वारांची गीते - अभंग करुणापर

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


कष्टी झाला जीव केली आठवण । पावलें किरण मारुतीचें ॥१॥
संसारसागरीं आकांत वाटला । भुभु:कार केला मारुतीनें ॥२॥
मज नाहीं कोणी मारुती-वांचूनी । चिंतितां निर्वाणी उडी घाली ॥३॥
माझें जिणें माझ्या मारुती लागलें । तेणें माझें केलें समाधान ॥४॥
उल्हासलें मन पाहातां स्वरूप । दास म्हणे रूप राघोबाचें ॥५॥

॥ अभंग ॥२॥ ठकाराचें ठाण करीं चापबाण । माझें ब्रह्मज्ञान ऐसें असे ॥१॥
मुखीं रामनाम जीवीं मेघश्याम । होताहे विश्राम आठवीतां ॥२॥
रामरूपीं देहो झाला नि:संदेहो । माझे मनीं राहो हाचि भावो ॥३॥
रामदास म्हणे रामरूपावरी । भावें भक्ती चारी ओवाळीन ॥४॥

॥ अभंग ॥३॥ ध्यान लागलें रामाचें । द:ख हरपलें जन्माचें ॥१॥
रामपदांबुजावरी । वृत्ति गुंतेच मधुकरी ॥२॥
रामवदनमयंकीं । चक्षुचकोर झाले सुखी ॥३॥
तनु मेघश्याम मेळें । चित्तचातक निवाले ॥४॥
कीर्तिगंधतरूवरी । कुजे कोकिळा वैखरी ॥५॥
रामीं रामदासस्वामी । चिंतिताहे अंतर्यामीं ॥६॥

॥ अभंग ॥४॥ रामा तुझ्या स्वामीपणें । मानीं ब्रह्मांड हें ठेंगणें । तुजवीण कोण जाणे । अंतर आमुचें ॥१॥
तुजवीण मज माया । नाहीं नाहीं रामराया । आम्हां अनाथां कासया । उपेक्षिसी ॥२॥
तुज समुदाय दासांचा । परी आम्हां स्वामी कैंचा । तुजसाठीं जिवलगांचा । संग सोडिला ॥३॥
सगुण रघुनाथ मुद्दल । माझें हेंचि भांडवल । दासा धरूनि पारपैल । टाकीं या भवाचे ॥४॥

॥ अभंग ॥५॥ पतीतपावना । जानकीजीवना । अरविंदनयना । रामराया ॥१॥
आका गांवा गेली । मज व्यथा झाली । कृपाळा राहिली । नवमी तुझी ॥२॥
आका गांवा जातां । निरविलें समर्था ।भाक रघुनाथा । साच करीं ॥३॥
नवमीचा उत्सव । होऊं द्या बरवा । मग देह राघवा । जाऊं राहूं ॥४॥
ऐकोनि करुणा । अयोध्येचा राणा । मूतींच्या नयना अश्रु आले ॥५॥
ऐकोनि वचन । जानकीजीवन । कृपेचें पावन । वेणेवरी ॥६॥

॥ पद ॥ निदान पहाशी किती । दयाळा निदान पाहासी किती । रामराया निदान-॥ध्रु०॥
धांव धावगा सीतापति । तुजवेगळी नाहीं गति । नानाशास्त्रें मौनावती । नाम तारक वेद बोलती ॥१॥
जळीं पाषाण तारिले जड । मी काय तुज त्याहूनि जड । आतां पुरवीं जीवींचे कोड । मनीं घेतला विषयीं मोड ॥२॥
तुझ्या भेटीचें आर्त मोठें । मज न गमे कांहीं केल्या कोठें । तुजवांचोनि सर्वहि खोटें । दीन बालक तुझें धाकुटें ॥३॥
वृत्ति जडली पायांपाशीं । जेवीं गुळाशीं गुंतली माशी । देहीं असोनि गुप्त कां होशी । दास उदास देहभावाशीं ॥४॥ ॥ करुणापर अभंगसंख्या ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP