खंड ४ - अध्याय ३४
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । श्रावणमासीं लाडु आदि भक्षित । जो ब्राह्मण विधियुक्त । त्या व्रताचें माहात्म्य मजप्रत । सांगावें कृपा करुन ॥१॥
ऐसें दशरथ राजा प्रार्थित । तेव्हां वसिष्ठ त्यास सांगत । वैवस्वतमनूचा एक सुत । इक्ष्वाकु नामा कनिष्ठ ॥२॥
तो राज्य लोभी व्रत करित । भक्षण करी श्रावण महिन्यांत । संकष्टी व्रताच्या आचरणांत । पंचखाद्यांचे लाडू तेव्हां ॥३॥
सप्तभावें साधनतत्पर । दही खाऊन राही भक्तिपर । भाद्र्पद कृष्ण चतुर्थीस तो उदार । आश्विनी संकष्टी निर्जला करी ॥४॥
कार्तिकांत केवळ दुग्धसेवन । राजा पाळी तो नियम प्रसन्न । मार्गशीर्षांत जल पिऊन । संकष्टी व्रत करीतसे ॥५॥
पौषमासांत गोमूत्र प्राशन । माघांत पांढरे तीळ सेवन । फाल्गुनांत शर्करायुक्त भक्षण । घृताचें करी व्रतकारणें ॥६॥
चैत्रांत पंचगव्याचें प्राशन । करी तो विनायकाचें पूजन । वैशाखांत कमलबीज खाऊन । व्रत पालन तो करीतसे ॥७॥
ज्येष्ठांत गाईचें तूप खाई । व्रत उत्तम पूर्णत्वा नेई । आषाढांत मध भक्षून राही । गणेशास पुजून चंद्रोदयीं ॥८॥
नंतर त्या व्रताच्या प्रभावें होत । सुद्युम्न मनपुत्र ज्येष्ठ जगांत । इलास त्या आद्य मुनि करित । राजा आपुला आदरयुक्त ॥९॥
मनु इक्ष्वाकु ऐशापरी होत । सार्वभौम महाद्युती पुनीत । असाध्य जरी मानव इच्छित । तरी तेंही प्राप्त । धर्म मार्गानें ॥१०॥
ऐशापरी नानाजन । व्रतपुण्यें झाले पावन । ब्रह्मभूत ते होऊन । शोभले या भूमंडळीं ॥११॥
म्हणोनि राजशार्दूला तूं सांप्रत । पापरुपा मज वाटत । चतुर्थींचे नष्ट व्रत । तुझिया राज्यीं परी न जाणसी ॥१२॥
प्रजाजनांसमवेत । जर करशील तूं हें व्रत । होऊनियां पुत्रवंत । अंतीं विघ्नेशसरुपता ॥१३॥
मुद्गल म्हणती दक्षाप्रत । ऐसें ऐकून वसिष्ठवचन यथायुक्त । दशरथ महाराजा प्रणाम करित । वसिष्ठांसी आदरें ॥१४॥
नंतर स्वपुरीं परतत । प्रजेसह व्रत आचरित । दवंडी करी स्वराज्यांत । म्हणे करा हें व्रत देवाचें ॥१५॥
त्या राजाज्ञेचें करिती पालन । व्रत हें संकष्टीचें पाळून । व्रतपुण्यप्रभावें सुजाण । साक्षात् विष्णु तो झाला ॥१६॥
त्याचे चार पुत्र प्रख्यात । राम लक्ष्मण भरत ज्ञात । शत्रुघ्न चवथा असत । बलसंयुत सर्वही ते ॥१७॥
दशरथ अंतीं विघ्नेशाप्रत । व्रत पुण्याईनें जात । लोक झाले दुःखरहित । ब्रह्मभूत झाले सर्वही ॥१८॥
वसिष्ठ दशरथांचा हा संवाद । व्रतहेतुक जो ऐकेल सुखद । अथवा वाचील पुण्यप्रद । विघ्नेश्वर त्यास देई फल ॥१९॥
पुत्रपौत्रादिक धनधान्य संपत्ती । देई त्यासी गणपति । नाना रोगांतून मुक्ती । ऐश्वर्यही समग्र लाभे ॥२०॥
अंती गणपतींत लीन । होतो भक्त तो महान । यांत संशय नसे पावन । संपूर्ण हें कथानक ॥२१॥
चतुर्थ्यांचा वृत्तान्त । महिम्यासह कथिला तुजप्रत । आतां आणखी काय ऐकण्या चित्त । इच्छित तुझें तें सांग ॥२२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गलें महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते वसिष्ठशरथसंवादसमाप्तिवर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP