वारांची गीते - मंगळवार

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ अभंग ॥ सदां आनंदभरीत । रंगसाहित्यसंगीत ॥१॥
जगन्माता जगदीश्वरी । जगज्जननी जगदुद्धारी ॥२॥
त्रिभुवनींच्या वनिता । बाळ तारुण्य समस्तां ॥३॥
बसे आकाशीं पाताळीं । सर्वकाळ तिन्हीकाळीं ॥४॥
जिच्या वैभवाचे लोक । हरिहर ब्रह्मादिक ॥५॥
सर्व देहा हालविते । चालविते बोलविते ॥६॥
मूळमाया विस्तारली । सिद्ध साधकाची बोली ॥७॥
भक्ति मुक्ति योगस्थिति । आदि मुक्ति सहजस्थिति ॥८॥
मुळीं राम वरदायिनी । रामदास ध्याता ध्यानीं ॥९॥

॥ पद ॥ सुंदर रामाबाई । सबराभरित सर्वांठायीं हो । निगमा पार नाहीं । ते म्यां वर्णावी ते काई हो । सुंदर रामाबाई ॥धृ०॥
शरयूतीरवासिनी वेधक मुनिमानसमोहिनी हो । सुरवर संजीवनी कैसी शोभत पद्मासनीं हो । उदार एकवचनी दुर्लभ तापसी तपसाधनीं हो । दशरथनृपनंदिनी प्रगटे ऋषिवचनालागुनी हो ॥ सुंदर० ॥१॥
निजमस्तकीं वीरजगुंठी त्रिपुंड्र रेखिला लल्लाटीं हो । सुरेख सदटा । भ्रुकटी तेणें सतेज नासापुटी हो । नव वानर गोमटी श्रवणीं कुंडलांची थाटी हो । लावण्याची पेटी उपमे न पुरे मन्मथकोटी हो ॥ सुंदर ॥२॥
कटितटीं सोनसळा माजीं सौदामिनीचा मेळा हो । सुवास नाभीकमळा तेणें पडे मधुकरपाळा हो । वामे धरणीबाळा वनितामंडित ते वेल्हाळा हो । चरणस्पर्शें शिळा अहिल्या उद्धरिली अवलीला हो ॥ सुंदर० ॥३॥
विशाळ वक्षस्थळीं विराजित उटी चंदन पातळी हो । कंठीं एकावळी माजीं कौस्तभमणी झळफळी हो । अधरीं प्रवाळपाळी मध्यें
शोभे दंतावळी हो । रसना रसकल्लोळीं वाचा बोलत मंजुळी हो ॥ सुंदर० ॥४॥
आजानुबाह सरळ सुनीळ गगनाहुनी कोमळ हो । सुपाणि रम्य स्थळ देखुनि रवितेज सोज्ज्वळ हो । मुद्रिका फांकती कीळ सतेज ग्रहमंडळ हो । शरकार्मूक सह मेळे शोधित असुर तरुचीं मुळें हो ॥ सुंदर० ॥५॥
चिद्‍गगनाचा गाभा तैसी सुनीळ अंगप्रभा हो । देखोनि चिद्‍घनशोभा जैसी कांति चढली नभा हो । रतिनायकवल्लभा देखुनि नागर सांडी दंभा हो । प्रथमारंभ स्तंभाभरणें भूषित शामल शोमा हो ॥ सुंदर० ॥६॥
भरत बिभीषण पृष्ठीं सविता गुण मानित उत्कंठीं हो । जोडोनि करसंपुष्टी ध्यानीं मारुतीगानवेष्टी हो । देखुनियां सुखपुष्टी झाली प्रेमरसाची वृष्टी हो । सुख संतुष्टें हर्षें परमेष्टी कोंदे कमळा सृष्टि हो ॥ सुंदर० ॥७॥
नव पंकजलोचनी विस्मित करुणामृतसिंचनी हो । शिवसंकटमोचनी दुर्धर रजनीचरभंजनी हो । भवभयसंकोचनी भक्तां निर्भयपदसूचनी हो । रघुकुळउल्हासिनी भोजें विलसत चंद्राननी हो ॥ सुंदर० ॥८॥
अव्यक्त पार जीचा विचार खुंटे सहा अठरांचा हो । सुकाळ स्वानंदाचा याचा अंतरला दु:खाचा हो । जगदुद्धार मातेचा उत्तीर्ण नव्हे मी हे वाचा हो । रामदासीं भेदतरंग तुटोनि गेला साचा हो ॥ सुंदर० ॥९॥

॥ चाल भुत्याची ॥ ब्रह्मीं माया उदो । त्रिगुण काया उदो । तत्त्वच्छाया उदो । चारी खाणी उदो ॥१॥
चारी वाणी उदो । अनंत योगी उदो । विद्या बुद्धि उदो । नाना विधि उदो ॥२॥
कारण सिद्धि उदो । आगम निगम उदो । साधन सुगम उदो । ज्ञान संगम उदो ॥३॥
देवां भक्तां उदो । योगी मुक्तां उदो । अनंत सिद्धां उदो । उदो दासा उदो ॥४॥

॥ आरती ॥ अजरामर पन्नगधर वैश्वानर भाळीं । रसाळवदनें विशाळ नयनांजन भाळीं । शूळी वेष्टित सुरवर किन्नर ते कालीं । हाटक करुणाटक करुणाकल्लोळीं । जयदेवी जयदेवी जय वेदमाते । आरती ओवाळूं तुळजे गुणसरिते ॥ जय० ॥१॥    
हंसासन जगजीवन मनमोहन माता । पवनाशन चतुरानन थक्कित गुण गातां । अमृतसंजीवनी अंतसुखसरिता । दासा पालन करितां त्वरिता गुनभरिता ॥ जय० ॥२॥
रामाबाई माझे आई । करुणा तुला येऊं दे ॥ ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP