मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|संतांच्या स्मृतीत चोखामेळा|

संत नामदेवांच्या स्मृतीत चोखामेळा

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


चोखामेळा चरित्र :


चोखामेळ्यानें पाजियेलें दहीं । पडों दिलें नाही उणें त्याचें ॥१॥
तयाचें चरित्र परिसावें सादर । करितों नमस्कार संतजनां ॥२॥
तयाची जे कांता तयाच सारिखी । भावार्थ नेटकी आवडीची ॥३॥
साधन द्वादशी आली एके काळी  । उठोनि प्रात:काळी काय बोले ॥४॥
उठी उठी कांते स्वयंपाक करी । आतां येतील हरि पारण्यासी ॥५॥
तंव एक्या ब्राम्हाणें आइकिली मात । तेणें दिवाणास सांगितलें ॥६॥
दिवाणानें दूत पाठविले त्यासी । चोखामेळ्यासी धरूनि आणा ॥७॥
दूती जाऊनियां धरूनि आणिलें । म्हणे काय झालें चोखामेळा ॥८॥
विठोबासी दहीं पाजीत असतां । कां हो माझ्या हातां आसडिलें ॥९॥
रडतो हा कां रे सभेसी पुसती । तो म्हणे वृत्तांत ऐसा झाला ॥१०॥
रूसूनियां विठो गेला म्हणूऊनि । रडे दीर्घध्वनी करूनिया ॥११॥
म्हणति या महारानें देव बाटविला । जिवें मारा याला बैल जुंपा ॥१२॥
बांधोनिया  पाय हांकियले बैल । धरूनि शिवळ विठो उभा ॥१३॥
उडती आसूड बैलांचे पाठीं । मारितां हिपुटी थोर झाली ॥१४॥
तयाची ते कांता उभी राहूनियां । म्हणे देवराया हात काढी ॥१५॥
खाइलें जेविलें त्याचा हा उपकार । दुबळीचा भ्रतार मारूं पाहसी ॥१६॥
पालिलें पोसिलें माझिया धन्यासी । उतराई झालासी ओढावया ॥१७॥
अन्नाची त्वां क्रिया नाही रे राखिलीं । रांडकी त्वां केली चोखियाची ॥१८॥
काढी हात आतां जाय परता उसण्या । जाय पोट पोसण्या येथूनियां ॥१९॥
चोखा म्हणे रांडे विश्वाचा पोसणा । संतांचा देखणा विठो माझा ॥२०॥
जन लोक पुसती कोणा बोलतीस । ते म्हणे तुम्हांस काय दिसे ॥२१॥
अनंत ब्रम्हांडे जयाचें उदरीं । त्यानें चहूंकरी धरियेलें ॥२२॥
पीतांबरधारी घन: श्याम मूर्ती । रखुमाईचा पति विठ्ठल हा ॥२३॥
समस्तांसी तेव्हां दिलें दरूशन । केलें समाधान नामा म्हणे ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP