अधिमात्रतम साधकाची लक्षणे अशी असतात. असा साधक महान् वीर्याने समन्वित म्हणजे महाबलाने युक्त, उत्साहयुक्त, स्वरूपवान्, शौर्यसंपन्न, शास्त्रज्ञ, अभ्यासशील, मोहरहित, आकुलतारहित म्हणजे सावधान, नवयौवनसंपन्न म्हणजे तारुण्याने मुसमुसलेला, मिताहारी अर्थात् नियमित दोन्ही वेळा अल्प प्रमाणात आहार करणारा, जितेन्द्रिय म्हणजे इंद्रिये ताब्यात असलेला, निर्भय, शुद्ध म्हणजे पवित्र आचार करणारा, दक्ष म्हणजे सर्व कार्यात सावधान किंवा चतुर अगर निपुण, दानशील, सर्व लोकांचे आश्रयस्थान असलेला म्हणजे शरणागतपालक, अधिकारी, स्थिरचित्त असलेला, आपली कार्ये गुप्त ठेवणारा, सर्वांशी प्रिय बोलणारा, शास्त्रांवर पूर्णपणे विश्वास असणारा, देवता व गुरूचे पूजन करणारा, लोकांच्या सहवासापासून किंवा संगतीपासून दूर राहणारा व कोणत्याही प्रकारची शारीरिक महाव्याधी नसलेला म्हणजे अत्यंत निरोगी असा असतो. या सर्व लक्षणांनी संपन्न असलेल्या साधकाला अधिमात्रतमसाधक असे म्हणतात. असा साधक सर्व योगांचा म्हणजे मंत्र हठ, लय व राज या चारही प्रकाराच्या योगांचा अधिकारी असतो. अशा साधकाला सद्गुरूंनी सर्व प्रकारच्या योगांचा उपदेश करावा. यात विचार करण्याचे काहीही कारण नाही.