वारांची गीते - शुक्रवार

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ अभंग ॥ कांहो राममाये दुरि धरियेलें । कठीण कैसें झालें चित्त तूझें ॥१॥
देऊनि आलिंगन प्रीतिपडीभरें । मुख पीतांबरें पुसशील ॥२॥
घेऊनि कडिये धरुनि हनुवटी । कईं गुजगोष्टी सांगसील ॥३॥
रामदास म्हणे केव्हां संबोखिसी । प्रेमपान्हा देशी जननिये ॥४॥
॥ भजन ॥ येईं धांवत रामाबाई । दासासी दर्शन देंई ॥

॥ पद ॥ येंई हो रामाबाई । माझे येईं हो रामाबाई ॥धृ०॥ अनंतरूपें व्यापें दानव-दर्पे पूर्णप्रतापें । तव नामें कळिकाळ कांपे ॥१॥
तुझा छंद लागलागे माये निशिदिनिं या जीवासी । तुजविण मी परदेशी ॥२॥
रामीं रामदासीं आराम करणें हेंचि तुला उचित । झणीं उपेक्षिसी काय आतां उरला माझा अंत ॥३॥

॥ पदो । लो लो लागला लो । आदिशक्तीचा लागला लो । अंतरिं लो बहिर लो । जिकडे तिकडे लागला लो ॥१॥
अंडज लो जारज लो । स्वेदज लो उद्भिज लो । देवा लो दानवा लो । सिद्ध साधका लागला लो ॥२॥
दास म्हणे तोचि जाणे । सद्रुरुवचनीं सुख बाणे ॥३॥

॥ आरती व्यंकटेशाची ॥ अवहरणी पुष्करणी अगणित गुणखाणी । अगाध महिमा स्तवितां न बोलवे वाणी । अखंद तीर्थावळी अचपळ सुखदानी । अभिनव रचना पाहतां तन्मयता नयनीं ॥ जयदेव जयदेव जय व्यंकटेशा । आरती ओवांळू स्वामी जगदीशा ॥ जय० ॥१॥
अति कुसुमालय देवालय आलय मोक्षाचें । नानानाटकरचना हाटकवर्णाचें । थक्कित मानस पहातां स्थळ भगवंताचें । तुळणा नाहीं तें हें भूवैकुंठ साचें ॥ जय० ॥२॥  
दिव्यां-बरधर सुंदरतनु कोमल नीला । नाना रत्नें नाना सुमनांच्या माळा । नानाभूषणमंडित वामांगीं बाळा । नाना वाद्यें मिनला दासांचा मेळा ॥ जय० ॥३॥

॥ आरती कृष्णेची ॥ सुखसरिते  गुणभरिते दुरितें नीवारी । नि:संगा भवभंगा चिदू-गंगा तारी । श्रीकृष्णे अवतार जलवेषधारी । जलमय देहें निर्मल साक्षात हरी ॥ जयदेवी जयदेवी जय माये कृष्णे । आलों तुझिया उदरा निरसी मम तृष्णे ॥ जय० ॥१॥
हरिहर सुंदर ओघ ऐक्याची आले । प्रेमानंदें बोधें मिळणी मीळाले । ऐशिया संगमीं मिसळोनि गेले । रामदास त्यांचीं वंदी पाऊलें ॥ जय० ॥२॥ ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP