पंचम पटल - राजाधिराजयोगकथनम्

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


हे पार्वती ! मी कथन केलेला हा राजयोग सर्व तंत्रांमध्ये गुप्त आहे. आता मी राजाधिराजयोग विस्तारपूर्वक सांगतो. ( तो तू श्रवण कर. )

साधकाने जन्तुरहित म्हणजे लोकांच्या व जन्तूंच्या उपसर्गापासून मुक्त असलेल्या अशा एकान्त स्थानामधील सुंदर मठात राहून यत्नपूर्वक गुरूची पूजा करावी व स्वस्तिकासनात बसून ध्यानाभ्यास करावा.

बुद्धिमान् साधकयोग्याने वेदान्त युक्तीनुसार जीवाला व मनाला निरालम्ब म्हणजे आलम्बरहित अर्थात् साक्षीभावयुक्त करून दुसर्‍या कशाचेही चिंतन करू नये. याचा अर्थ असा की, साधकाने मी असंग, कूटस्थ, निर्विकार व सर्वसाक्षी परब्रह्म आहे असे तैलधारवत् अखंड चिंतन करावे. हे चिंतन करीत असताना दुसरा कोणताही विचार किंवा वृत्ती उत्त्पन्न होऊ देऊ नये.

अशा प्रकारे ध्यान केल्याने महासिद्धी उत्पन्न होते यात काहीही संशय नाही. या ध्यानाने मन वृत्तिहीन करून साधक स्वत:च पूर्णपणे आत्मरूप होतो.

जो साधकयोगी वरील प्रकारे निरन्तर साधन करतो त्याच्या सर्व इच्छा नष्ट होतात म्हणजे त्याची कोणतीही कामना शिल्लक राहत नाही. ‘ मी ’ नावाची कोणतीही वस्तू त्याच्या दृष्टीने नसते किंवा ‘ मी ’ अगर ‘ माझे ’ असे शब्द त्याच्या मुखातून कधी उच्चारलेच जात नाहीत. तो सर्व वस्तू आत्मस्वरूप पाहतो.

बंधन काय आहे ? मोक्ष काय आहे ? ( याचा विचार न करता ) सर्वदा एक परिपूर्ण आत्माच सर्वत्र भरून राहिला आहे असे पाहून जो साधकयोगी या प्रकारे नित्य चिंतन करतो तो मुक्त आहे यात काहीही संशय नाही. असा योगीच खरोखर सद्भक्त असून तो सर्व लोकात पूजनीय होतो.

‘‘ मीच तो परमात्मा आहे ” अशा प्रकारे विचार किंवा मनन करून साधकाने जीवात्मा व परमात्मा हे समान किंवा एक आहेत असे समजून भेदरहित व्हावे. ‘ मी ’ आणि ‘ तू ’ हा भेदभाव सोडून देऊन त्याने एका अखंड ब्रह्माचेच चिंतन करावे. अध्यारोप व अपवाद या युक्तींच्या द्वारा ज्यात सर्व वस्तूंचा लय होतो, त्या बीजाचा म्हणजे आत्म्याचा, सर्व संग सोडून देऊन आश्रय घ्यावा अर्थात् अन्तर्बाह्य सर्वसंग त्याग करून एकान्त स्थानी राहून चित्तवृत्तीचा आत्म्यात म्हणजे शक्तीचा शिवात लय करावा.

मूढ बुद्धीचा म्हणजे भ्रमाने व्याप्त झालेला माणूस प्रत्यक्ष असलेल्या परिपूर्ण ब्रह्माचा त्याग करून भ्रमातच पडून राहतो आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष किंवा परोक्ष व अपरोक्षाच्या निर्णयाच्या विचारात रात्रंदिवस फ़िरत राहतो.

हे चराचर विश्व परोक्ष आहे असा जे तर्क करतात किंवा संसाराच्या परोक्षतेबद्दल अर्थात् तो नसल्याबद्दल शास्त्रीय वादविवाद करतात आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष असलेल्या परब्रह्माचा त्याग करतात अशा अज्ञानी लोकांचा संसारातच लय होतो अर्थात् असे वादविवाद करणारे पंडित लोक संसार बंधनातून मुक्त होत नाहीत व त्यांना ब्रह्म किंवा मोक्षही प्राप्त होत नाही.

ज्यामुळे ज्ञान उत्पन्न होते व अज्ञानाचा नाश होतो अशा प्रकारचा योगाभ्यास नेहमी संगरहित अर्थात् अंतर्बाह्य अशा दोन्ही प्रकारची संगती सोडून देऊन योगीसाधकाने केला पाहिजे.

बुद्धिमान् योगीसाधक इंद्रियांना विषयांपासून आवरून किंवा वेगळे करून अगर रोखून आणि संगरहित होऊन विषयांचा त्याग करताना सुषुप्तीसारखे स्थिर राहतात.

अशा प्रकारे नित्य साधनाभ्यास केल्याने साधकाच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश स्वत:च प्रकाशित होतो. ( अशी स्थिती जेव्हा प्राप्त होते तेव्हा ) गुरूच्या वचनाची निवृत्ती होते म्हणजे गुरूच्या उपदेशाचा शेवट होतो अर्थात् ज्ञान अंतरात स्वत: प्रकट किंवा प्रकाशित झाल्यावर म्हणजे साधन साध्यात परिणत झाल्यावर गुरूंनी सांगितलेल्या विधिविधानाची आवश्यकता राहत नाही आणि इतर काही उपदेश ऐकण्याची किंवा पुरुषार्थयुक्त साधन करण्याची इच्छा निवृत्त होते. या योगाभ्यासाच्या द्वारा साधक स्वत:च किंवा आपला आपणच त्या अद्भुत ज्ञानात प्रवृत्त होतो अर्थात योगाभ्यासामुळे साधक स्वत:च ज्ञानरूप होतो.
ब्रह्मापासून किंवा परमात्म्यापासून वाणी मनासह मागे फ़िरते म्हणजे ब्रह्म वाणीने किंवा मनाने प्राप्त होत नाही; कारण ब्रह्म हा हा मनाचा किंवा वाणीचा विषय नाही अर्थात् ब्रह्म कोणत्याच साधनाने प्राप्त होत नाही. याचा अर्थ असा की, वाणीने म्हणजे जप, नामस्मरणादि  साधनाने किंवा मनाने म्हणजे ध्यानादि साधनाने ब्रह्मप्राप्ती होत नाही; कारण ही सर्व साधने कल्पनान्तर्गत आहेत व ब्रह्म ही कल्पनातीत वस्तू आहे. जसे साध्य तसे साधन आवश्यक असते. यासाठी सिद्धयोगासारख्या कल्पनातीत साधनाचा आश्रय घेणे आवश्यक आहे. योगसाधनामुळे निर्मल ज्ञान साधकाच्या ठिकाणी स्वत:च स्फ़ुरित किंवा प्रस्फ़ुटित होते हे नितांत सत्य आहे.

हठयोगाशिवाय राजयोगाची व राजयोगाशिवाय हठयोगाची सिद्धी होत नाही म्हणजे हे दोन्ही योग परस्परावलंबी आहेत. या करिता साधकाने सद्गुरूंनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे हठयोगात म्हणजे शिवशक्तीच्या सामरस्यसाठी प्रवृत्त झाले पाहिजे.

जो मनुष्य जिवंत असूनही योगाचा आश्रय घेत नाही, तो इंद्रियांचे भोग भोगण्यासाठीच संसारात जीवित राहतो, यात काहीच संशय नाही.

बुद्धिमान् साधकाने योगाभ्यासाच्या आरंभ कालापासून जोपर्यन्त अभ्यास सिद्ध होत नाही तोपर्यन्त मिताहारी म्हणजे अल्पभोजी राहणे आवश्यक आहे व याचे त्याने नेहमी स्मरण ठेविले पाहिजे. जर साधकाला या पथ्याचे विस्मरण झाले; तर अप्रमाण भोजन केल्याने साधक कितीही हुशार असला तरी त्याला साधनात सफ़लता प्राप्त होत नाही म्हणजे योगाभ्यासातून पार होऊन तो पलीकडे जात नाही व सिद्ध होऊ शकत नाही.

बुद्धिमान् योगीसाधकाने सभेमध्ये साधूच्या प्रमाणे अत्यंत थोडे, प्रमाणयुक्त अर्थात् शास्त्रसम्मत व अत्यंत चांगले बोलावे. त्याने शरीराचे रक्षण होईल किंवा शरीर टिकून राहील इतके थोडे भोजन करावे. याचा अर्थ असा की, साधकाने अल्प भोजन व अल्प भाषणच केले पाहिजे म्हणजे जेवढे भोजन व बोलणे आवश्यक आहे तेवढेच करावे, अनावश्यक करू नये. योग्याचे हे कर्तव्य आहे की, त्याने त्यागी बनून अंतर्बाह्य सर्व प्रकारच्या संगतीचा त्याग करून केव्हाही, कोणाच्याही व कोणत्याही संगामध्ये लिप्त होऊ नये. श्रीशंकर म्हणतात, हे पार्वती जो अशा प्रकारे सर्व संगत्याग करणार नाही म्हणजे असंग होणार नाही त्याला कदापीही मुक्ती मिळणार नाही. हे मी सत्य सांगत आहे, अगदी सत्यच सांगत आहे.

साधकाने संगरहित होऊन अर्थात् सर्व प्रकारचा संग सोडून देऊन एकान्त स्थानात राहून योगसाधन करावे. जर सांसारिक मनुष्यांशी व्यवहार करण्याची आवश्यकता पडली; तर कर्तव्य म्हणूनच आसक्ती किंवा प्रेमरहित होऊन बाह्यसंग अर्थात् बाह्य व्यवहार करावा. आपापल्या आश्रम - धर्मकर्माचा व्यवहारही जोपर्यंत म्हणजे जितकी त्याची आवश्यकता आहे तोपर्यंत करावा. ही सर्व कर्मे ज्ञानोत्पत्तीला निमित्तमात्र आहेत असे समजून केल्याने कोणताही दोष लागत नाही म्हणजे फ़लेच्छारहित होऊन कर्मे केल्याने ती पुनर्जन्माला कारण होत नाहीत.

अशा प्रकारच्या निश्चयी बुद्धीने जर गृहस्थानेही योगाभ्यास केला; तर त्यालाही सिद्धीचा लाभ अवश्य होईल यात काहीही संशय नाही.

जो गृहस्थ साधक पापपुण्य सोडून देऊन किंवा त्यापासून निर्लिप्त होऊन व सर्व प्रकारचा संग सोडून देऊन साधन करील; तो घरात राहत असतानाही मुक्त होतो. असा योगयुक्त साधक घरात राहूनही पापपुण्याने बद्ध होत नाही. जरी अशा गृहस्थ साधकाने सांसारिक वस्तूंच्या संग्रहाचे पाप केले; तरी ते पाप त्याला स्पर्श करू शकणार नाही.

श्रीशंकर म्हणतात, हे देवी पार्वती ! आता मी उत्तम किंवा श्रेष्ठ असे मंत्रसाधन सांगतो. ज्याच्या द्वारा साधकाला इहलोक व परलोक अशा दोन्ही ठिकाणी निर्विघ्न सुखाची प्राप्ती होते.

या उत्तम मंत्राचे ज्ञान झाल्यावर योग निश्चितपणे सिद्ध होतो आणि हे मंत्रसाधन योगाच्या बरोबर केल्याने ते सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख देणारे होते.

जे मूलाधारकमल आहे ते चार पाकळ्यांनी युक्त आहे. त्याच्यामध्ये विद्युत् प्रभेसारखे स्फ़ुरण पावणारे ( ऐं ) हे वाग्भवबीज आहे. हृदयस्थानामध्ये बन्धूक पुष्पासारखी प्रभा असलेले ( क्लीं ) हे कामबीज आहे आणि आज्ञाचक्रामध्ये कोटी चंद्राच्या प्रभेसारखे असलेले ( र्‍हीं ) हे शक्तिबीज आहे. ही तिन्हीही बीहे अत्यंत गुप्त असून ती भुक्ती व मुक्ती ही फ़ले देणारी आहेत. या करिता अशी सिद्धी देणार्‍या या तीन बीजमंत्राचा जप योगीसाधकाने अवश्य केला पाहिजे.

या मंत्रांचा गुरुमुखातून उपदेश घेऊन अत्यंत शीघ्रतेने किंवा अत्यंत हळू उच्चार न करता म्हणजे समरूपगतीने स्पष्ट उच्चारण करीत मंत्रातील प्रत्येक अक्षराचे अनुसंधान करून म्हणजे त्याच्या दैवी शक्तीकडे ध्यान देऊन किंवा गूढार्थाचे अनुसंधान करून संदेहरहित मनाने जप करावा.

बुद्धिमान् साधकाने एकाग्रचित्ताने शास्त्रविधीनुसार देवीच्या जवळ बसून एक लक्षाचा होम करावा म्हणजे अग्नीत एक लक्ष वेळा मंत्र म्हणून आहुती द्यावी आणि तीन लक्ष जप करावा.

बुद्धिमान् साधकाने जप पूर्ण झाल्यावर योनीच्या आकाराचे कुण्ड तयार करून कण्हेरीची फ़ुले, गूळ, दूध व तूप याचे मिश्रण करून अर्थात् या वस्तू एक करून त्याच्या आहुती देऊन होम करावा.

बुद्धिमान् साधकाने अशा प्रकारे म्हणजे प्रथम होम, मध्ये जप व शेवटी होम करून मंत्रानुष्ठापूर्वक आराधनेने किंवा सेवेने त्रिपुरभैरवी देवीला संतुष्ट केले; तर देवी त्याच्या सर्व कामना किंवा इच्छा पूर्ण करते.

अशा प्रकारची सिद्धी प्राप्त होण्यासाठी प्रथम विधिवत् म्हणजे शास्त्रीय रीतीने गुरूला संतुष्ट करून उत्तम किंवा श्रेष्ठ मंत्र ग्रहण केला पाहिजे. अशा प्रकारे शास्त्रपूर्वक मंत्र ग्रहण केल्याने मन्दभाग्य असलेला साधकही सिद्धी प्राप्त करतो.

जो साध्क इंद्रियांना जिंकून उपरोक्त मंत्राचा एक लक्ष जप करतो त्याच्या केवळ दर्शनानेच स्त्रिया कामातुर, मोहित, निर्लज्ज व भयरहित होऊन त्याच्यापुढे येऊन पडतात अर्थात् त्याला वश होतात.

या मंत्राचा दोन लक्ष जप केल्याने कुलीन स्त्रिया भय, लज्जा इत्यादि सोडून तीर्थामध्ये स्नान करतात अर्थात् आपली वस्त्रे काढून स्नान करतात त्याप्रमाणे कामिनी स्त्रिया निर्लज्ज भावाने साधकापाशी येतात व त्याला वश होऊन आपले सर्वस्व प्रदान करतात.

जर या मंत्राचा तीन लक्ष जप केला; तर राष्ट्राधिपती राजे आपल्या राष्ट्रांसह साधकाच्या ताब्यात येतात अर्थात् त्याच्या चरणी लोळण घेतात म्हणजे सर्व राजे आपल्या सामर्थ्यासह साधकाला नमन करतात किंवा शरण जातात यात काहीही संशय नाही. या मंत्राचा जर सहा लक्ष जप केला; तर साधक स्वत:च बल म्हणजे सेना, वाहन म्हणजे रथादि गोष्टी व सेवक आदींनी संपन्न असा पृथ्वीचा रक्षणकर्ता राजा होतो.

जर या मंत्राचा बारा लक्ष जप केला; तर असा जप करणार्‍या साधकाच्या ताब्यात यक्ष, राक्षस व नाग हे येऊन सदैव त्याच्या आज्ञापालनात तत्पर राहतात.

जर साधकाने या मंत्राचा पंधरा लाख जप केला; तर सिद्ध, विद्याधर, गन्धर्व, अप्सरा इत्यादि सर्व त्याला वश होतात यात काहीही संशय नाही. त्याचप्रमाणे एवढा जप केल्याने त्याला आपोआपच विशेष श्रवणशक्ती व सर्व वस्तूंचे ज्ञान प्राप्त होते.

जो साधक या मंत्राचा अठरा लक्ष जप करतो त्याचे शरीर दिव्य होते. तो भूमीचा त्याग करून आकाश मार्गाने संसारात इच्छापूर्वक भ्रमण करतो. त्याला पृथ्वीचे छिद्र पाहण्याचेही सामर्थ्य प्राप्त होते अर्थात् तो पृथ्वीतत्त्वामध्ये प्रविष्ट होण्याचा मार्गही पाहू शकतो.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP