या आज्ञाचक्राच्या वर टाळूच्या मुळात सुशोभित असे सहस्रारचक्र म्हणजे सहस्रदलकमल आहे. या ठिकाणीच ब्रह्मरन्ध्राच्या विवरमूलात सुष्मुम्नानाडी आहे म्हणजे मूलाधारातून वर आलेल्या सुषुम्नानाडीचे दुसरे टोक सहस्रारापाशी असून त्या मुखाला ब्रह्मरंध्र असे म्हणतात.
टाळूच्या मुळापाशी असलेल्या या सुषुम्नानाडीचे मुख खाली मूलाधारापाशी आहे. ( त्याला ब्रह्मद्वार म्हणतात. ) मूलाधारापासून योनीपर्यंत म्हणजे सहस्रारापर्यन्त जेवढ्या नाड्या जातात त्या सर्व सुषुम्नेच्या आश्रयाने राहणार्या, तत्त्वज्ञानाचे बीज किंवा रहस्य सामाविलेल्या आणि साधकाला ब्रह्ममार्गाचे दान करणार्या म्हणजे मुक्तीचा मार्ग दाखविणार्या नाड्या आहेत.
तालुस्थानात जे सहस्रारचक्र आहे त्याच्या कंदामध्ये पश्चिमाभिमुख अर्थात् पश्चिमेकडे किंवा पाठीमागे मुख असलेली एक योनी आहे. या योनीच्या मध्यभागी जे मूल विवर आहे त्यात सुषुम्नानाडी असते. याला ब्रह्मरन्ध म्हणतात. हे सहस्रारचक्र मूळरहित म्हणजे उपादानकारणरहित अर्थात् अनादि व आधाररहित असे आहे.
या सुषुम्नानाडीच्या रन्ध्रामध्ये कुण्डलिनी शक्ती नेहमी विराजमान असते. सुषुम्नेच्या आतमध्ये असलेल्या नाडीला चित्रानाडी असे म्हणतात. हे प्रिये पार्वती ! माझ्या मते ब्रह्मरन्ध्र इत्यादि सर्व कल्पना या नाडीच्या आधारानेच केल्या आहेत म्हणजे ब्रह्मरंध्रादि स्थाने चित्रानाडी गृहित धरून स्थिर किंवा निश्चित केली आहेत.
या चित्रानाडीच्या केवळ ध्यानाने ब्रह्मज्ञान उत्पन्न होते, सर्व पापांचा नाश होतो व योग्याला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही म्हणजे संसारचक्रातून त्याची मुक्तता होते.
उजव्या हाताचा अंगठा आपल्या मुखात घालू मुख दृढतापूर्वक बंद केल्याने शरीरात संचार करणारा प्राणवायू निश्चितपणे स्थिर होतो. याचा अर्थ असा की, या रीतीने वायुधारणा केल्याने प्राण स्थिर होतात.
अशा प्रकारे प्राणवायू स्थिर झाल्याने साधकाची संचारचक्रभ्रमणातून म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रात फ़िरत राहण्यापासून कायमची सुटका होते अर्थात् त्याला मोक्ष प्राप्त होतो. या करिता योगीसाधक प्राणवायूची धारणा करण्यास म्हणजे तो स्थिर करण्यासाठी प्रवृत्त होतात. अशी धारणा केल्याने अष्टपाशांनी निरुद्ध झालेल्या म्हणजे जरा, मरण, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार व अविद्या किंवा घृणा, लज्जा, भय, शोक, निंदा, कुल, शील व जाती यांनी अर्थात् या आठ प्रकारच्या मलांनी परिपूर्ण भरलेल्या सर्व नाड्या शुद्ध किंवा मोकळ्या होतात. ज्यावेळी नाडीशुद्धी होते त्यावेळी कुण्डलिनी शक्ती ब्रह्मरध्राचा त्याग करून त्यावर विराजमान असलेल्या शिवाशी एकरूप होते म्हणजे जीवात्म्याचे व परमात्म्याचे किंवा शिवाचे व शक्तीचे मीलन होते, हे नितांत सत्य आहे.
जेव्हा वायू निरुद्ध होऊन सर्व नाड्यांमधून पूर्ण भरून जाईल तेव्हा कुण्डलिनी शक्ती आपले बन्धन सोडून अर्थात् मूलाधारात साडे तीन वेढे घालून अनादि निद्रावस्था घेत म्हणजे बहिर्मुख वृत्तेने संसाराचा उपभोग घेत सतत संसारचक्रात फ़िरत राहण्याचे बंधन झुगारून देऊन ब्रह्मद्वाराच्या मुखाचा त्याग करते, त्यावेळी प्राणवायूचा प्रवाह सुषुम्नानाडीतून नेहमी वाहू लागतो. याचा अर्थ असा की, जो पर्यंत कुण्डलिनी शक्तीने अडविलेले ब्रह्मद्वाराचे मुख मोकळे होत नाही तो पर्यंत प्राणवायूचा संचार सुषुम्नेत होत नाही व पर्यायाने मुक्तीचा मार्गही मोकळा होत नाही.
मूलाधार कमलात विद्यमान असणार्या योनीच्या डाव्या भागात इडा व उजव्या भागात पिंगला नाडी आहे. या दोन नाड्यांच्या मध्ये सुषुम्नानाडी असून ती योनिस्थानातून जाते. या सुषुम्नानाडीच्या आधारमण्डलाच्या मध्यभागी ब्रह्मरन्ध्र आहे. जो बुद्धिमान् साधक हे जाणून घेतो म्हणजे याची अनुभूती घेतो तो कर्मबन्धापासून मुक्त होतो.
( इडा, पिंगला व सुषुम्ना ) या तीन नाड्यांचा ब्रह्मरंध्राच्या मुखात संगम झाला आहे म्हणजे त्या ठिकाणी त्या एकत्रित झाल्या आहेत, हे नि:संदेह सत्य आहे. या नाड्यांमध्ये म्हणजे या जेथे एकत्र झाल्या आहेत त्या ब्रह्मरंध्रामध्ये अर्थात् त्रिवेणीत जो ज्ञानी साधक स्नान करतो म्हणजे सद्गुरूकृपेने अर्थात् शक्तिपाताने जागृत झालेल्या कुण्डलिनी शक्तीला सुषुम्नागामित्व प्राप्त व्हावे म्हणून साधन करतो तो निश्चितपणे मुक्ती प्राप्त करतो.
गंगा म्हणजे इडा व यमुना म्हणजे सुषुम्ना या नाड्यांमधून सरस्वती म्हणजे सुषुम्नानाडी वाहते किंवा जाते. या तिन्ही नाड्या जेथे एकत्र येतात त्या नाड्यांच्या त्रिवेणी संगमात स्नान केल्याने साधक धन्य होऊन त्याला परमगती प्राप्त होते.
इडा ही गंगा आहे व पिंगला ही सूर्याची मुलगी यमुना आहे. हे पूर्वीच कथन केले आहे. या दोन नाड्यांच्या मध्ये सरस्वती म्हणजे सुषुम्ना आहे. ( या तीन नाड्या जेथे एकत्र येतात त्याला त्रिवेणी संगम म्हणजे तीर्थराज प्रयाग म्हणतात. ) या तिन्ही नाड्यांची संगती प्राप्त होणे म्हणजे त्या जेथे एकत्र येतात तेथे स्नान घडणे अर्थात् सद्गुरुकृपेने म्हणजेअ शक्तिपाताने कुण्डलिनी शक्ती जागृत होऊन अंतरंग साधन घडणे हे अत्यंत दुर्लभ आहे.
इडा व पिंगला नाड्यांच्या संगमात जो साधक मनाने स्नान करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन त्याचा सनातन ब्रह्मामध्ये लय होतो.
या त्रिवेणी संगमात जो साधक पितृकर्माचे अनुष्ठान करतो म्हणजे साधनाने सर्व कर्मबन्धने व पाश जाळून टाकतो अर्थात् प्राण सुषुम्नागामी करून शेवटी सहस्रारात लयावस्था प्राप्त करून घेतो तो आपल्या सर्व पितृकुलाला तारून स्वत: परमगती प्राप्त करतो.
जो साधक या संगमात नित्य, नैमित्तिक व काम्य कर्मांच अनुष्ठान मनाने चिन्तनपूर्वक करतो म्हणजे भोग व मोक्षाच्या इच्छेने साधनकर्माचे वरील प्रकारे अनुष्ठान करतो त्याला अक्षय फ़लाचा म्हणजे शिवसामरस्याचा लाभ होतो.
हो शुद्ध किंवा पवित्र बुद्धीचा योगीसाधक स्वत: एक वेळाही या संगमात स्नान करतो म्हणजे जागृत कुण्डलिनी शक्तीचे सुषुम्नेत चालन करतो तो आपली अशेष म्हणजे सर्व पापे जाळून टाकून स्वर्गातील दिव्य भोग भोगतो अर्थात् अशा साधकाला दिव्य सुखाची अवस्था प्राप्त होते. असा साधक पवित्र किंवा अपवित्र अशा कोणत्याही अवस्थेत, स्थितीत किंवा दशेत असला; तरी या संगमात स्नान केल्याने म्हणजे जागृत कुण्डलिनी शक्तीच्या आश्रयाने साधन केल्याने तो निश्चितपणे पवित्र होतो.
मृत्यूच्या वेळी जो साधक असे चिंतन किंवा ध्यान करील की, माझे शरीर त्रिवेणीच्या पाण्याशी एकरूप झाले आहे अर्थात् त्या पाण्यात ते विरघळून गेले आहे त्याक्षणी तो साधक प्राणत्याग करून मोक्ष प्राप्त करतो.
या तीर्थाच्या म्हणजे सहस्राराच्या पलीकडे त्रिभुवनात दुसरे गुप्त तीर्थ नाही. हे तीर्थ अत्यंत प्रयत्नपूर्वक गुप्त ठेविले पाहिजे. याची व्याख्या अर्थात् विवेचन करता कामा नये. याचा अर्थ असा की, त्रिवेणीत मानसिक स्नान करण्याचा विधी अत्यंत गुप्त आहे. हा विधी अधिकारी पुरुषाशिवाय अन्य कोणासही सांगू नये.
जर साधकयोगी ब्रह्मरंध्रात मन एकाग्र करून ते अर्धा क्षणही तेथे स्थिर करू शकला; तर तो सर्व पापांपासून मुक्त होऊन त्याला परमगती अर्थात् मोक्ष प्राप्त होतो.
श्रीशंकर म्हणतात हे पार्वती ! या ब्रह्मरंध्रात ज्या साधकाचे मन लीन होईल, तो पुरुषोत्तम म्हणजे पुरुषश्रेष्ठ योगी अणिमादि सिद्धी प्राप्त करून त्यांच्याद्वारा उपलब्ध होणार्या सुखांच उपभोग घेत आपल्या इच्छेने माझ्याशी लय पावतो म्हणजे एकरूप होतो.
हे देवी ! या ब्रह्मरंध्रांच्या केवळ ध्यानाने या संसारातील जीव मला प्रिय होतो आणि सर्व पापांना जिंकून तो साधक मुक्तिमार्गांचा अधिकारी होतो. असा साधक अनेक मुमुक्षांना उपदेश देऊन त्यांना संसरातून तारून नेतो.
हे देवी ! मी जे हे ब्रह्मरंध्राचे ध्यान सांगितलेले आहे ते प्रयत्नपूर्वक उत्तमप्रकारे गुप्त ठेवणेच उचित आहे. हे ज्ञान योगीसाधकांना अत्यंत प्रिय असून त्याचा मार्ग ब्रह्मादि देवतांनाही अगम्य आहे म्हणजे त्यांनाही सहस्रारचक्राच्या ध्यानाच मार्ग सुलभ नाही.
हे देवी ! मी पूर्वी कथन केल्याप्रमाणे सहस्रदलकमलाच्या मध्यभागी योनिमंडल आहे. या योनीच्या खालील भागात चंद्र स्थित आहे. बुद्धिमान् साधक या चंद्रमंडलाचे नेहमी ध्यान करतात.
या चंद्रम्डलाच्या केवळ स्मरणाने म्हणजे ध्यानाने योगीन्द्र संसारात पूजनीय होतो आणि तो देवता सिद्धलोकांसारखाच होतो किंवा तो त्यांच्याशी साम्यता प्राप्त करतो. याचा अर्थ असा की, असा योगीन्द देवता व सिद्धांसारखा ऐश्वर्यशाली होतो.
मस्तकात जे कपालविवर म्हणजे भ्रूमध्यात जे आज्ञाचक्राचे स्थान आहे तेथे क्षीरसमुद्राचा म्हणजे दुधाचा सागर असल्याचे ध्यान करावे व तेथे स्थिर राहून म्हणजे या ध्यानात मग्न होऊन सहस्रबलकमलातील चंद्रम्याचे चिन्तन करावे.
मस्तकात स्थित असलेल्या कपालविवरात म्हणजे आज्ञाचक्रात सोळा कलांनी युक्त व अमृताच्या किरणांनी संपन्न असलेल्या हंस नावाच्या म्हणजे मीच तो परमात्मा आहे अशा ध्यानयुक्त संज्ञेने बोधित होणार्या निरंजन म्हणजे शुद्ध परमात्म्याचे चिंतन करावे. अशा प्रकारे निरंतर ध्यानाभ्यास केला;तर निरंजन प्रमात्म्याचे साक्षात् दर्शन साधकाला तीन दिवसात निश्चतणे होते. या आत्म्याच्या केवळे दर्शनानेच साधक आपली सर्व पापे जाळून टाकतो.
( अशा प्रकारे शिरस्थ आज्ञाचक्रात प्ररमात्म्याचे चिंतन केल्याने ) अज्ञात विषयाची म्हणजे ज्ञानाची स्फ़ूर्ति किंवा स्फ़ुरण होते अर्थात् जे ज्ञान इतक्या दिवस उत्पन्न झाल्ये नव्हते म्हणजे सुप्त होते ते उत्पन्न होते व त्याची अनुभूती होऊ लागते. या ज्ञानामुळे निस्चितपणे चित्ताची शुद्धी होते आणि तत्काल साधक आपली पंचमहापातके जाळून टाकतो अर्थात् ज्ञानामुळे पंचमहापातके जळून भस्म होतात.
( उपरोक्त प्रकारच्या ध्यानाने ज्ञान झाल्यामुळे ) साधकाला सर्व ग्रह अनुकूल होतात. त्याच्या सर्व उपद्रवांचा नाश होऊन सर्व उपसर्गांचे शमन होते आणि साधनरूपी युद्धामध्ये त्याला जय प्राप्त होतो. शिरस्थ चंद्राच्या दर्शनाने किंवा ध्यानाने त्याला खेचरी व भूचरी सिद्धींची प्राप्ती होते यात काहीही संदेह नाही. केवळ या ध्यानाने हे सर्व काही घडून येते आणि निरंतर या योगाभ्यासात रत राहिल्याने साधक निश्चितपणे सिद्ध होतो. हे पार्वती ! असा साधक माझ्या ( शंकराच्या ) सारखा होतो हे माझे कथन सत्य आहे. अगदी सत्य आहे; नव्हे नितात्न सत्य आहे. हे योगशास्त्र अत्यंत श्रेष्ठ असून हे योगशास्त्र किंवा हा परमयोग योगीसाधकांना सिद्धी म्हणजे शिवशक्तिसामरस्याची अंतिम स्थिती प्रदान करणारा आहे.