अध्याय १४ वा - श्लोक ५१ ते ६१
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तद्राजेंद्र यथा स्नेहः स्वस्वकात्मनि देहिनाम् । न तथा ममतालंबिपुत्रवित्तगृहादिषु ॥५१॥
कोणा कार्यास्तव जरी म्हणसी । प्रत्यक्ष दिसे सर्वांपाशीं । आत्माध्यासें शरीरासी । कवळी प्रीतीशीं आत्मत्वें ॥१९॥
मग उत्तरोत्तर तारतम्य । कलत्र पुत्र हेमहर्म्य । मायिक यांचें आत्मप्रेमें प्रेम । भोग्यकाम म्हणोनी ॥९२०॥
अस्ति भाति आणि प्रिय । आत्मयाचें स्वरूप होय । तें आत्मप्रियत्वें धनसुतगेह । कवळी मोहसंग्रस्त ॥२१॥
आत्मा शब्दें आपण । स्वशब्दें तें बोलिजे धन । जाया पुत्र आत्मा म्हणोन । श्रुतीचें वचन प्रतिपाद्य ॥२२॥
परी राजेंद्रचूडामणि । स्वस्वदेहीं देहाभिमानी । झोंबती स्नेहें कळवळोनि धनसुतसदनीं न तैसे ॥२३॥
देहीं आत्मत्वें अहंता । जायासुतधनीं प्रियत्वममता । तदनुलक्ष्यें त्या आत्मता । अनात्मता वैरस्यें ॥२४॥
देहात्मवादिनां पुंसामपि । राजन्यसत्तम । यथा देहः प्रियतमस्तथा न ह्यनु ये च तम् ॥५२॥
वास्तव आत्मा सच्चिदानंद । क्षणैक असो हा अनुवाद । परी देहात्ममानी ही पुरुषवृंद । प्रेमास्पद तनु मानी ॥९२५॥
देह आत्मत्वें जैसा प्रिय । तदुपयोगी जे जाया तनय । तैसे नोहती ज्या अभिप्रायें । तें परिसिजे रायें सप्रेमें ॥२६॥
देहासि संकट येते काळीं । आत्मवित्त वेंचूनि टाळी । पश्वादि संपत्ति वेंचूनि समूळीं । वृत्ति कोमळीं साधितीं ॥२७॥
तेही वृत्ति समर्पणें । जाया पुत्र सोडवणें । पुत्र देऊनि स्त्रीं रक्षणें । तारतम्यें त्यांमाजीं ॥२८॥
प्रसूतिकाळीं आड येतां । पुत्र खांडूनि रक्षिती वनिता । परी पोट फोडूनि वांचवा सुता । कोणी वार्ता हे न वदे ॥२९॥
जळतां गेहीं सांपडे सुत । पितरें पळती लाहतां पंथ । ममतामोहें शोकाभिभूत । परी न जळत त्यासरिशीं ॥९३०॥
स्वैर सुरतीं धरूनि प्रीति । पुंश्चळी प्रवर्ते गर्भपातीं । न सुटे देहाची आसक्ति । हें भूपति कळलें कीं ॥३१॥
जाया आत्मा म्हणावें जरी । तेही प्रियत्वें प्रेमादरीं । जैं ते प्रवर्ते व्यभिचारीं । तैं परस्परीं विष होती ॥३२॥
एवं आत्मप्रियत्वासाठीं । आत्मत्व कवळिलें बारा वाटीं । देहात्मवादियांची हे गोठी । नृपा वाक्पटीं शुक सांगे ॥३३॥
आत्माध्यस्त जो हा देह । सर्वां परीस त्यांचा स्नेह । पुत्र कलत्र वृत्ति गेह । हा संग्रह तदर्थ ॥३४॥
देहोऽपि ममताभाक् चेत्तर्ह्यसौ नाऽऽत्मवत्प्रियः । यज्जीर्यत्यपि देहेऽस्मिन्जीविताशा बलीयसी ॥५३॥
देहाहूनि आत्मा प्रिय । ऐसा रायासि अभिप्राय । प्रकटावया योगिवर्य । कथिता होय विवेक ॥९३५॥
ज्या कारणास्तव हा देह । मरणोन्मुखही कळला आहे । तरी जीविताशा न सुटे पाहें । महामोहें बलिष्ठ ॥३६॥
ऐसे देहात्ममानी मूर्ख । म्हणती आत्माचि देह निष्टंक । तो देहही कळतां ममताभाक । तैं आत्मविवेक वास्तव ॥३७॥
देहाहूनि आत्मा प्रिय । म्हणोनि विरक्ता न रुचे देह । आत्मरतासि देह गेह । वृथा मोह भवभ्रांति ॥३८॥
तस्मात्प्रियतमः स्वात्मा सर्वेषामपि देहिनाम् । तदर्थमेव सकलं जगदेतच्चराचरम् ॥५४॥
तस्मात्सर्व सुखांची राशि । स्वात्माचि प्रियतम सर्वांसी । आत्मप्रियत्वें चराचरासी । प्रियतमतेशीं कवळिती ॥३९॥
कृष्णमेनमवेहि त्वमात्मानमखिलात्मनाम् । जगद्धिताय सोऽप्यत्र देहीवाऽऽभाति मायया ॥५५॥
जगदात्मया श्रीकृष्णातें । तुवां जाणिजे राया निरुतें । नंदनंदना प्रत्यक्षातें । इतुकेंचि एथें न मनावें ॥९४०॥
कृष्ण आपुला आपण आत्मा । तोचि जडरूपें जगदात्मा । सबाह्य कृष्ण आम्हां तुम्हां । नृपसत्तमा हें जाण ॥४१॥
जगद्व्यापक अभिन्न हरि । तोचि जगाच्या हितावतारीं । मायामनुष्यदेहधारी । भासे धरित्रीवल्लभा ॥४२॥
वस्तुतो जानतामत्र कृष्णं स्थास्नु चरिष्णु च । भगवद्रूपमखिलं नान्यद्वस्त्विह किंचन ॥५६॥
रक्षेमाजीं गुप्त अनळ । रक्षारूप दिसे केवळ । द्रव्यसंस्पर्शें तत्काळ । प्रकटी फळ वास्तव ॥४३॥
गूळ शंसिला हिंगशब्दें । तो मुंग्या माशा वेधीच स्वादें । तेंवि कृष्ण वास्तवानंदें । सहयशोदे व्रज वेधी ॥४४॥
जरी परोद्भव गोपाळ । तरी तो चिन्मात्र निर्मळ । सर्वग सच्चिदानंद वहळ । प्रिय केवळ सर्वात्मा ॥९४५॥
राया तुझी जे आशंका । गोपी सांडूनि स्वबाळकां । कृष्ण प्रियतम मानिती कां । त्या विवेका तुज वदलों ॥४६॥
जरी भाविला यशोदाबाळ । तरी वेधलें व्रजचि सकळ । मा यथार्थ बोधें जे भजनशीळ । ते जाणती निखिल कृष्णची ॥४७॥
गगनीं नीलिमा यथार्थ नाहीं । तेंही बिंबे जळाचे ठायीं । नाथिल्या बिंबोपबिंबा दोहीं । वास्तव देही प्रकाशी ॥४८॥
विश्व स्थावरजंगमात्मक । अभेद श्रीकृश्णचि एक । ज्यांसि कळला हा विवेक । वस्तु सम्यक् ते झाले ॥४९॥
भगवद्रूप आत्मास्तिक्यें । बाह्य आभासे विश्व लटिकें । तें वस्तुत्वें वेगळें न टिके । खोले विवेकें विवळत्वें ॥९५०॥
त्यांसि भगवद्रूप निखिल जग । हरला भेदाचा प्रसंग । पृथक् सतत्त्वें जडविभाग । मायालाग असेना ॥५१॥
सर्वेषामपि वस्तूनां भावार्थो भवति स्थितः । तस्यापि भगवानीशः किमतद्वस्तु रूप्यताम् ॥५७॥
मायामय हा भवसागर । ब्रह्म केवळ निर्विकार । कैसा अभेदप्रकार । हा विचार जरि पुससी ॥५२॥
तरी दृश्यमात्र जें वस्तुजात । त्याचें आस्तिक्य तें तुजचि आंत । तुझेनि बोधें प्रकाशत । तूं परमार्थ पैं यांचा ॥५३॥
सांडूनि दृश्याचा अवलंब । तूं जें चैतन्य स्वयंभ । त्या तुझें ठायीं भासे नभ । ज्यामाजीं शोभा दृश्याची ॥५४॥
तें तूं चैतन्य जें जगत्कारण । कृष्ण त्या तुझें आदिकारण । आतां अवस्तूसि अधिष्ठान । कृष्णावीण कोणतें ॥९५५॥
तरी वस्तु एकचि कृष्ण पाहीं । येर अवस्तु सर्व कांहीं । आभासे श्रीकृष्णाचेच ठायीं । तेव्हां सर्वही श्रीकृष्ण ॥५६॥
भावर्थ म्हणिजे सन्मात्रत्व । हें जें कृष्णासीच मुख्यत्व । त्याचे ठायीं अनन्यत्व । त्या अमृतत्व अनायासें ॥५७॥
ऐसें वदोनि प्रकरणार्थ । उपसंहरी शुक समर्थ । तो ये श्लोकींचा श्लोकार्थ । श्रोतीं स्वस्थ परिसावा ॥५८॥
समाश्रिता ये पदपल्लवप्लवं महत्पदं पुण्ययशो मुरारेः । भवांबुधिर्वत्सपदं परं पदं पदं पदं यद्विपदां न तेषाम् ॥५८॥
परिमळ मूर्तचि पोतास । न निवडतां सार बाकस । तैसें पुण्यचि ज्याचें यश । अवताररहस्य मुख्यत्वें ॥५९॥
ज्याच्या यशाचें श्रवण पठण । करितां अपार जोडे पुण्य । जें कल्पांतीं नोहे क्षीण । तो हा श्रीकृष्ण मुरारी ॥९६०॥
त्या कृष्णाचे पदपल्लव । जिहीं आश्रयिली सुदृढ नाव । पूर्वी महंतीं जेथ सद्भाव । करूनि ठाव जो धरिला ॥६१॥
हीं कृष्णपदें जितुकी विशद । त्याहूनि जें कां महत्पद । तें कृष्णाचें पदद्वंद्व । भक्तवृंद आश्रयिती ॥६२॥
लाहोनि श्रीकृष्णपदाब्जनौके । भवाब्धि निस्तरती कौतुकें । गोवत्सांघ्री माजील उदकें । समता न शके भव करूं ॥६३॥
भव निस्तरूनि कोठें जाती । तरी ते परंपदचि पावती । म्हणती कैवल्यप्राप्ति । पुनरावृत्तिवर्जित ॥६४॥
सकामसाधनीं वैकुंठ प्राप्त । तें पद न पावती निष्काम भक्त । विषयपदवी जे समस्त । तीं पदें प्राकृत जाणोनि ॥९६५॥
विषदा म्हणजे भवयातना । त्यांचें पद तें विषयाचरणा । श्रीकृष्णांघ्रिआश्रितां जनां । सहसा पुनः न भुलवी ॥६६॥
ऐसा कृष्णांघ्रिभजनप्रेमा । अगाध म्हणोनि वांछी ब्रह्मा । तो समासें कथिला महिमा । कुरुसत्तमा तुजलागीं ॥६७॥
एतत्ते सर्वमाख्यातं यत्पृष्टोऽहमिह त्वया । यत्कौमारे हरिकृतं पौगंडे परिकीर्तितम् ॥५९॥
कृष्णक्रीडानिरूपणीं । जें त्वां पुशिलें आशंकोनी । तें म्यां सर्व तुझ्या श्रवणीं । विवळ करूनि घातलें ॥६८॥
कुमारपणीं जे क्रीडा केली । ते पौगंडीं व्रजीं कथिली । ते तव आशंका निरसिली । कीं कांहीं उरली सांग पां ॥६९॥
ऐसें कौरवा हरिचरित्र । शुक वर्णूनि पवित्र । ज्याचें सेवील श्रोत्रवक्त्र । त्याचें विचित्र फळ वर्णी ॥९७०॥
एतत्सुहृद्भिश्चरितं मुरोरेरघार्दनं शाद्वलजेमनं च ।
व्यक्ते तरदूपमजोर्वभिष्टवं श्रृण्वन् गृणन्नेति नरोऽखिलार्थान् ॥६०॥
सुहृद म्हणिजे गोपकुमार । जे देवांऋषींचे अवतार । अपार सुकृताचे सागर । तेणें सहचर कृषाण्चे ॥७१॥
तिहींशीं जे वत्सपक्रीडा । एक धांवती एकापुढां । लपविती जाळिया घोंगड्या । लाविती मेढां एकमेकां ॥७२॥
इत्यादि कौमारक्रीडन । यथोक्त अघासुरमर्दन । पुलिनीं तृणावरी भोजन । आणि विंदान विधीचें ॥७३॥
वत्सें वत्सप होऊनि कृष्ण । मायामोहें ठकिला द्रूहिण । त्यासि दाविलें चैतन्यघन । व्यक्तीहून निजरूप ॥७४॥
व्यक्त म्हणिजे जड प्रपंच । त्याहूनि शुद्धसत्त्वात्मक साच । तेणें रूपें वत्सप वत्स । होऊनि तुच्छ विधि केला ॥९७५॥
शेवटीं चिद्विलास अचोज । स्वप्रकाश तेजःपुंज । होऊनि ब्रह्म्यासि लाविली वोज । न वदतां निज गुज बोधूनी ॥७६॥
त्या ब्रह्म्यानें उत्क्रांतमति । उरु म्हणिजे जे उत्कृष्ट स्तुति । केली ते हें आख्यान गाती । कीं ऐकती सप्रेमें ॥७७॥
कीं अनुग्रहीती अर्थोपदेशें । मनीं ध्याती जे प्रेमोत्कर्षें । मननें आणि निदिध्यासें । अनुभवदशे जे आणिती ॥७८॥
त्यांसि सर्वही पुरुषार्थ । अर्थ स्वार्थ आणि परमार्थ । ओपी श्रीहरि यथार्थ । हा श्लोकार्थ शुक वदला ॥७९॥
कृष्ण संस्थापी त्यांचा धर्म । कृष्णात्मकचि त्यांचा काम । अर्थ स्वार्थ हेम धाम । पुरुषोत्तम स्वयें त्यांचें ॥९८०॥
घेऊनि शंख चक्र गदा । करीत शत्रूच्या वधा । त्यांच्या नासूनि भवदुर्मदा । ओपी संपदा स्वसुखाची ॥८१॥
ब्रह्मादि होती वश्यवर्तीं । तेथ कायसे चक्रवर्ती । उशनाप्रमुख वाचस्पति । त्यांतें स्तविती संतोषें ॥८२॥
सनकादिकां ब्रह्मवृंदा । सेव्य होती ते संवादा । कीं ते आवडती गोविंदा । निज स्वानंदासारिखे ॥८३॥
असो त्यांची अगाध प्राप्ति । एक्या मुखें मी वर्णूं किती । संतति संपत्ति सत्संगति । ते लाहती कें नवल ॥८४॥
इहामुत्रार्थ तया जोगें । ना त्या ओळगिजे अपवर्गें । नवल नोहे ज्यांपुढें मागें । स्वयें श्रीरंगें तिष्ठतां ॥९८५॥
ऐसा महिमा श्रवणीं पठणीं । एथ वदला द्वैपायनि । कौमारक्रीडाउपसंहरणीं । संक्षेपवाणी वदतसे ॥८६॥
एवं विहारैः कौमारैः कौमारं जहतुर्व्रजे । निलायनैः सेतुबंधैर्मर्कटोत्प्लवनादिभिः ॥६१॥
ऐसे विहार नानापरी । कौमारवयीं जे लेंकुरीं । क्रीडिजती ते ते हरि । वत्सपाकारीं क्रीडला ॥८७॥
डोळेझांकणी लपंडाई । सेतुबंधनें ठायीं ठायीं । कपिउत्प्लवनाची नवाई । मर्कटचेष्टा अनेका ॥८८॥
निंबु तिंबु हेटिमेटी । चुंबाचुंभीं भोवरगांठी । तोवा खेळती वाळवंटीं । भोंवती घिरटी देऊनी ॥८९॥
कवडे भिंगोरियांच्या परी । जाळिया विणिती परोपरी । वेणुविषाणीं नागस्वरीं । आणिती हारीं परस्परें ॥९९०॥
ऐशा अनेक कौमारलीला । शारदा वदों न शके सकळा । त्या त्या क्रीडोनि क्रमिलें काळा । वत्सपाळां समसाम्य ॥९१॥
इतुकी कथा चतुर्दशीं । शुकें सांगोनि कुरुवरासी । पौगंडलीला परिसावयासी । म्हणे मानसीं सावध ॥९२॥
पौगंडवयसेमाजीं हरि । गोपवेषें धेनु चारी । रिघोनि तालवनामाझारीं । धेनुक मारी श्रीकृष्ण ॥९३॥
पंचदशीं हें चरित्र । कृष्णलीलामृत पवित्र । सांठवणेंसि सभाग्य श्रोत्र । श्रोतयांचें सत्पुण्यें ॥९४॥
श्रीएकनाथ सुधासिंधु । प्रकटी गोविंद चित्सुख इंदु । कृपाउदयें करितां बोधु । प्रेमा अगाध दयार्णवीं ॥९९५॥
इति श्रीमद्भागवत । अठरा सहस्र परमामृत । परमहंसाचा एकांत । श्रोता जेथ परीक्षिति ॥९६॥
वक्ता श्रीशुक आत्मविद । त्याहीमाजीं दशम स्कंद । त्यामाजीं ब्रह्मस्तुति अगाध । तो अध्याय प्रसिद्ध चौदावा ॥९७॥
गोविंदकृपेच्या उजीवडें । बाळभावें लाडें लाडें । पदापदाचे देऊनि झाडे । संतांपुढें उपलाविला ॥९८॥
एथ गर्व करूं कां वृथा । ब्रह्मस्तुतीचें व्याख्यान करितां । शास्त्रज्ञाही पडे गुंता । तेथ कायसी कथा अबलांची ॥९९॥
तथापि संतांच्या सहाकारें । सद्गुरूचे वरद करें । बोबडीं महाराष्ट्र उत्तरें । दयार्णववक्त्रें वदविलीं ॥१०००॥
इच्या श्रवणपठणें मननें । श्रोतीं सायुज्य साधणें । एथ साह्य कीजेल कृष्णें । सप्रेम खुणे जाणोनि ॥१००१॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहरूयां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां कौमारलीलायां ब्रह्मस्तुतिर्नाम चतुर्दशोऽध्यायः ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥६१॥ टीका ॥१००१॥ एवं संख्या ॥१०६२॥ ( चौदावा अध्याय मिळून ओवीसंख्या ॥८६६२॥ )
चौदावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : April 29, 2017
TOP