स्त्रीपुनर्विवाह व पतिसहगमन वाद
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
पती मरण पावला असता पतिव्रता स्त्रियांनी सहगमन करावे, म्हणजे पतीच्या शवासमागमे चितेत राहून आपला देह जाळून घ्यावा हे त्यांचे आद्य कर्तव्य होय, व ते करण्याचे ज्यांच्या अंगी धैर्य नाही अशा स्त्रियांनी संन्यासाच्या तर्हेचे व्रताचरण करावे, अशी सांप्रत प्रचलित असलेल्या धर्मशास्त्राची साधारण समजूत असल्याचे दृष्टीस पडते. अर्वाचीन पुनर्विवाहावादी हे सतीगमन व वैधव्यव्रताचरण ही दोन्ही कबूल करितात, परंतु त्यांस जोडूनच व ती नच साधतील तर अगदी कनिष्ठ व गौण मार्ग म्हणून, स्त्रियांनी पुनर्विवाहाचा शास्त्रोक्त मार्ग स्वीकारला असे शास्त्रावर कटाक्ष ठेवून त्यांजकडून प्रतिपादन करण्यात येते.
पुराणग्रंथ चाळून न पाहता त्यात सहगमन केल्याची उदाहरणे केव्हा केव्हा आढळतात. स्मृतिग्रंथांचाही बहुतेक तोच कटाक्ष दिसतो; व स्मृतींतील लेखांस वेदग्रंथांत प्रत्यक्ष प्रमाण न मिळाले तरी असे प्रमाण कोठे तरी मूळचे असलेच पाहिजे. वेदांचे पुष्कळ भाग लुप्त झाले त्याबरोबर हे प्रमाण कदाचित नाहीसे होऊन गेले असेल, ही आमच्या धर्मशास्त्रकारांची यावरची अखेरची कोटिही ठरलेली आहे. प्रस्तुत विषयासंबंधी या कोटिक्रमाची जरूर पडली नाही, व शास्त्रकारांनी एका विशेष वेदवचनाचा आधार पुढे आणिला असून त्यावरून वेदकालीदेखील सतीगमन होते असे त्यांचे म्हणणे आहे.
या म्हणण्याविरुद्ध प्रतिपादन करणारा, म्हणजे या गोष्टीस मूळचा वेदाधार नाही व तिची प्रवृत्ती मागाहून झालेली व आगंतुक असावी असे मानणारा दुसरा पक्ष आहे; त्या पक्षाच्या समजुतीने स्त्रीने सहगमन करू नये. पतिगृही राहून त याच्या संपत्तीचा उपभोग घ्यावा, व इच्छा असल्यास पुनर्विवाही करावा अशी मूळची चाल असावी. या पक्षाचे हे म्हणणे प्रचलित समजुतीशी अर्थातच विरुद्ध आहे. एकंदरीत या विषयासंबंधाने मतभेदाचा व गैरसमजुतीचा प्रकार पुष्कळच आहे, व यासाठी त्याबद्दल प्रस्तुत स्थळी थोडासा विचार केला असता केवळच अप्रासंगिक होणार नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP