पंचम पटल - राजयोगकथनम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
टाळूच्या वरच्या भागात दिव्य स्वरूपाचे सहस्रदलकमल आहे. हे कमल किंवा चक्र ब्रह्माण्डरूपी शरीराच्या म्हणजे आज्ञाचक्रापासून ब्रह्मारंध्रापर्यंत असलेल्या भागाच्या बाहेर विद्यमान आहे. ( मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंतच्या शरीराच्या भागाला पिंड व आज्ञाचक्रापासून सहस्रारांतर्गत ब्रह्मरंध्रापर्यंतच्या भागाला ब्रह्मांड म्हणतात. ) हे सहस्रदलकमल साधकाला मुक्ती देणारे आहे; ( कारण येथे शिवाचे वास्तव्य असून मूलाधारातून वर येणार्या जीव किंवा प्राणरूप शक्तीचे या ठिकाणीच शिवाशी समरसीकरण होऊन त्यांना आपण जीव किंवा शक्ती नसून शिवच आहोत याचे ज्ञान होते. ) या सहस्रार कमलाला किंवा चक्राला कैलास म्हणतात; ( कारण हे स्थान शरीरात सर्वात वर असून कैलासाप्रमाणे ते उच्च आहे. ) या स्थानात महेश्वराचा निवास आहे. या महेश्वराचे नाव अकुल असून तो अविनाशी आहे. ( कुल म्हणजे कुण्डलिनी शक्ती व अकुल म्हणजे शिव होय. ) याचा र्हास किंवा वृद्धी कधीही होत नाही.
या सहस्रारचक्राचे ज्ञान झाले की, पुरुषाचा म्हणजे साधकाचा या संसारात पुन्हा जन्म होत नाही म्हणजे तो जन्ममरण परंपरेतून मुक्त होतो. या ज्ञानयोगाच्या निरंतर अभ्यासामुळे साधकाला भूतमात्राची अर्थात् जीवमात्राची किंवा समस्त पदार्थांची उत्पत्ती, स्थित व संहार करण्याची शक्ती प्राप्त होते. तात्पर्य असे की, सहस्ररचक्राच्या ज्ञानामुळे साधक सर्वसमर्थ होतो.
या कैलास नावाच्या स्थानात परमहंसाचा निवास आहे अर्थात् परमहंसरूपी शिव किंवा महेश येथे राहतो. जो साधकयोगी या स्थानात चित्त स्थिर करतो त्याच्या सर्व व्याधींचा नाश होऊन विपत्तींचा क्षय होतो व तो मृत्यूपासून मुक्त होऊन अमर किंवा चिरंजीव होतो.
ज्यावेळी योगीसाधक या कुल नावाच्या परमेश्वरामध्ये चित्तवृत्ती लीन करील अर्थात् तो त्याच्याशी लय पावेल त्यावेळी त्याला समाधिसाम्य किंवा साम्यसमाधी म्हणजे ईश्वरैक्यप्राप्ती होऊन निश्चलता प्राप्त होईल. याचा अर्थ असा की, सहस्रारात पोहोचल्यावर साधकाला शिवशक्तिसामरस्यात्मक किंवा जीवशिवैक्यात्मक अंतिम स्थिती प्राप्त होते.
अशा प्रकारे निरंतर ध्यान केल्याने साधकयोग्याला जगताचे विस्मरण होऊन त्याला विचित्र सामर्थ्याची प्राप्ती होते हे नितांत सत्य आहे.
जो योगी सहस्रदलकमलातून स्रवणारे अमृत निरंतर प्राशन करतो तो मृत्यूच्या मृत्यूचीही व्यवस्था लावून कुलाला म्हणजे कुण्डलिनी शक्तीला अर्थात् तिच्या द्वारा निर्माण झालेल्या पिंडब्रह्माण्डात्मक संसाराला जिंकतो व चिरंजीव होतो. याचा अर्थ असा की, साधक संसार व मृत्यू यांना जिंकून अमर होतो. ज्यावेळी या सहस्रदलकमलात कुलस्वरूप कुण्डलिनी शक्तीचा लय होतो त्यावेळी चतुर्विध सृष्टीचाही परमात्म्यामध्ये लय होतो अर्थात् ज्यावेळी शिवशक्तीचे मीलन होते त्यावेळी पिंडब्रह्मांडाचा लय होतो.
या सहस्रदलकमलाचे ज्ञान प्राप्त झाल्यावर साधकाच्या चित्तवृत्तीचा लय होतो. या करिता अत्यंत निरपेक्षपणे साधकयोग्याने या चक्राचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून परिश्रम करावेत.
ज्यावेळी साधकाची चित्तवृत्ती सहस्रारचक्रात अखंडपणे किंवा निश्चितपणे लय पावेल त्यावेळी तो खरा योगी होईल व त्याला अखंड ज्ञानस्वरूप अशा निरंजन आत्म्याचा प्रकाश प्राप्त होईल.
ब्रह्माण्डाच्या बाहेर म्हणजे मस्तकाच्या वर किंवा शरीराच्या बाहेर, मागे कथन केल्याप्रमाणे, आपल्या प्रतीकाचे चिंतन किंवा ध्यान करावे. ज्यावेळी या ध्यानात चित्त स्थिर होईल किंवा ध्यानातच चित्त स्थिर करून त्यातच महाशून्याचे चिंतन केले पाहिजे.
जो आदि, मध्य व अंती शून्यरूप आहे म्हणजे जो सर्वत्र शून्यस्वरूप आहे, ज्याची प्रभा कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे व ज्याचा प्रकाश कोटी चंद्रासारखा शीतल आहे अशा आत्म्याच्या दर्शनाचा अभ्यास करणार्या साधकाला परमसिद्धीची प्राप्ती होते.
जो साधक आळस सोडून देऊन नेहमी म्हणजे कायम किंवा निरंतर व प्रत्येक दिवशी या शून्याचे ध्यान करील अर्थात् या ध्यानात रत किंवा लीन राहील त्याला एक वर्षात सर्व सिद्धींचा लाभ होईल यात कसलाही संशय नाही.
जो साधक या शून्यामध्ये अर्ध्या क्षणभरही मन निश्चल किंवा स्थिर करील तोच खरा योगी व सद्भक्त असून तोच सर्व लोकात पूज्य होतो. अशा साधकाची सर्व पापे त्या क्षणीच नष्ट होतात.
या शून्याचे दर्शन घेतल्याने साधक मृत्युरूपी संसारमार्गाच्या भ्रमणातून सुटतो अर्थात् जन्ममरण परंपरेतून त्याची सुटका होते. या शून्यदर्शनाचा अभ्यास साधकाने स्वाधिष्ठान चक्राच्या मार्गापासून मोठ्या सावधानपणे यत्नपूर्वक करावा.
श्रीशंकर म्हणतात, हे देवी पार्वती ! या शून्याच्या ध्यानाचे माहात्म्य मी वर्णन करू शकत नाही अर्थात् या ध्यानाचा महिमा इतका मोठा आहे की, त्याचे वर्णन कोठपर्यन्त करावे ? जो साधक हे ध्यान क्रतो किंवा साधतो तो व याचा महिमा जाणतो व तो माझ्या इतक्याच योग्यतेचा आहे.
या शून्याचे ध्यान करणारा साधकच या ध्यानाचे अद्भुत फ़ल काय आहे हे जाणतो. या ध्यानाच्या प्रभावाने अणिमादि सिद्धींची प्राप्ती होते यात कसलाच संशय नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP