चोखामेळा यांच्या समाधीचे अभंग
श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते.
१) मंगळवेढया भोवतें कुसूं घालावया । महारासी न्यावया दूत आले ॥१॥
महारासमागमें चोखामेळा गेला । काम तें लागला करावया ॥२॥
सर्वकाळ वाचे विठ्ठलनाम छंद । आठवी गोविंद वेळोवेळां ॥३॥
चार महिने याचि रीतीनें लोटलें । कुसूं कडाडिलें आकस्मात ॥४॥
तयाखाली महार बहु चुर झालें । चोख्यानें अर्पिले प्राण देवा ॥५॥
देव म्हणे नाम्या त्वां जावें तेथें । त्याच्या आस्थि येथें घेऊनि याव्या ॥६॥
नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या । विठ्ठल नाम जयामध्यें निघेल ॥७॥
२) ऐकोनियां कानीं अंचळी भराव्या । आणोनियां द्याव्या आम्हापासीं ॥१॥
शालिवाहन शके बाराशें साठ । प्रमाथी नाम स्पष्ट संवत्सर ॥२॥
वैशाख वद्य पंचमी सुदीन । गुरूवारी प्रयाण करी चोखा ॥३॥
चोखा माझा जीव चोखा माझा भाव । कुळ धर्म देव चोखा माझा ॥४॥
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति । मी हि आलों व्यक्ति तयासाठीं ॥५॥
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान । तया कधीं विघ्न पडो नेदी ॥६॥
नामदेवें आस्थि आणिल्या पारखोनी । घेत चक्रपाणी पितांबरी ॥७॥
३) देवाच्या अंचळी उठिला गजर । विठ्ठलनाम अंबर गर्जतसे ॥१॥
संत समुदाय पताकांचें भार । लोटले गजर ऐकावया ॥२॥
वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार । नामाचा गजर महाद्वारीं ॥३॥
ऐसी आनंदानें नामाच्या गजरीं । दिली महाद्वारीं समाधि त्या ॥४॥
आस्थि निक्षेपण आपुलिया हातें । करूनि अनंतें पाषाण ठेवी ॥५॥
राही रखुमाई कुर्वंडी करिती । सत्यभामा आरति ओवाळीत ॥६॥
नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा । जाईन माझ्या बापा ओवाळून ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : July 10, 2014
TOP