विवेचनावरून स्मृतिकारांनी लिहिलेल्या आठ विवाहप्रकारांपैकी कित्येक प्रकार स्मृतिपूवकालीन असून त्यांचा प्रसार प्रत्यक्ष स्मृतिकाली नाहीसादेखील झाल्याचे व्यक्त होते. तसेच जे कित्येक प्रकार त्या काळी चालत असतील, त्यांतही कालमानाने फ़ेरफ़ार होत होत आजमितीला ब्राह्मणवर्गात बाह्यत: ब्राह्मविवाह, परंतु वस्तुत: पाहू गेल्यास प्रजापत्य व असूर, हे विवाह होत आहेत हेही स्पष्टपणे दिसून येत आहे. इतर वर्णांपैकी क्षत्रिय व वैश्य या दोन वर्णांच्या अस्तित्वासंबंधाने दाक्षिणात्य ग्रंथकारांची समजूत काही चमत्कारिक होऊन बसली आहे, व सांप्रतच्या कलियुगात ब्राह्मण आणि शूद्र या दोन वर्णांशिवाय दुसरे वर्णच जगात उरले नाहीत असे ते मानितात. जर क्षत्रिय व वैश्य या दोन वर्णांचा अभाव झाला असे मानिले, तर त्यांमध्ये होणारे विवाहाचे प्रकारही नाहीसे झाले असे म्हणावे लागणारच.
परंतु वास्तविक विचार करू गेल्यास त्यांची समजूत मुळातच चुकीची आहे, व तिच्या पुष्ठ्यर्थ त्याजकडून पुधे येणारा पुरावाही योग्य व पुरेसा नाही. ‘ कलावाद्यंतयो: स्थिति: ’ हे एक लहानसे वचन आदित्यपुराणात कोठेसे आहे, म्हणून निबंधग्रंथांतून लिहिलेले आढळते. परंतु मूळ पुराण उपलब्ध नसल्याने या एवढ्याच वचनावर भिस्त ठेवणे वाजवी होणार नाही. श्रीमद्भागवतात नऊ नंदराजे चाणक्य नावाच्या ब्राह्मणाने मारिले, व चंद्रगुप्तास राज्यपद दिले अशी कथा आली आहे. हा चंद्रगुप्त शूद्र होता, व त्याच्या वेळेपासून क्षत्रियवंश लयास जाऊन पुढे शूद्र राजे झाले, असे दाक्षिणात्य ग्रंथकारांचे ठाम मत आहे; परंतु भागवतग्रंथात फ़क्त सोम आणि सूर्य या दोन वंशाच्या राजांपुरताच काय तो उल्लेख झालेला आहे; यावरून विचार करू गेल्यास फ़ार फ़ार तर हे दोन राजवंश लुप्त झाले एवढेच काय ते मानिता येईल, पण क्षत्रियांचे इतर राजवंश त्याबरोबरच नाहीसे झाले असे मानण्यास विशेष बलवत्तर कारण पाहिजे.
परशुरामाने नि:क्षत्रिय पृथ्वी केली ही कथा प्रसिद्ध आहे. या कथेत परशुरामाने एकवीस वेळ क्षत्रियांचा संहार केल्याचे वर्णिले आहे. तथापि हे म्हणणे निव्वळ अर्थवादाचे असले पाहिजे. कारण पहिल्याच खेपेस जर पृथ्वीवरील सर्व क्षत्रिय नाहीसे झाले हे वर्णन खरे मानिले, तर त्यापुढील खेपेस पुनरपि नवीन क्षत्रिय कोठून उत्पन्न झाले हा प्रश्न राह्तोच, व त्याचे उत्तर पुराणग्रंथात कोठेही दिलेले नाही. अर्थात क्षत्रियांचा जोर परशुरामाने कमी केला, तथापि ते सबंध निर्वंश झाले नाहीत. एवढाच तर्क अखेर पत्करावा लागतो; तेव्हा त्याच तर्हेने चंद्रगुप्तकाली नंदपक्षीय इतर क्षत्रियही जीव घेऊन काही काळ लपून राहिले असतील असे मानण्यास काही हरकत नाही.
तशातून महाविष्णूचा कल्किसंज्ञेचा अवतार अद्यापि व्हावयाचा आहे, व तो होईल त्या वेळी ब्राह्मण, ज्ञत्रिय, वैश्य व शूद्र या चारी वर्णांमध्ये पुनरपि धर्मसंस्थापना होईल असे भविष्य ठरलेले आहे, त्या अर्थी या संस्थापनेच्या वेळी वर्णांची नवीन उत्पत्ती न होता जे क्षत्रिय व वैश्य वर्ण लुप्त झाल्याचे आमचे लोक समजतात, तेच पुन: स्वस्वरूपांनी प्रकट होणार, म्हणजे आजमितीला त्यांना जो स्वधर्माचा व आचारांचा विसर पडला आहे तो नाहीसा होऊन ते पुनरपि आपल्या धर्माप्रमाणे वर्तन करू लागणार; - अर्थात तो आजमितीसही - आचारभ्रष्ट स्थितीत का होईना - पण विद्यमान आहेत, असे कबूल केल्याशिवाय गत्यंतर नाही.
शिवाय आचाराने भ्रष्त नाही अशी स्थिती ब्राह्मणवर्णाची तरी कोठे आहे ? कलियुगाचे पाऊल हळूहळू पुढे पडत रहावयाचेच, त्या मानाने थोडीबहुत भ्रष्टता सर्वत्र आहेच आहे. प्रत्यक्ष ब्राह्मणमंडळातदेखील कित्येक जातींचे ब्राह्मण आपणहून इतरांस कमी प्रतीचे व धर्मलंड समजतात; त्याचप्रमाणे रजपूत, मराठे इत्यादी ज्ञातींतही एकमेकांसंबंधाने असेच प्रवाद असल्यास नवल मानण्याचे काही कारण नाही. वस्तुत: ही स्थिती अशीच चालावयाची; व तिच्या योगाने समाजबंधनांस शिथिलता ये रहावयाची, यात संशय नाही. परंतु कसेही झाले, तरी स्त्री आणि पुरुष यांचे विवाहसंबंध कोणत्या ना कोणत्या तरी तर्हेने होत रहावयाचेच, त्या अर्थी विवाहाचे जे निरनिराळे प्रकार वर वर्णिले, त्यांपैकीच कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारांची थोडीबहुत मिश्रणे होत जातील, पण समाजाचा क्रम चालू राहण्यास अडचण पडणार नाही.