । बसवून भोगी एकांतवास । स्त्रीसहित ध्यानमार्गास । अवलंबिलें भजनार्थ ॥३२॥
अंतीं विघ्नेशांप्रत जात । तल्लीन झाला भक्तिरत । जन सर्वही ब्रह्मभूत । क्रमाक्रमानें जाहले ॥३३॥
ऐसें ह्या व्रताचें माहात्म्य कथिलें । दुसरेही असे वृत्त भलें । तें आतां पाहिजे श्रवण केलें । मुक्तिप्रद कथानक ॥३४॥
गांधार देशांत क्षत्रिय राहात । पापी परद्रव्यहारक चौर्यरत । द्युतमद्यासक्त परस्त्रीलंपट । गोमांसाभक्षक असत्यपर ॥३५॥
तो दुर्बुद्धि कलह सतत । हिंसाकर्म सदा आचरित । तेव्हां राजा त्यास करित । घोर वनीं हद्दपार ॥३६॥
वनांत वाटमारी करित । ब्राह्मणांदीसी ठार मारित । स्त्रियांचाही वध भयरहित । पापी दुष्ट तो नित्य करी ॥३७॥
नंतर द्रव्य जोडून अपार । भोगिले भोग अपार । नाना चोर्‍या करुन उग्र । त्या दुष्ट पातक्यानें ॥३८॥
पुढें एकदा मलभासी जात । तो पापी एका पर्वतद्रोणींत । कृष्णचतुर्थी ती असत । हिंसार्थ लोभी त्या वेळीं ॥३९॥
नंतर एक मार्गस्थ पाहत । मानव तो अवचित । शस्त्रधारी तो धावत । वधार्थ त्याच्या त्या समयीं ॥४०॥
त्या क्रूरकर्म्यास पाहून । तो वाटसरु करी पलायन । कोसभरी तो पापी मागें लागुनी । पडला मार्गात अडखळून ॥४१॥
त्यास पडलेला पाहत । तेव्हां वाटसरु क्रोधें हाणित । एक पाषाण क्रोधयुक्त । मस्तकावरी त्याच्या तें ॥४२॥
त्यायोगें त्या पाप्याचें फुटत । क्षत्रियाचें मस्तक क्षणांत । त्या कारण व्याकुळ अत्यंत । शुद्ध हरपली तयाची ॥४३॥
रात्रीं चंद्रोदयापर्यंत । तो तैसाचि बेशुद्ध पडत । परी चंद्रोदयानंतर सावध होत । स्वल्प पायस पानकरी ॥४४॥
नंतर दुसरे दिनीं पंचमी असत । तेव्हां तो प्राण सोडित । स्वानंदपुरीं जात । गणेशास पाहून मुक्त झाला ॥४५॥
तो पापकर्मा क्षत्रिय होत । व्रतप्रभावें ब्रह्मभूत । नकळत जेव्हां त्यास घडत । संकष्टीचा उपवास ॥४६॥
तरी ज्ञानपूर्वक करिती व्रत । त्यांचें पुण्य अगणित । नानाजन भोगित । व्रतप्रभावें हृदयोप्सित ॥४७॥
अन्तीं ते ब्रह्मभूत होत । ऐसा महिमा अगाध असत । मलमास संकष्टीचा पुनीत । ऐकतां वाचिता इष्टलाभ ॥४८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाजनचरिते मलमासकृष्णपक्षचतुर्थीमाहात्म्यवर्णनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP