अध्याय १४ वा - श्लोक २८

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अंतर्भवेऽनंत भवन्तमेव ह्यतत्त्यजन्तो मृगयन्ति सन्तः ।
असन्तमप्यंत्यहिमंतरेण सन्तं गुणं तं किमु यन्ति सन्तः ॥२८॥

अध्यारोपाचा अपवाद । करूनि सदसद्ग्रंथीं भेद । जड निरसूनि सच्चिदानंद । आत्मा विषद सेविती ॥६७॥
त्वंपद जीव देहात्म मानी । त्यातें आत्मत्व कवळूनी । मूर्ख पडले भवबंधनीं । विवरूनि ज्ञानी सूटले ॥६८॥
तेंचि विवरण म्हणाल कैसें । वर्णिलें ये श्लोकीं विखानसें । स्वस्थ श्रोतीं निजमानसें । मननदशे आणावें ॥६९॥
पावे उद्भव संभव । म्हणोनि भव हें देहा नांव । त्यामाजि तूंतें महानुभव । निरसूनि माव हुडकिती ॥५७०॥
कर्मानुसार देहाध्यासें । चैतन्य आलें जडत्वदशे । क्षणभंगुरें दृश्याभासें । सुखविश्वासें भूललें ॥७१॥
तंव तें दृश्य नाशवंत । क्षणक्षणा पावे अंत । आत्मा अक्षय अनंत । गुरुवेदांतउपदेशें ॥७२॥
विवरूनि पाहतां कळले मना । मिथ्या दृश्य भवकल्पना । स्वर्ग नरक भोग नाना । निज अज्ञानास्तव होती ॥७३॥
देहादिक प्रपंचारोप । करूनि हरविलें आत्मस्वरूप । त्याच्या अपवादेंकरूनि लोप । निजात्मदीप उजळिती ॥७४॥
तया अपवादाची रीति । कैशी विवरिली महंतीं । तेचि सादर होऊनि श्रोतीं । यथानिगुतीं परिसावी ॥५७५॥
दृश्य तितुकें जड अनित्य । करणगोचर मनःकल्पित । आत्मा अगोचर चिन्मात्र नित्य । मिथ्या विवर्त हा तेथें ॥७६॥
हा अध्यारोप मानूनि साच । कवळिला आत्मत्वें प्रपंच । त्या त्वंपदाचा विवंच । ऐका विवच्च विवरणें ॥७७॥
सचित्सुखात्मा अविनाश । म्हणतां वैकुंठ कैलास । तरी ब्रह्मांड काळें पावे नाश । कैंचा निवास मग यांसी ॥७८॥
श्वेतद्वीप क्षीराब्धिजठरीं । वैकुंठ निर्मिलें तयावरी । तैसाचि दध्युदामाझारीं । कैलासगिरि निर्मिला ॥७९॥
इक्षुसागरीं स्वानंदपुर । निर्मिलें महागणपतिनगर । मधुसागरीं तमसःपर । भास्करपुर वसलेंसे ॥५८०॥
सुरासमुद्रीं ज्योतीरूपा । आदिशक्तीची भ्रमरगुंफा । तेथें नांदे विश्वस्वरूपा । चैतन्यदीपा चिच्छक्ति ॥८१॥
ऐशीं उपासकांचीं मतें । शाश्वत मानिती औपास्यांतें । समष्टिकरणसमुच्चयांतें । पृथगात्मत्वें कल्पिती ॥८२॥
विष्णु समष्टीचें अंतःकरण । चिच्छक्ति ते तेथींचा प्राण । चक्षु जाणिजे चंडकिरण । विसर्ग रक्षण गणपति ॥८३॥
तमोगुणाची अधिष्ठात्री । ते अहंकारदेवता तन्मात्री । यांसि आत्मत्वें अचतुरीं । लोकांतरीं भजिजेत ॥८४॥
याचा न करितां अपवाद । वास्तव आत्मा नोहे विशद । दृश्य अनात्मा दुःखद । त्रिविध भेद भवभ्रांति ॥५८५॥
हीं दैवतें शाश्वत असतीं । तरी कां प्रळयीं नासोनि जाति । हे उपासकांची भेदभ्रांति । अभेद नेणती परमात्मा ॥८६॥
स्थूलभूतांश विजातीय । दृश्य जडत्वें करणज्ञेय । उत्पन्न होऊनि लया जाय । आत्मा सन्मय केंवी हा ॥८७॥
सूक्ष्मवृत्तिसंकल्पजनित । विपरीत ज्ञानें होत जात । सजातीय भेदवंत । आत्मा अनंत केंवि तो ॥८८॥
आत्मविसरें पावे लय । स्वगत भेदें आनंदमय । सुषुप्त्यावरणें अप्रत्यय । तो कारणदेह केंवि आत्मा ॥८९॥
हेंचि नकळे जरी कानडें । तरी देही विषयासाठीं रडे । आनंदरूपा आत्मयाकडे । केंवि हें घडे विचारा ॥५९०॥
आत्मप्रकाशें आभासलें । बाह्य दृश्य मिथ्या कळलें । तें विषयाचें मावळलें । आत्म्यावेगळें आस्तिक्य ॥९१॥
जेव्हां मिथ्या बाह्य दृश्य । तेव्हां आमुष्मिकही बाह्य फोस । तत्प्राप्तीसि कर्मसोस । तो निःशेष मावळे ॥९२॥
म्हणाल दृश्य मिथ्या झालें । तरी विषयसेवन कां लागलें । क्षुधे तृषेनें जाकळिलें । तेव्हां नचले ज्ञानबळ ॥९३॥
साधुसंत महानुभाव । ज्ञानदेहींच झाले देव । त्यांसही विषयोपचार सर्व । पूजागौरव अर्पिती ॥९४॥
ऐका उत्तर या प्रश्नास । जों वरी देहीं आत्माध्यास । सांख्यीं योगीं अनाभ्यास । विषयसोस तंव न सुटे ॥५९५॥
घरची रांड व्यभिचारिणी । तरी भुजंगा कायशी वाणी । न वचे माशांची गोंगाणी । जंव पोहणी स्वदेहीं ॥९६॥
कांखे घेऊनियां सुणें । सदाचारी सोवळेपणें । देहतादात्म्यें ब्रह्म होणें । हें शाहणे विवरिती ॥९७॥
प्रत्यक्ष देहाची उत्पत्ति । विवरूनियां प्रळयस्थिति । ते नवचतां तादात्म्यभ्रांति । ब्रह्मप्राप्ति दुर्लभ ॥९८॥
पिता भक्षी अन्नरस । विष्ठा तयाचा वाकस । मध्य होय रक्त मांस । रेत सारांश तयाचें ॥९९॥
मातृदेहीं तारुण्यभर । तेणें प्रकटे रजोरुधिर । ते रजश्वलेचा लागतां पदर । वल्ली तरुवर करपती ॥६००॥
रजश्वलेची ऐकतां वाणी । घाला पडे पुरश्चरणीं । कृतसुकृता होय हानि । विहिताचरणी अयोग्य ॥१॥
ऐसें सदोष रज प्रसिद्ध । नामें म्हणती ज्या अशुद्ध । तेथ पिता कामें क्षुब्ध । रतिसंबंध संपादी ॥२॥
शिश्नद्वारें रेत खवळे । तें त्या अशुद्धामाजी मिळे । देह अमेध्य जठर खोळे । निपजे मळें दोहींच्या ॥३॥
पूर्वकर्मसंस्कारवशें । चैतन्य त्यामाजी जें आभासे । अनेकजन्मदेहाध्यासें । विषयसोसें बहिर्मुख ॥४॥
देहतादात्म्य तो जीव । सुखदुःखाचे सोशी घाव । अविद्याभ्रमें भोगी भव । एरव्हीं स्वयमेव परब्रह्म ॥६०५॥
कथिला देहाचा संभव । याचा सर्वांसि अनुभव । भूतां गुणांचा समुदाव । रूप नांव नाथिलें ॥६॥
जन्मापूर्वीं कोठें होतें । मरण पावोनि कोठें जातें । विवरूनि पाहतां अवघें रितें । भौतिकें भूतें घडमोडी ॥७॥
भिंती चिखलेंचि लिंपिएज । वस्त्रें सुतें शिविजे तुणिजे । तेवीं मळाचे मळीं देह निपजे । भुंजे रंजे मळयोगें ॥८॥
अन्नपानाचें मलमूत्र । तेणें डबडबी जननीजठर । तेथ पचोनि परिणमे गात्र । उपजे अपवित्र भगमार्गें ॥९॥
नव मांस कोंडोनि रजोरुधिर । स्तनीं परिणमे दुग्धाकार । प्रसूतिमोहें स्नेहपाझर । पोषे शरीर तत्पानें ॥६१०॥
पंचभूतात्मक धान्य । पिता भक्षितां रेत होऊन । देह झाला तो तेंचि अन्न । पुढतीं खाऊनि वाढतसे ॥११॥
देहात्मकत्वें भूतें असती । तें बाह्य भूतांलागीं झुरती । असतां देहतादात्म्यगुंती । सहसा खंती चुकेना ॥१२॥
आपुला गू म्हणूनि घेतां पदरीं । तो काय दुर्गंधिं उणी करी । तैशी आत्मबुद्धि जों शरीरीं । दुःखसागरीं तों बुडणें ॥१३॥
अस्थित्वग्मांसनाडीकेश । एवं कुत्सित हे जडांश । आत्मबुद्धि हे सदोष । होतो त्रास जों नुपजे ॥१४॥
शुक्र शोणित मूत्र लाळ । स्वेदादि द्रवांश केवळ । पाहतां प्रत्यक्ष अमंगळ । ते कवळी निर्मळ आत्मत्वें ॥६१५॥
क्षुधा तृषा निद्रा तंद्रा । मैथुनादि दुर्विकारां । धरूनि एथींच्या अहंकारा । निर्विकारासम मानी ॥१६॥
चळण वळण प्रसारण । धावन आणि निरोधन । स्थूळीं चाळक पंचधा पवन । आत्मा म्हणोनि जो चाळवी ॥१७॥
शोक मोह आणि लोभ । लज्जा भय हें पंचधा नभ । स्थूळातादात्म्यें संक्षोभ । आत्मा निर्लोभ भांवावे ॥१८॥
ऐशीं देहरूपें जियें भूतें । जीवचैतन्यें भ्रमोनि तेथें । मी मी म्हणोनि विषयस्वार्थें । मोहावर्तें परिभ्रमिजे ॥१९॥
भूतें भूतांचिमाजीं राहती । भूतें भूतां खाती पिती । भूततेजें रहाटती । भूतें चळती भूतगर्भीं ॥६२०॥
स्थूळतादात्म्य न सोडी । तोंवरी विषयार्थ चरफडी । भूतसंघाताची प्रौढी । विषया वरपडी चैतन्या ॥२१॥
जागृदवस्था नेत्रस्थान । आत्मा लेवूनि विश्वाभिमान । पाहे नाथिलें दृश्यमान । भूतें होऊन भूतत्वें ॥२२॥
प्रत्यक्प्रणवअभ्यासमार्गें । शमदमपूर्वक विषयत्यागें । वातवबोधें निजात्मयोगें । होती निजांगें चिद्रूप ॥२३॥
जलचरां जलाचा जेवीं वियोग । तेवीं भौतिकां विषयत्याग । स्वकरणीं कार्यानुराग । सहसा वियोग न साहवे ॥२४॥
भूतें स्वकरणीं जेवीं भजती । तेंवि चैतन्य स्वसंवितीं । लाहोनि धरी जैं उपरति । तैं विरक्ति विषयीं ये ॥६२५॥
विपरीत ज्ञानाचा निरास । अपरोक्षबोधाचा प्रकाश । होतां विषयीं ये वैरस्य । भव निःशेष पारुषे ॥२६॥
तथापि अभ्यासावेगळें । दश्य निःशेष न मावळे । अनादि अध्यासाचेनि बळें । करणा कळे नाथिलें ॥२७॥
महारोगहरणीं सद्य । घेतां अमृतातुल्य ओखद । काकस्मरणाचा निषेध । बोधी वैद्य तो तोटका ॥२८॥
परी तें पूर्वाध्यासबळें । अवश्य आठवेचि काउळें । विस्मरणाचा उपाय न कळे । रोगें आहळे तथापि ॥२९॥
वाफा भरला पूर्ण जळीं । ऐसें जाणों सरल्या माळी । जंव तो मुरडूनि मागुतें वळी । पूर्व सरली तों तें ये ॥६३०॥
तेंवि अभ्यासाचेनि बळें । मनबुद्ध्यात्मक चैतन्य वळे । करणज्ञान तैं मावळे । दृश्य विवळे मग कोणा ॥३१॥
पूर्वाभ्यासीं योगभ्रष्ट । विषयविरागीं अंतर्निष्ठ । त्यासीच आत्मावबोध स्पष्ट । अभ्यासकष्ट न करितां ॥३२॥
दैवें लाहे एक निधान । येरीं शिणोनि जोडिजे धन । तैसें योगभ्रष्टाविण । अभ्याससाधन सर्वांसी ॥३३॥
अभ्यास म्हणाल कोण कैसा । तरी मनपवनाचा मुरडूनि घसा । जंववरी होय चिदाभासा । स्वप्रकाशामाजीं वसती ॥३४॥
कारणींच रमले मेघ । तरी कैंची वृष्टि कैंचे वोघ । देह नहोनि त्यजिजे रोग । योगवियोगभोगादि ॥६३५॥
मनुअबुद्ध्यादिकीं उमटे । भ्रमाक्त धांवे इंद्रियवाटे । तें चैतन्य आपणा पैं भेटे । ऐसें उफराटें वळावें ॥३६॥
म्हणाल कोण वळिता त्यातें । तरी मोहभ्रमें पडिल्या गर्ते । भ्रांतित्यागें उमजल्या तेथें । आणिजे वरतें आपआपणया ॥३७॥
तेथ वज्रासनादि क्रमें । गुरूपदिष्ट अनुक्रमें । राजयोगादिवृत्तिनियमें । अभ्यासवर्मं साधिजे ॥३८॥
आपुले विश्रांतीकारणें । शय्या एकांतीं घालणें । तेथ पहुडोनि विश्रांति घेणें । हेंही करणें तैसेंची ॥३९॥
जागृतीचा सोडूनि ठावो । स्वप्नसुषुप्ति नेदिजे येवो । तुर्येमाजीं हारतां फावो । लागे स्वयमेव आत्मत्व ॥६४०॥
साक्षित्वाचा मोडतां ठाय । अनादि अभ्यास भंगोनि जाय । सच्चित्सुखीं समरस होय । नवचे मोहें कवळिला ॥४१॥
संकल्पजात मनाचें जाळें । निःशेष कामना मावळे । अभेद आत्मत्व वास्तव उजळे । अध्यस्त गळे भवभान ॥४२॥
पुढतीं प्रारब्धाचिये भरीं । येऊनि वर्ते देहावरी । तरी तेथींचें तादात्म्य न धरी । निर्विकारी निजरूपें ॥४३॥
ब्रह्मा म्हणे ऐशिया परी । जड निरासे अभ्यंतरीं । शोधूनि भजती तूंतें हरि । प्रत्यग्विवरीं विवरूनी ॥४४॥
निःशेष न होतां जडनिरास । न पारुषेचि गर्भवास । तोंवरी बाधीच विषयाभास । वृथा हव्यास प्राप्तीचा ॥६४५॥
जंवरी सर्पत्व वाटे सत्य । समीप असोनि रज्जु अस्त । पावे तैसा अनात्मा सत्य । तंव अप्रपत निजरूप ॥४६॥
ध्येय ध्यान आणि धारणा । आसन मुद्रा अभ्यास नाना । लयलक्ष्यादि साधना । खंडज्ञाना जाणिजे ॥४७॥
खेचरी भूचरी चांचरी । शांभवी आणि अगोचरी । या साधनीं देहधारी । विवर्तापरी या हेतु ॥४८॥
चित्त विषयांसि पडकलें । तेथूनि न सुटे कांहीं केले । तैं याचिया अभ्यासबळें । कीजे वेगळें चित्तासी ॥४९॥
जो न सोडी दुष्टाचरण । राजालयीं त्या बंदिखान । त्यासी मानिजे सिंहासन । समाधान हें तैसें ॥६५०॥
सांडितां दुष्टाचरण खोडी । राजकृपेची होय जोडी । ऐश्वर्यची बाणे प्रौढी । नातरी बेडी चुकेना ॥५१॥
सांडूनि अध्यस्ततादात्म्य । स्वरूप समरसें पावे रम्य । तैं तें म्हणिजे कैवल्यधाम । येर ते श्रम खंडज्ञा ॥५२॥
पाहोनि नेत्राचा अकार । हाचि पुरुष अंगुष्ठमात्र । रक्त श्वेत कृष्ण गहिर । वर्णविचार बोधिती ॥५३॥
म्हणती नीवारशूकापरी । पीत प्रभा प्रकाशे नेत्रीं । इत्यादि श्रुतीच्या आधारीं । नेत्रांतरीं विलोकिती ॥५४॥
तेथ फिरवून पाहतां बुबुळें । उठती तेजाचे उमाळे । हिरवे पिवळे काळे निळे । विचित्र धवळे लखलखित ॥६५५॥
तयाचि नांवें म्हणती ब्रह्म । येथवरी अध्यारोपभ्रम । हा न वचतां वृथा श्रम । न चुके जन्ममरणादि ॥५६॥
लक्षीं ब्रह्म प्रकाशिलें । तें म्यां पाहोनि अनुभविलें । साक्षित्वें जें वेगळें उरलें । लक्ष सुटलें मग सांगे ॥५७॥
प्रत्यक्ष राजा म्यां देखिला । म्हणे तो काय राव झाला । वियोगें बाहेरी घातला । तेव्हां पडिला रंकची ॥५८॥
भूमि खणितां निघे नीर । त्वचा भेदितां निघे रुधिर । तेंवि भूतें रोधूनि करितां स्थिर । सुखाकार मन होय ॥५९॥
वज्रासनादि आसनबळें । बाह्यप्रपंच मावळे । मनविश्रामें आनंदमेळे । पार्थिव विवळे सुख तैं तें ॥६६०॥
ऊर्ध्वशुक्रशलाकामार्गें । कीं लंबिकादि अभ्यासयोगें । विश्वविसरें विश्रांति जागे । ते वरुणप्रसंगें सौरस्य ॥६१॥
नेत्रद्वारें मुद्रालक्ष । धरितां मावळे विश्वाभास । प्रकाशामाजीं उजळे तोष । तो तैजस भूतमय ॥६२॥
घ्राणप्राणाच्या निरोधें । विश्वाभासाच्या अबोधें । मन विश्रामे पवनानंदें । नोहे तें नुसधें चित्सुख ॥६३॥
श्रवणीं ध्वनीचा अभ्यास । होतां विसरे विश्वाभास । तेथ उमटे जो संतोष । तो आकाशसंभूत ॥६४॥
अमनस्कादि अभ्यासगति । चंद्रीं स्थिरावो निवृत्ति । मनचि भोगी स्वविश्रांति । पुन्हा प्रवृत्ति चुकेना ॥६६५॥
ऐसें खंडज्ञानानंदें । शुद्ध न होती ब्रह्मानंद । भूताधारें होती विशद । ते ब्रह्मविद नादरिती ॥६६॥
लक्ष धरितां मूर्च्छना आली । तेणें तटस्थ वृत्ति झाली । लक्ष भंगितां असे पहिली । प्रपंचभुली अभंग ॥६७॥
ऐसा अध्यस्त अध्यारोप । त्याचा निःशेष करितां लोप । निवडे चिन्मात्र आपेंआप । नित्य निर्लेप निष्कलंक ॥६८॥
हरि हर ब्रह्मा हो उपदेष्टा । करो कां अनेक्या सचेष्टा । सर्व विस्मरणाविण काष्ठा । कैंची प्रतिष्ठा स्वस्वरूपीं ॥६९॥
एवं कथिलीं खंडज्ञानें । तींहीं विसराचीं साधनें । परी माजि नाडिती जितुकीं विघ्नें । तितुकीं भग्न केलिया ॥६७०॥
ऐसें अपरोक्षज्ञानघन । अतदध्यस्तत्यागें जाण । निःसंशय तुजलागुन । घेती शोधून स्वदेहीं ॥७१॥
स्वयें आत्मत्वें निवडून । मिथ्या मिथ्यत्वें दवडून । सदा स्वानंदीं पहुडोन । सुखसंपन सर्वदा ॥७२॥
ब्रह्मा म्हणे जी गुंजावतंसा । ज्ञानेचि पाविजे निःश्रेयसा । म्हणसी भक्तीचा घोष कायसा । परी परेशा परियेसीं ॥७३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP