पंचम पटल - ज्ञानरूपविघ्नकथनम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
श्रीशंकर म्हणतात की, हे श्रेष्ठ असणार्या पार्वती ! आता मी ज्ञानरूपी विघ्नांचे कथन करतो. साधकाने गोमुखासन घालून धौती क्रिया करून अर्थात् लंगोटीसारखे सात हात लांब असलेले स्वच्छ व शुद्ध वस्त्र तोंडाने गिळून शरीरातील आतड्यांचे प्रक्षालन म्हणजे शुद्धीकरण करणे, नाडीसंचाराचे विज्ञान प्राप्त करणे, प्रत्याहार साधावा म्हणून अत्यंत निग्रहाने, निश्चयाने व बलाने कान, नाक इत्यादि इंद्रियांचा निरोध करणे, वायूचे चालन व्हावे किंवा कुंडलिनी शक्तीची जागृती व्हावी म्हणून कुक्षी संचालन करणे, इंद्रियद्वारा शीघ्र प्रवेश करणे ही सर्व ज्ञानरूपी विघ्ने आहेत. हे देवी कल्याणी ! आता नाडीशुद्धीसाठी भोजनविधी कसा असावा हे सांगतो, तो तू ऐक.
जर दररोज साधकाने शरीरातील नऊ धातूंना पोषक असे षड्रसयुक्त भोजन आणि त्याचप्रमाणे सुण्ठीच्या चूर्णाचे सेवन केले; तर त्याला समाधी तत्काल सिद्ध होते. हे देवी ! मी त्याचे लक्षण सांगतो ते तू ऐक.
साधूच्या संगतीची अभिलाषा व दुर्जनांपासून दूर राहण्याचा विचार किंवा निश्चय ठेवणे, प्राणवायूचा सुषुम्नेत प्रवेश होताना व तो वायू सहस्रारातून परत येताना गुरुलक्ष्याचे अर्थात् सहस्रारातील अंतिम शिवसामरस्यात्मक स्थितीचे अवलोकन करणे, शरीरात स्थित असलेल्या आत्मरूपाचा विचार म्हणजे मीच ब्रह्म आहे असा विचार तैलधारवत् अखंड ठेवून रूपवान व रूपरहित काय आहे याचा निर्णय करणे आणि हा दृश्य प्रपंचात्मक संसार किंवा जगत् हे ब्रह्म आहे असा विचार हृदयात स्थिर ठेवणे, ह्या सर्व गोष्टी किंवा विचार साधनातील ज्ञानरूप विघ्ने आहेत असे समजले पाहिजे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP