उपाध्यायाच्या गोत्रापेक्षा स्वत:चे गोत्र विशेष इष्ट
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
सध्यांची स्थिती पाहू गेल्यास ब्राह्मण हेच काय ते सर्व वर्णांचे गुरू अशी समजूत प्राय: सर्वत्र रूढ होऊन बसली आहे. ब्राह्मणांचे गुरुत्व जेथे मानिले जात नाही, तेथे प्राचीन काळच्या धर्मपंथांहून निराळे धर्मपंथ अर्वाचीन काळी उत्पन्न झालेले दृष्टीस पडतात; व त्या पंथांत त्रैवर्णिकांच्या यज्ञोपवीताचाही लोप होऊन जाऊन त्याच्या जागी कंठी वगैरे नवीनच प्रकार येऊन बसले आहेत. प्रस्तुत स्थळी या नवीन प्रकाराबद्दल काही विशेष लिहावयाचे नाही, कारण त्या प्रकारांचा गोत्रपद्धतीवर काही परिणाम होत नाही.
रूढ असलेल्या पद्धतीत ब्राह्मण हे इतर सर्व जातींचे उपाध्याय म्हणून कर्मे व क्रिया चालवितात, व त्यांत यजमाना्च्या गोत्राचा उच्चार करण्याचे कारण पडाते. आनुवंशिक पद्धती निघून गेली, तर गोत्राच्या उच्चाराचे कारणही आपोआप नाहीसे होईल, परंतु ती पद्धती जोपर्यंत आहे तोपर्यंत गोत्रोच्चारण अवश्य राहिलेच पाहिजे. ब्राह्मणमंडळात प्रत्येक कुटुंबास स्वत:चे गोत्र आहे, त्याप्रमाणेच न्यायाने पाहू गेल्यास इतर वर्णांसही स्वत:ची गोत्रे का नसावीत ? शूद्र कोणीही असो; त्याच्या येथील कर्मांत एकटे ‘ जाबाल ’ गोत्र लावावयाचे अशी ब्राह्मणमंडळाने पद्धती ठरवून टाकिली आहे. क्षत्रिय व वैश्य या दोन्ही वर्णांचाही समावेश शूद्रांतच करण्यात येऊ लागल्यामुळे त्यांच्या वाट्यास हेच गोत्र आले आहे.
खरा विचार पाहू गेल्यास ही गोष्ट अत्यंत शोचनीय आहे. कोणी कोणत्याही वर्णाचा असो; त्याला आपल्या कुळाचा किंवा पूर्वजांचा अभिमान वाटात राहण्याचे खरे साधन काय ते हा गोत्रोच्चारच होय. क्षत्रियवर्नास तर आपल्या कुळात होऊन गेलेल्या वीरांची स्मृती कायम राखण्यास व त्या वीरांचे अनुकरण करून पराक्रमाची स्फ़ूर्ती होण्यास, या वीरांच्या नामावळीचा जपच नित्य तोंडी राहण्याची आवश्यकता आहे. परंतु चमत्कार हा की, या दोन्ही वर्णांनी स्वत:च्या गोत्रपुरुषांच्या नावाचा उच्चार न करिता त्या ठिकाणी उपाध्यायाच्या गोत्राचा ( ! ) उच्चार करण्याची चाल ब्राह्मणांनी पाडली आहे.
भांडणतंटे वगैरे काही विशेष कारणाने कोणी आपला उपाध्याय बदलला, तर त्याबरोबर गोत्राचे नावही बदलण्याची पाळी येऊ शकणारी असते. हा प्रसंग थोडा येतो हे खरे आहे, तथापि ( १ ) उपाध्यायाचे गोत्र उच्चारणे, व ( २) आपल्याच कुळात होऊन गेलेल्या पूर्वजांपैकी निवडक नावाचा उच्चार करणे, या दोन गोष्टींची तुलना केली असता समाजाचा व देशाचा फ़ायदा दुसर्या प्रकारच्या उच्चारणातच अधिक आहे हे कोणासही सहज समजण्यासारखे आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP