अध्याय १४ वा - श्लोक ३१ ते ३२

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अहोऽतिधन्या व्रजगोरमण्यः स्तन्यामृतं पीतमतीव ते मुदा ।
यासां विभो वत्सतरात्मजात्मना यत्तृप्तयेऽद्यापि न चालमध्वराः ॥३१॥

सामान्ययोनींमाजि जन्म । भक्तिभाग्यें भगवत्प्रेम । जेथ ब्रह्माही सकाम । वर्णाग्र्‍यभ्रमें सांडूनी ॥७॥
तेथ इतरांची अहंता । कायसी वर्णादिवरिष्ठता । जो अनुसरे भक्तिपथा । तो वंद्य तत्त्वतां विधिहरां ॥८॥
परमाश्चर्यें म्हणे विधि । धन्य यांची भाग्यसमृद्धि । धन्य यांची सुकृतसिद्धि । चित्तशुद्धिपूर्वक ॥९॥
धन्य व्रजींच्या गाई गोपी । ज्या अकल्प तपल्या विशुद्ध तपीं । भावें भजल्या संकल्पलोपीं । निर्विकल्पीं निष्काम ॥७१०॥
ज्यांचिया वत्सांची अगवणी । तुवां घेऊनि चक्रपाणि । बळेंचि कांसेसि रिघोनी । स्तन्य पिऊनि तोषसी ॥११॥
औरसा पुत्रा म्हणती आत्मा । त्याच्या मोहें पावती भ्रमा । बद्ध होऊनि हेमधामा । पडती दुर्गमा माजिवडें ॥१२॥
जो तूं ब्रह्म सनातन । होऊनि गोपींचा नंदन । परमात्मा कीं संतोषोन । त्यांएं स्तन्य प्यालासी ॥१३॥
म्हणसी आश्चर्ये काय येथ । तरी ब्रह्मादिकांसहित । यजितां अध्वरीं यथोचित । नोहसी तृप्त अद्यापि ॥१४॥
द्रव्यतपादि याग बहुत । ज्याचे तृप्तीसि असमर्थ । तो तूं गोपींचें स्तन्यामृत । प्यालासि अद्भुत हें वाटे ॥७१५॥
चतुराक्षर दोनी वार । त्यावरी पढती द्वयाक्षर । त्यावरी पढती पंचाक्षर । पुन्हा द्व्यक्षर पढताती ॥१६॥
पंचप्रेषवषट्कारीं । वेदविहित यथोपचारीं । यजितां तुष्टीच्या परपारीं । कोणीं अध्वरीं न पविजे ॥१७॥
त्या तुज घुरटा या गौळणी । आणि धेनु या पशुयोनि । तृप्त करिती स्तन्यपानीं । भाग्यें म्हणोनि आश्चर्यें ॥१८॥
ऐसें आश्चर्य निजमानसीं । करूनि प्रेमें उकसाबुकशीं । स्फुंदे आणि व्रजौकसांसी । आनंदेंशीं स्तवितसे ॥१९॥

अहो भाग्यमहो भाग्यं नंदगोपव्रजौकसाम् । यन्मित्रं परमानंदं पूर्ण ब्रह्म सनातनम् ॥३२॥

परमादरें आम्रेडितीं । व्रजौकसांची भाग्यसंपत्ति । चौं वक्रींच्या चौंभारतीं । करूनि वाक्यति स्तवितसे ॥७२०॥
भूमंडळीं गौळवाडे । अपार असती त्यामाजी गाढे । भाग्य नंदाचें रोकडें । वर्णी निवाडें विरिंचि ॥२१॥
नंदव्रजींचे जे निवासी । त्यांच्या अगाध भाग्यराशी । न गणविती मज विधीसी । शतxxxx xxकल्यें ॥२२॥
ज्याचे गांठीं नाहीं कवडी । तो एक निर्दैव बराडी । त्याहूनि सुवर्ण निष्क जोडी । सभाग्य प्रौढी तो एक ॥२३॥
कोटि सुवर्ण निष्क गांठीं । राजमान्य तो सभाग्य सृष्टीं । सर्व राजयांचिये मुकुटीं । धन्य जगजेठी चक्रवर्ती ॥२४॥
त्याही ऐश्वर्याचीं मोलें । वेंचूनि शक्रत्व साधिलें । त्याहूनि विरक्त जे दादुले । भाग्याथिले सभाग्य ॥७२५॥
त्याही विरक्तांमाजीं शूर । सत्यवादी सदाचार । जितेंदिर्य दयापर । तो सत्यपुरनिवासी ॥२६॥
तो मी सत्यलोकराणा । जेथ न सरतां साठीं तृणा । तया कैवल्या निर्गुणा । सुहृद्गणना ज्याभाग्यें ॥२७॥
गाईगोपींचा म्हणों काई । तृणादि प्राणिमात्र पाहीं । महद्भाग्याची नवाई । नंदालयीं भोगिती ॥२८॥
पारमेष्ठ्य पदांच्या कोटि । जेथ नसतां तृणासाठीं । व्रजौकसांची भाग्यगोठी । कोणा ओठीं वदवेल ॥२९॥
ज्याचा सखा परमानंद । पूर्णब्रह्म आनंदकंद । त्याचा भाग्यमहिमा विषद । वदों वेद न शकती ॥७३०॥
पुनःपुनः परमाश्चर्य । करूनि चमत्कारला होय । अनंत ब्रह्मांडांची जो भ्यो । तो ज्यांस काय खेळणें ॥३१॥
असो यांची भाग्यमहिमा । न वर्णवेचि निगमां आह्मां । परी आमुची सौभाग्यसीमा । पुरुषोत्तमा अवधारीं ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP