अध्याय १४ वा - श्लोक ६

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तथाऽपि भूमन्महिमागुणस्य ते विबोद्धुमर्हत्यमलांतरात्मभिः ।
अविक्रियात्स्वानुभवादरूपतो ह्यनन्यबोध्यात्मतया न चान्यथा ॥६॥

यद्यपि दुर्बोध निर्गुणसगुण । तथापि एदांतवाक्यांवरून । शुद्ध साधका उपजे निर्गुण । परी अगाधपण सगुणाचें ॥२७॥
ब्रह्मा म्हणे भो अपरिच्छिन्ना । अचिंत्यानंतगुणपरिपूर्णा । गुणागुणादि अधिष्ठाना । नित्य निर्गुणा सगुणात्मका ॥२८॥
तूं जो निर्गुण परब्रह्म । त्या तुज जाणती साधुसत्तम । सम्यक नियमूनि इंद्रियग्राम । चित्तोपरम साधूनी ॥२९॥
विषयाभास जो विवर्त । वेदांतगुरुवाक्यें तो अनित्य । बोधें उपरम पावे चित्त । होती निवृत्त इंद्रियें ॥२३०॥
मोडतां प्राणांची प्रवृत्ति । क्षुधा तृषादि मांदुळती । इंद्रियांच्या अमल वृत्ति । आत्मस्थिति संप्राप्त ॥३१॥
आत्मानुबह्वें लाचावलीं । इंद्रियें अपरोक्ष ज्ञानाथिलीं । पुढती विवर्तोन्मुखही झालीं । विषयीं भुलविलीं न वचती ॥३२॥
तेव्हां शुद्ध अंतर्वृत्ति । इंद्रियद्वारा प्रकाशती । मग ते आंतील आत्मस्थिति । बाह्यप्रवृत्तीमाजीं प्रकटे ॥३३॥
अंतरीं असतां विषयकाम । इंद्रियद्वारां कामिनीप्रेम । तेथ प्रकटतां आत्माराम । सबाह्य ब्रह्म सहजची ॥३४॥
ज्यासि अंतरीं लिपिज्ञान । तो पुस्तकाचें करी पठन । अज्ञान तो पुस्तकपर्ण । मानूनि तृण उपेक्षी ॥२३५॥
असतां शुद्ध चैतन्यघन । इंद्रियद्वारा विपरीत ज्ञान । जगदाकारें विषयस्फुरण । भवबंधन भोगवी ॥३६॥
तेथ विपरीत बोधाच्या निरासें । सबाह्य ब्रह्मचि प्रकाशे । अनादि भ्रमाचें निरसल्या पिसें । गोचर दिसे ब्रह्मची ॥३७॥
ऐशिया साधनप्रसंगीं । निर्गुण आंगवूं शकती योगी । अथवा विशुद्धसाधकांलागीं । बोधवूं शकती कदाचित ॥३८॥
अथवा विशुद्ध कुशाग्रबुद्धि । जाणों शकती शास्त्रविधि । ऐशी निर्गुणाची उपलब्धि । घडों निरवधि शकेल ॥३९॥
अथवा निर्गुणाचें महिमान । स्वसुखानुभवेंकरून । जाणों शकती योगिजन । समरसोन तादात्म्यें ॥२४०॥
चक्रवर्तीं कां दिवस्पति । जेथींचा आनंद नेणती । एकांतवासी तो भोगिती । तादात्म्यवृत्ति मुनिवर्यं ॥४१॥
शोकमोहातीत तोष । निरुपाधिक नित्य निर्दोष । तादात्म्यवगमें पुरुष । जाणों शके एखादा ॥४२॥
एथ शंका करिजेल ऐशी । सविकारता अंतःकरणासी । आत्माकारता घडे कैशी । एतद्विषयीं अवधारा ॥४३॥
विकार म्हणिजे विशेषाकार । मनादि संकल्पव्यापार । निर्विकल्प निर्विकार । आत्माकार ते स्थिति ॥४४॥
इंद्रियांविषय जेवीं आकळे । तैसा अंतःकरणा आत्मा कळे । तरी परब्रह्मीं केवळें दूषण आलें विषयत्वें ॥२४५॥
एथ रूपमात्र विषयग्रहण । अरूपतः पदेंकरून । वृत्तितादात्म्य निर्दूषण । फळीं दूषण विधि वदला ॥४६॥
वृत्तिरूप अंतःकरण । ब्रह्माकारा करीत पूर्ण । ब्रह्मानुभव तो निर्दूषण । सदूषण फलविषयें ॥४७॥
म्हणाल फलविषय तो कैसा । वेगळेपणें भोगिजे तोषा । ध्याता ध्येय कीं लक्षी लक्षा । इत्यादि सदोषा सारिखा ॥४८॥
एथ शंका करिती कोणी । उन्हा स्फूर्ति उठे कोठूनी । अनन्य बोध्या सवते करूनी । पद्मयोनि परिहारी ॥४९॥
जळामाजीं जळकल्लोळ । अग्निमाजीं अग्नीज्वाळ । तेवीं स्वसंवेद्य स्फूर्तिरोळ । अनन्य केवळ आत्मत्वीं ॥२५०॥
ऐसे निर्गुणरूप हरि । जाणों शकिजे निर्विकारी । परी या सगुणरूपाची थोरी । बहुता परी अगाध ॥५१॥
सर्वांहूनि अंतरंग । रमा सेविजे अर्धांग । तीसही निर्गुणस्वरूपीं लाग । नव्हे अव्यंग जाणावया ॥५२॥
जे गुणत्रयाची जनयित्री । नामरूपांची अधिष्ठात्री । तेही अमलेंद्रियीं पवित्रीं । नोहेचि ज्ञात्री पृथक्त्वें ॥५३॥
नित्य निरामय निर्गुण । अनंत अपार पूर्णपण । वास्तव जाणावया आंगवण । अशक्य जाण कमळेसी ॥५४॥
मग ते स्वमाननिवृत्तिकाळीं । भेदें न उरोनि वेगळी । जेवीं लहरी सिंधुजळीं । मिळोनि गेली ऐक्यत्वें ॥२५५॥
अनन्य होवोनि अनन्य योगें । समरसोनी जाय आंगें । स्वगतादि त्रिविधभेदभंगें । निजोनि जागे अवाच्य ॥५६॥
सगुण अगाध कैसें म्हणसी । ऐकें भगवंता येविशीं । अनंतगुणप्रचुरतेशीं । अंत कोणासी न लागे ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP