अध्याय १४ वा - श्लोक ४

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रेयःसृतिं भक्तिमुदस्य ते विभो क्लिश्यंति यै केवलबोधलब्धये ।
तेषामसौ क्लेशल एव शिष्यते नान्यद्यथा स्थूलतुषावघातिनाम् ॥४॥

सकल कल्याणें प्रसवती । अभीष्ट ऊर्जित अभ्युदय कीर्ति । स्वर्गापवर्ग सुखाची दात्री । अभेदभक्ति पैं तुझी ॥३१॥
जैसे मातृपयोधर । अमृत स्रवती कां शशिकर । पुष्टितुष्टि श्रेयस्कर । जेवी किशोर चकोरां ॥३२॥
निर्झर स्रवतां सरोवर । कीं सीकर वर्षतां केदार । सकळ जीवा श्रेयस्कर । जेवीं अपार तुष्टिद ॥३३॥
तेवीं सकळां मंगळांची जननी । स्वर्गापवर्ग सुखाची खाणी । ते अभेदभक्ति उपेक्षूनि । जे ज्ञानसाधनीं प्रवर्तलें ॥३४॥
प्रेत देखोनी धाटें मोठें । चैतन्य लटिकें न दिसे कोठें । म्हणोनि भाळले करंटे । शव गोमटें मानूनी ॥१३५॥
तेवीं श्रेयस्करां ते माऊली । ते भावभक्ति अनादरिली । केवळ ज्ञानलाभाचिये भुली । जिहीं आदरिलीं साधनें ॥३६॥
सांडूनि भूतदयेची वाट । हे झाले शास्त्रज्ञ कर्मठ । वर्णाश्रमाचार श्रेष्ठ । साधन वरिष्ठ हे म्हणती ॥३७॥
कर्में होय चित्तशुद्धि । तेणें ज्ञान पावे सिद्धि । म्हणोनि कर्मठ मंदबुद्धि । भक्तिविरोधीं प्रवर्तले ॥३८॥
पात्रापात्रविचारणा । देश काळ द्रव्य दक्षिणा । विवरूनि वर्ततां विचक्षणा । भेद चौगुणा बळ बांधे ॥३९॥
ब्रह्मार्पणं ब्रह्महविः । इत्यादि वाक्यें भक्ति गौरवी । हें नेणोनि उठाठेवी । करितां गोंवी कर्मची ॥१४०॥
हरिर्दाता हरिर्भोक्ता । हे भक्तीची अभेदता । सांडोनि योग्यायोग्य म्हणतां । अधःपातानें कर्म ॥४१॥
आपुली नेणोनि संपन्नता । पात्रशुद्धि पाहों जातां । दोषवैषम्य वाजे माथां । होय तें वृथा अनुष्ठिलें ॥४२॥
आपुलें द्रव्याद्रि अंतःकरणें । शुद्धाबद्ध न विचारून । पात्रापात्रताविवरण । कळे कोठून त्यांलागीं ॥४३॥
फलाभिलाषी जीव आपण । पात्र म्हणिजे देवता पूर्ण । जीवांसि देवांचे गुणागुण । पाहतां कोठून कळतील ॥४४॥
वेदशास्त्र शुद्धाचार । इतुका परीक्षाप्रकार । ऐका येथींचा विचार । श्रवणीं सादर होऊनी ॥१४५॥
अयोग्य आणि अपात्र रूप । धरूनि तयाचें स्वरूप । देवें छळिले पैं अमूप । भेद विकल्प स्फुरवूनी ॥४६॥
हंसविग्रहें मज ब्रह्मयासी । स्वयेंचि बोधी हृषीकेशी । ते पावतां गुरुत्वासी । पक्षियासी घडे कांहीं ॥४७॥
विष्णुदास ब्राह्मणोत्तम । चाळितां विष्णुव्रतांचा नेम । त्यासी छळितां पुरुषोत्तम । अभेदप्रेम तो नटकी ॥४८॥
धरूनि सामान्य आवगणी । श्रियाळा छळितां शूलपाणी । परी तो भक्तशिरोमणि । पुत्र देऊनि शिव जिंकी ॥४९॥
ऐशा अयोग्य घेऊनि बुंथी । देवें छळिलें नेणों किती । त्यांमाजी ज्यांची अभेद भक्ति । छळनावर्ती निर्भय ते ॥१५०॥
गौपशैशवनाट्यें येथें । प्रत्यक्ष छळिलें पैं भगवंतें । पात्रापात्र विचार तेथें । मनुष्यातें केंवि कळे ॥५१॥
सुवर्णाचीं पादत्राणें । मोला चढती सुवर्णपणें । कार्पासाचीं शिरोवेष्टणें । मोलें गौणें परी वंद्य ॥५२॥
एक वेदोक्त आचारशील । परी शास्त्राभ्यासीं अकुशल । कीं वेदशास्त्रज्ञ आचार बरळ । एक ते केवळ क्षमस्वी ॥५३॥
एक वेदशास्त्रसंपन्न । द्रवार्थ करिती नीचयाजन । तेणें गुणें ते अपात्र जाण । शास्त्रज्ञ म्हणून पात्रता ॥५४॥
विवेकसंपन्न एक विरक्त । एक केवळ सगुणभक्त । एक अभेद दयावंत । एक आसक्त गुरुभजनीं ॥१५५॥
एक तपस्वी ब्रह्मचारी । एक निसर्गनिर्विकारी । एक संतुष्ट अभ्यंतरीं । तृष्णा बाहेरी घालुनी ॥५६॥
एक एकासाठीं गुणा । पात्रता असे सर्वां जणां । मुख्य लक्षूनि समदर्शना । अभेद भजना अनुसरिजे ॥५७॥
कोण कोणाचे अंतरीं । म्हणोनि भक्तिप्रेमादरीं । साद्गुण्य करी कर्मातें ॥५८॥
तें सांडूनि मंदमति । ज्ञानसाधनीं प्रवर्तती । तेणें क्लेशांची होय प्राप्ति । उदस्य ते म्हणतसे ॥५९॥
जेवितां षड्रस पक्कान्न । अनादरें तें न रुचे जाण । तैसें अभक्ताचें कर्माचरण । अधःपतनप्रद होय ॥१६०॥
एवं देशकालद्रव्यादिक । यांचा शुद्धाबद्ध विवेक । कथितां ग्रंथवृद्धीचा धाक । म्हणोनि नावेक मुकुलिलें ॥६१॥
द्रव्यें अर्जिता कर्मचाडें । तेथ कर्मार्थ म्हणतां तोंडें । सुकृताचें होय उबडें । रितें भांदें कर्तृत्वीं ॥६२॥
क्षुधे तृषेनें जातां प्राण । कुरुक्षेत्रीं अन्नदान । करूं म्हणतां पतन । ऐसें विघ्न अभक्ता ॥६३॥
क्षुधा तृषा भूतमात्र । अन्नोदकासि प्राणिमात्र । परी गा भूस्वर्गादि विचित्र । म्हणाल सर्वत्र शोधावें ॥६४॥
तरी दयार्थी क्षणभंगुर । वित्त जीवित कीं अंतर । पुण्य काळ कुरुक्षेत्र । वाहतां अंतर पडतसे ॥१६५॥
तेर्थीं क्षेत्रीं प्रतिदानीं । प्रायश्चित्तीं पुरश्चरणीं । इष्टपूर्तीं तपःसाधनीं । भेदें हानि मद्भक्ता ॥६६॥
शास्त्राभ्यासें तोंडपाठी । करूनि शिकवा ज्ञानगोठी । सांगती दारोदारीं अभक्त ॥६७॥
यालागीं अभक्तांचीं शास्त्रें । स्वहित ना चित्रींवशस्त्रें । भक्तीवांचूनि कर्मतंत्रें । होती पात्रें दुःखाचीं ॥६८॥
कर्माचरणें चित्तशुद्धि । तेणें होय ज्ञानोपलब्धि । म्हणतां ऐशी भेदबुद्धि । नाडि त्रिशुद्धि अभक्तां ॥६९॥
स्वबोधोपलब्धीसाठीं । योगमार्गीं एक हट्टी । जाऊनि बैसती कपाटीं । महा दुर्घटीं अभ्यासीं ॥१७०॥
तेथ देश काल ज्ञान स्थान । चहूंवीण न घडे योगसाधन । आसन गात्र नेत्र प्राण । ते चतुर्विध पूर्ण धारणा ॥७१॥
देश पवित्र आणि काळ । अनुकूळ देहीं तारुण्य पुण्य काळ । ज्ञान योग मार्गीं केवळ । स्थान निराकुल सुखरूप ॥७२॥
हें दुर्लभ कें जडों शके । न जोडतां पीडिजे दुःखें । तथापि भरीं भरती मूर्खें । नसतां ठाउक निजवर्म ॥७३॥
भवजळीं चंचळ मानसमासा । धारणागळे रोधितां घसा । तळमळी पावोनि परम क्लेशा । विश्रांतिलेशा न चखतां ॥७४॥
पंचप्राणीं यथोक्त पवनें । वाहतां टवटविती सर्व करणें । सोमींच्या बस्ता परी होणें । संरोधनें त्याचेनी ॥१७५॥
प्राणनिरोधें पिंड पडे । तो भवव्याघ्रातें वरपडे । शुष्काभ्यासें ऊर्ध्व पवाडे । तैं आतुडे मूर्च्छेतें ॥७६॥
तेणें देह चिरकाळ राहे । परि अज्ञान अणुमात्र नवजाय । मा मेलिया न वें देह लागे । उणें काय ते ठायीं ॥७७॥
योगें हाचि देह वांचे । तरी विशेष काय पैं तयाचें । देहबुद्धि शुभाशुभाचें । भोगणें न वचे कल्पांतीं ॥७८॥
मूर्च्छाबंदींच शिरकले । प्रेमसुखासि अंतरले । आत्मज्ञाना दुरी ठेले । ऐसे नाडले अभक्त ॥७९॥
मूर्च्छा निद्रा आणि मरण । हीं सारखीं तीन्ही जाण । यांचा अनुभव प्राणिगण । भोगिती न शिणोनि अभ्यासीं ॥१८०॥
म्हणाल आतुडल्या मरणीं । भोगणें पडे अनेक योनि । तितुक्मी न घडे भवजाचणी । देहरक्षणीं हें थोडें ॥८१॥
तरी स्थावरादि अनेक जाती । मूर्च्छेमाजी करिती वसति । नोहेचि अज्ञाननिवृत्ति । मा कैंची प्राप्ति स्वसुखाची ॥८२॥
अपार अगाध दुस्तर पूर्ण । साधनसिंधूचें जीवन । भक्तिनौका अनादरून । करी अंगवण तरणार्थ ॥८३॥
तो महा विघ्नाच्या वळसां पडे । दुराग्रहावर्तीं बुडे । क्लेशकर्दमें गिरबडे । दुःखें चांटे रेवोनी ॥८४॥
एवं सर्व मंगलां जननी । ते तव भक्ति अव्हेरूनि । जे प्रवर्तले ज्ञानसाधनीं । क्लेशभरणी त्यां फळली ॥१८५॥
जैसे सांडूनि सूक्ष्म कण । स्थूल कोंडा अवलोकून । त्याचें करितां दीर्घ कांडण । क्लेशावांचून फळ न लभे ॥८६॥
भक्ति तेचि मुख्य ज्ञान । अभक्त ज्ञानसाधनीं शीण । पावोनि बुडत योगिजन । भजनें निर्वाण पावले ॥८७॥
सज्जनीं पाहोनि पूर्वापर । केला भक्तीचा निर्धार । तोचि इतरांसि आधार । प्रमाणपर विधि बोले ॥८८॥
हाचि निष्कंटक पंथ । जेथ भजिजे कमलानाथ । येर आगम तो कुपंथ । हरिभक्तिरहित जो मार्ग ॥८९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP