मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक तर्क व उपसंहार|
भावी गांधर्वविवाह, व त्याचे स्वरूप

भावी गांधर्वविवाह, व त्याचे स्वरूप

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


असो; ही जी उदाहरणे दर्शविली ती पतीस गोत्राभिमान नाही, व स्त्रीवर्गाला स्वत:च्या अब्रूची चाड बाळगण्याची काही जरूर नाही, अशी सामुदायिक स्थिती असण्याचा प्रत्येक राष्ट्रात एकेकदा काळ येऊन जात असतो, तेव्हाची आहेत. प्रस्तुत काळी हीच उदाहरणे नीचपणाची मानिली जातील, व कालान्तराने आजमितीच्या कल्पना कोणीकडच्या कोणीकडे नाहीशा होऊन जाऊन त्यांच्या जागी याहूनही निराळ्या कल्पना उत्पन्न होती. वर क. १७९ येथे गांधर्वविवाहपद्धती शक्य असल्याचे सांगितले याचे कारन हेच होय.
संसार नीटपणे चालावयाचा म्हटले म्हणजे त्यात कृत्रिम अगर स्वाभाविक प्रेम थोडेबहुत असावयाचेच; व अनेक प्रसंगी ते मूळचे नसले तरी त्याची उत्पत्ती स्त्रीपुरुषांच्या सहवासापासून होऊ शकतेही. तथापि ते प्रेम मर्यादित असावयाचे, हा सामान्य नियम आहे. मोठमोठ्या ऋशींनी केलेली प्रेमाची वर्णने कितीही काल्पनिक सौन्दर्याने भरलेली असोत, व त्या वर्णनात प्रेमान्ध झालेली स्त्रीपुरुषे एकमेकांपायी आपल्या जिवाचे यथेच्छ बलिही अर्पण करीत असल्याचे कणी खुशाल दाखवोत, अशी उदाहरणे जगात केव्हाही झाले तरी अत्यंत विरळाच असावयाची, व यासाठी त्याबद्दलचा विचार करीत बसण्याचे काही कारण नाही.
आपणास विचार करावयाचा तो जगातील बहुजनसमाजात शक्य असणार्‍या गोष्टींपुरताच, व तसा विचार करून पाहिल्यास इतउत्तर शक्य असलेल्या गांधर्वपद्धतीने संयुक्त होणारी जोडपी अन्योन्य प्रेमाने वेडी होऊन न राहता परस्परांशी व्यावहारिक प्रेमाचे वर्तन करती, हेच तत्त्व निश्चित आहे; व व्यवहारत: विचार करू गेल्यास ही स्थिती झाली तरच स्त्रीपुरुषांच्या जगात येण्याचे काही तरी चीज होईल. स्त्रियांच्या मनात पतीविषयी खरे प्रेम असेल, तर ते त्यांस व्यावहारिक स्थितीत राहूनही पूर्णपणे दाखवैता येईल. ते दाखविण्यास सहगमन उपयोगी पडते असे म्हणण्यापेक्षा, सहगमनाचा विचार हा एक वेडाच्या अगर भ्रान्तीच्या भरात होणारा साहसाचा प्रकार; परंतु वस्तुत: जगातील भावी दु:खे व संकटे सोसण्याची अंगी शक्ती नसणे, अथवा मनाचा कुमकुवतपणाच होय, असे म्हणणे हे अधिक वाजवी होईल.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP