वारांची गीते - रविवार
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥ अभंग ॥ धन्य सूर्ववंश पुण्यपरायण । सर्वही सगूण समुदाव ॥१॥
समुदाव काय सांगूं श्रीरामाचा । अंतरीं कामाचा लेश नाहीं ॥२॥
लेश नाहीं तया बंधू भरतासी । सर्वहि राज्यासी त्यागियेलें ॥३॥
त्यागियेलें अन्न केलें उपोषण । धन्य लक्षूमण ब्रह्मचारी ॥४॥
ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक । श्रीरामीं सार्थक जन्म केला ॥५॥
जन्म केला धन्य वाल्मीक ऋषीनें । धन्य तीं वचनें भविष्याचीं ॥६॥
भविष्य पाहतां धन्य बिभीषण । राघवीं शरण सर्व भावें ॥७॥
सर्व भावें सर्व शरण वानर । धन्य ते अवतार विबुधांचे ॥८॥
विबुधमंडण राम सर्वगुण । अनन्या शरण रामदास ॥९॥
॥ भजन ॥ रामा रामा हो रामा ॥
॥ अभंग ॥ दासाची संपत्ति राम सीतापती । जिवाचा सांगती राम एक ॥१॥
राम एक माता राम एक पिता । राम एक भ्राता सहोदर ॥२॥
सहोदर विद्या वैभव कांचन । सर्व हा स्वजन राम एक ॥३॥
राम एक स्वामी राम हा कैवारी । लाभ या संसारीं राम एक ॥४॥
राम एक ध्यान । राम समाधान रामदासीं ॥५॥
॥ भजन ॥ तूं माय मी लेंकरूं । राघवा नको विसरूं रे नको विसरूं ॥
आरत्या
॥ आरती रामाची ॥ किरटि कुंडलें माला वीराजे । झळझळ गंडस्थळ घननीळ तेनू साजे । घंटा किंकिणी अंबर अभिनव गति साजे । अंदू वांकी तोडर नूपुर ब्रिद गाजे । जयदेव जयदेव जय रघुवीरेशा । आरती निर्जरवर ईशा जगदीशा । जय० ॥१॥
राजिवलोचन मोचर सुरवर नरनारी । परतर पर अभयंकर शंकरवरधारी । भूषण मंडित उभा त्रिदशकैवारी । दासा मंडण खंडण भवभय अपहारी ॥२॥ जयदेव० ॥
॥ आरती बहिरोबाची ॥ दक्षिणदेशामाजीं भैख तो देव । क्षेत्रपाळ वंदी लोकत्रय भाव । भक्तासी देखूनि चरणीं दे ठाव । देवाचा तारक भैरव देव । जयदेव जयदेव जय भैरव देवा । सद्भावें आरती करितों मी देवा । जय० ॥१॥
वामांगीं जोगेश्वरि शोभे सुंदर । कासे पीतांबर वाद्यांचा गजर । भक्तासि देखोनि हरि कृपाकर । रामदास चरणीं त्या मागे थार । जयदेव० ॥२॥
॥ आरती खंडोबाची ॥ पंचानन हयवाहन सुरभूषण लीला । खंडामंडित दंडित दानव अवलीळा । मणिमल्ल मर्दूनी धूसर जो पिंवळा । करिं कंकण बाशिंगें सुमनांच्या माळा । जयदेव जयदेव जय जय मल्हारी । वारी दुर्जन वारी निंदक अपहारी । जय० ॥१॥
सुरवर सैवर दे मज नाना देवा । नाना नामें गाइन घडे तुझी सेवा । अगणित गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर स्मरला जेथें नर पामर केवा । जय० ॥२॥
रघुवीरस्मरणें शंकर हदयीं नीवाला । तो हा मदनांतक अवतार झाला । यालागीं आवडीं भावें वर्णीला । रामीं रामदासा जिवलग भेटला ॥ जयदेव० ॥३॥
॥ आरती कृष्णाची ॥ करुणाकर गुणसागर गिरिवरधर देवें । लीलानाटक वेष धरिला स्वभावें । अगणितगुणलाधव हें कवणा ठावें । व्रजनायक सुखदायक काय वर्णावें । जयदेव जयदेव जय राधारमणा । आरती ओवाळूं तुज नारायणा ॥ धृ० ॥ जय० ॥१॥ वृंदावन हरिभुवन नूतन तनु शोभे । वक्रांगें श्रीरंगें यमुनातटिं शोभे । मुनिजनमानसहारी जगजीवन ऊभे । रविकुळटीळकदास पदरज त्या लाभे ॥ जय० ॥२॥
॥ आरती केदाराची ॥ जयदेव जयदेव जयजी केदारा । दासा संकट वारा भवभय अपहारा ॥धृ०॥ भागीरथिमूळ शीतळ हिमाचळवासी । न लागत पळ दुर्जन खळ संहारी त्यासी । तो हा हिमकेदार करवीरापाशीं । रत्नागिरिवरि शोभे कैवल्यरासी ॥१॥
जयदेव० ॥ उत्तरेचा देव दक्षिणे आला । दक्षिणकेदारसें नाम पावला । रत्नासुर मर्दुनि भक्तां पावला । दास म्हणे थोरा दैवें लाधला ॥२॥ जयदेव० ॥ ॥२५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2014
TOP