वेदमंत्रांचा विशेष विचार
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
अस्त; सदरील तीन मंत्रांपैकी पहिल्या दोन मंत्रांत, मृताच्या स्त्रीने मृतास सोडून जगात यावे, व तिने पतीच्या हातचे धन घेऊन वाटल्यास पुन: विवाहही करून घ्यावा असे सांगितले असल्याचे स्पष्टच आहे. ‘ पतीच्या हातचे धन ’ असे म्हटले आहे, त्याचा वर्णश: अर्थ निरनिराळा आहे. मेलेला मनुष्य ब्राह्मण असला तर त्याच्या हातात काही तरी सुर्वणाचा पदार्थ द्यावा, क्षत्रिय असल्यास त्याच्या हातात धनुष्य दिलेले असावे, व वैश्य असल्यास त्याच्या हातात काही तरी रत्नाची वस्तू असावी अशी विशेष मर्यादा आरण्यकादी ग्रंथांतून सांगितली आहे. अर्थात वर्णपद्धतीस अनुसरून मृत पुरुषाच्या हाती जो पदार्थ असेल तो पदार्थ घेऊन ती उठते, व पतीस चितेवर राहू देऊन आपले घरी परत येते, हा पर्यवसित अर्थ कायमच राहतो.
स्त्री चितेवरून उतरल्यानंतर प्रेताला अग्निसंस्कार होऊन अस्थि राहतात, त्यांचे संचयन पुढे निराळ्या दिवशी व्हावयाचे असते. त्या वेळी मृताच्या ज्येष्ठ स्त्रीने अस्थिस्पर्श करावा असे कल्पग्रंथात सांगितले आहे, त्यावरून पाहू गेल्यासही वेदकाली स्त्रियांचे मृत पतीबरोबर सहगमन होत नसले पाहिजे हाच अर्थ व्यक्त होतो. शेवटल्या मंत्राचा जो पाठ वर लिहिला आहे, त्यावरून मृत पुरुषाच्या स्त्रीसंबंधाने काही विशेष अर्थ उत्पन्न होत नाही. परंतु चमत्कार हा आहे की, या मंत्रात कित्येक शब्दांच्या जागी क्वचित पाठभेद झालेले दिसतात, व त्या पाठभेदांच्या साह्याने याच वचनावरून प्राचीन काळी स्त्रिया पतीबरोबर सहगमन करीत असत असे सिद्ध करण्याचा निबंधादी ग्रंथांत यत्न झाला आहे.
आताचे हे वचन अथवा त्याचे पाठभेद हे शाखाभेदाने वेदांत इतरत्रही आढळून येतात. सायनाचार्यांचे या पाठभेदांपैकी कित्येकांवर भाष्य झाले आहे. त्या भाष्यात त्यांनी एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ केले असल्याने बराच घोटाळा झाला आहे. उदाहरण, आत्ताच्या या मंत्रातील ‘ संमृशंता ’ या ठिकाणी ‘ संविशतु ’ असा पाठभेद आहे, त्यातील ‘ विश् ’ या धातूचा अर्थ ‘ शिरणे ’ अर्थात ‘ अग्नीत प्रवेश करणे ’ अस अकोणी मानिला, व त्यामुळे या मंत्राचा सहगमनपर अर्थ करण्याचे आयती संधी संधी उत्पन्न झाली. सूक्ष्म दृष्टीने विचार करू जाता या धातूचा ‘ शिरणे ’ हा एकच अर्थ नाही, व या अर्थाहून निराळा अर्थ होणे शक्य आहे हे याच धातूपासून निघालेल्या ‘ वेश ’ पोशाख अ० शोभा ) शब्दावरून व्यक्त होण्याजोगे आहे, व त्या धोरणाने मुळातील ‘ संविशंतु ’ या शब्दाचा अर्थ करू गेल्यास पर्यवसानी ‘ संमृशंता ’ ( म्ह० लावोत ) या शब्दाच्या अर्थाशी त्याचा मेळही बसतो.
अर्थात मृत पतीबरोबर स्त्रियांनी सहगमन करण्याची चाल वेदकाळी होतीच असे मानण्यास काही विशेष कारण दिसत नसल्याने या चालीचा उदय मागाहून केव्हा तरी झाला असावा असे साहजिक अनुमान होते. तशातून या मंत्राचा उपयोग मरणाच्या दहाव्या दिवशी होणार्या शान्तिकर्माचे पोटी करण्याचा संप्रदाय आहे, व पतीचे दहन तर पहिल्या दिवशीच होऊन गेलेले असते, तेव्हा दहाव्या दिवश्सी स्त्रियांनी अग्निप्रवेश केला असता त्या प्रवेशास ‘ सहगमन ’ कसे म्हणता येईल ही गोष्टही विचार करण्यासारखी आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP