श्वेतकेतूने केलेला व्यभिचारनिर्बंध
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
अति प्राचीन काळी ज्यावेळी समाज रानटी स्थितीत होता, त्या वेळी ‘ गोत्र ’ या कल्पनेचे विशेषसे महत्त्व नव्हते; व गोत्रापेक्षा प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे महत्त्व विशेष वाटत होते. कुटुंबपद्धतीचा उदय झाल्यानंतर गोत्राचे महत्त्व वाटू लागले, व ते आई व बाप यांच्या बाजूने प्रत्येकी ४२ पिढ्यांपर्यंत नेऊन पोचविण्यापर्यंतही मजल येऊन पोचली. व्यक्तीचे महत्त्व खरे म्हटले म्हणजे त्या व्यक्तीच्या पराक्रमावर अवलंबून असले पाहिजे; परंतु कालान्तराने पराक्रमाच्या भागास थोडाबहुत छाट बसण्याची पाळी येऊ लागली व नुसत्या बाहेरच्या नावानेच भूषण कित्येक लोक मानू लागले. होता होता या भूषणाची कुरूपता झाकण्यासाठी वरून धर्माचे पांघरूण घालण्यासही लोकांनी कमी केले नाही.
महाभारत, आदिपूर्व अध्याय १२२, येथे भावी पाच पांडवांचा पिता पांडुराजा ह्याची कथा वर्णिली आहे; तेत तो क्षयरोगाने ग्रस्त झाला होता, व पोटी पुत्रसंतती नसल्यामुळे तो आपली ज्येष्ठ पत्नी कुंती हिला कोणत्या तरी उपायांनी पुत्रप्राप्ती करून घेण्याविषयी उपदेश करीत आहे, असे वर्णिले आहे. ह्या उपदेशातील काही भाग पुधीलप्रमाणे आहे :
अथ त्विदं प्रवक्ष्यामि धर्मतत्त्वं निबोध मे ॥
पुराणमृषिभिर्दृष्टं धर्मविद्भिर्महात्मभि: ॥३॥
अनावृता: किल पुरा स्त्रिय आसन्वरानने ॥
कामचारविहारिण्य: स्वतंत्राश्चारुहासिनि ॥४॥
तासां व्यच्चरमाणानां कौमारे सुभगे पतीन् ॥
नाधर्मोभूद्वरारोहे स हि धर्म: पुराभवत् ॥५॥
तं चैव धर्मं पौराणं तिर्यग्योनिगता: प्रजा: ॥
अद्याप्यनुविधीयंते कामक्रोधविवर्जिता: ॥६॥
प्रमाणदृष्टो धर्मोयं पूज्यते च महर्षिभि: ॥
उत्तरेषु च रंभोरु कुरुष्वद्यापि पूज्यते ॥७॥
स्त्रीणामनुग्रहकर: स हि धर्म: सनातन: ॥
अर्थ : ‘ मोठे मोठे धर्मवेत्ते ऋषी यांनी प्राचीन काळचे धर्मतत्त्व पाहिले, ते मी तुला सांगतो. हे सुंदरी ! सुहास्यवदने ! प्राचीन काळी स्त्रियांना आच्छादन नसे, व त्या स्वतंत्र असून त्यांस पाहिजे तिकडे जाण्यास व हवा तसा विहार करण्यास मोकळीक असे. कौमार वयात त्यांनी आपल्या पतीस सोडून कोठेही व्यभिचार केला, तरी तो अधर्म होत नसे, व त्या वेळी तोच धर्म मानिला जात असे. पशुपक्ष्यादी योनीत जन्मलेल्या प्राण्यात अजूनही हाच धर्म आहे, व त्याबद्दल त्या प्राण्यांस क्रोध वगैरे काही वाटत नाही. ’
‘ उत्तरकुरु देशात मोठमोठाले ऋषीदेखील आजमितीला शास्त्रसिद्ध म्हणून या धर्माचे आचरन करतात. कारण हा धर्म फ़ार प्राचीन असून स्त्रियांवर उपकार करणारा आहे इ. ’ या ठिकाणी उत्तरकुरु देशाचे नाव लिहिले आहे, हा देश म्हणजे धर्मशास्त्राचे आदिपीठ - अशी प्राचीन काळी त्याची ख्यती होती; व तेथील मोठमोठाले ऋषी वामदेव्य व्रते आचरीत असता कोणाही स्त्रीने मैथुनेच्छा दर्शविली असता ती ताबडतोब पूर्ण करीत. या वामदेव्य व्रतांचे मंत्र छांदोग्योपनिषदात आले आहेत.
असो; आता वर्णिल्याप्रमाणे कुंतीशी पांडुराजाचे भाषण झाल्यावर त्याने तिला श्वेतकेतू नावाच्या ऋषिपुत्राने व्यभिचाराचा निषेध केल्याची कथा सांगितली. या कथेचे तात्पर्य इतकेच की, श्वेतकेतू हा आपला पिता उद्दालक ऋषी व आई यांसहवर्तमान राहात असता एक ब्राह्मण आला, व सर्वांच्या समक्ष त्या बाईचा हात धरून तिला घेऊन चालता झाला. असे होणे यात उद्दालक ऋषीस काही अधर्म वाटला नाही, सबब तो काही बोलला नाही. श्वेतकेतूस मात्र हा प्रकार आवडला नाही, व तेव्हापासून त्याने तो अधर्म आहे असे ठरवून त्याचा निषेध केला.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP