मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ३५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दक्ष म्हणे मुद्‌गलाप्रत । कथिलें आपण चतुर्थीचें व्रत । आतां उद्यापन विधि मजप्रत । सांगावा जो फलप्रद ॥१॥
मुद्‌गल तेव्हां त्यास सांगतो । उद्यापनाची रीती । व्रतारंभीं कोणी करिती । अथवा वर्षमध्यांत ॥२॥
भाद्रमासी शुक्लपक्षांत । चतुर्थीचे उद्यापन उक्त । माघमासीं कृष्णपक्षांत । करावें उद्यापन शास्त्राधारे ॥३॥
असतां वैभव उपासकाचें । त्यानें खांब आणावे केळीचे । महामंडप करुन तयांचे । तेज वाढवावें सर्वथा ॥४॥
शोभा उत्तम करावी । द्रव्य असून कृपणता न दाखवावी । यथावैभव आचरावी । उद्यापनाची ही रीती ॥५॥
छत बांधव उत्तम । तैसेचि आरसे मनोरम । लावून सर्वत्र दीपमाला अभिराम । मणिमोत्यांची आरास ॥६॥
यथायोग्य व्रतधारकें करावी । सर्व शोभा ऐसी बरवी । शुक्लचतुर्थीव्रतसांगता करावी । माध्यान्ह काळीं दक्षप्रजापते ॥७॥
कृष्णचतुर्थीचे उद्यापन । चन्दोदयीं करावें प्रसन्न । गोमयानें जमीन सारवून । त्यावरी रचावी धान्यराशी ॥८॥
त्या धान्यराशीवरी अष्टद्ल कमळ । काढून त्या वर कलश निर्मल । सुवर्णाचा, रुप्याचा, तांब्याचा यथाबळ । मृण्मय कलशही स्थापावा ॥९॥
दक्षा त्या कलशास वेष्टावें । दोन वस्त्रांनीं भक्तिभावें । त्यावरती मग ठेवावें । सुवर्णाचें पात्र उत्तम ॥१०॥
त्यानंतर गणेशाचें यंत्र काढावे । वस्त्रावरी एका बरवें । तेथ गणपतिमूर्तिं स्थापून पूजावें । सर्वायवय धातुयुक्तरुप ॥११॥
अनेक विंशति संख्य ब्राह्मण । बोलावून करावें पूजन । गणानां त्या या मंत्राचा जप करुन । होम करावा तदनंतर ॥१२॥
हजार अथवा अर्धभाग । एकशें आठ अथवा जपाचा भाग । होमीं अर्पून गीतवाद्यादिक सुभग । दशरथा वेदघोष करवावा ॥१३॥
नंतर नानाशास्त्र प्रवाद । ब्राह्मणांनी करावे सुखद । जेथ तेथ गणेशकथा मोदप्रद । सांगाव्या त्यांनीं प्रेमानें ॥१४॥
नंतर पूर्णाहुती द्यावी । वसुधारा वाहवावी । बलिदान वायसादिक करावीं । समग्र विधिपूर्वक ॥१५॥
एकवीस पक्वान्नें करुन । एकवीस संख्या प्रमाण । नैवेद्य देवास दाखवून । ब्राह्मण भोजन घालावें ॥१६॥
विपुल दक्षिणा देऊन । सपत्नीक ब्राह्मणा बोलावून । स्त्रीजनांस कंचुकीप्रदान । भूषणदानही करावें ॥१७॥
कृष्णचतुर्थीस अर्घ्यदान । करावें चंद्रास प्रसन्न । शुक्लचतुर्थीस वर्जत । अर्घ्याचें त्या करावें ॥१८॥
प्रथम तिथीस अर्घ्यदान । नंतर विघ्नेशरा समर्पण । त्यानंतर चन्द्रास अर्घ्यदान । मंत्रपूर्वक तदनंतर ॥१९॥
तिथींची माता तूं अससी । देवी सर्वार्थ तूं देसी । माझा अर्घ्य स्वीकारुन मजसी । पावन करी नमन तुला ॥२०॥
ऐसें तिथीस प्रार्थावें । तदनंतर गजाननासी विनवावें । गजानना नमन तुज मनोभावें । नाना सिद्धिप्रदायका ॥२१॥
बुद्धिपते अर्घ्य स्वीकारावा । मी दिलेला हा शुभप्रद मानावा । अत्रिगोत्रसमुद्‌भुत देवा । विनवावें नंतर चन्द्रासी ॥२२॥
गणेशप्रीतिवर्धका घ्यावा । मी दिलेला अर्घ्य हा बरवा । रोहिणीत अमृतधारका द्यावा । मजला सर्व सौख्य ठेवा ॥२३॥
कृष्णपक्षीं सदा रात्रीं भोजन । करावें व्रत साधकानें पुनीत मन । शुक्लपक्षांत पंचमी तिथीस बोलावून । ब्राह्मणांसी भोजन द्यावें ॥२४॥
चतुर्थीस जागरण करावें । गणेशकथांचें गायन व्हावें । पंचमीस पूर्ववत पूजावें । नैवद्यादींनीं महामते ॥२५॥
दीन अंध कृपणांस अन्नादिक । द्यावें यथाशक्ति निःशंक । ब्राह्मणांसी दक्षिणादिक । दान करावें श्रद्धेनें ॥२६॥
सर्वांस भोजन घालून । तोषवावें देऊनियां दान । गणेशभक्ति दृढ व्हावी हें वरदान । मागावें त्यांच्याजवळीं तें ॥२७॥
नंतर नमस्कारासहित । मूर्तो ती द्यावी स्वगुरुप्रत । एकवीस ब्राह्मणां भक्तियुत । कलश द्यावे त्या वेळीं ॥२८॥
संतोषे उदारचित्तें सर्वांस । क्षमाभावें पाहून मनास । ध्यास लागावा सुरस । गणपतिभजनाचा सर्वदा ॥२९॥
अनन्यभावें करावें मनन । ऐसें उद्यापन करुन । अंतीं संपूर्ण फल लाभून । ब्रह्मभूत तो भक्त होय ॥३०॥
दक्षा या व्रताचें महिमान । वर्णन अशक्य मान । परी उद्यापनासहित विशेषें कथून । उपकृत केलें यथामती ॥३१॥
ऐसें हें चतुर्थीचें चरित । जो नर ऐकत अथवा वाचित । त्यास विघ्नेश सदा देत । मानसेप्सित सर्वदा ॥३२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते चतुर्थ्युद्यापननिरुपणं नाम पंचत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP