अध्याय १४ वा - श्लोक २४ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
एवंविधं त्वां सकलात्मनामपि स्वात्मानमात्मात्मतया विचक्षते ।
गुर्वर्कलब्धोपनिषत्सुचक्षुषा ये ते तरंतीव भवानृतांबुधिम् ॥२४॥
एवं म्हणिजे ऐशिये रीती । जे कां तूंतें विवरून पाहती । ते हा मिथ्या भवाब्धि तरती । कोणे रीती तें ऐका ॥१॥
तुझें आत्मत्व आहे जैसें । ज्ञान निर्धारूनियां तैसें । मिथ्या अनित्योपाधि नासे । वास्तवदशे वेंठती ॥२॥
आत्मप्रियत्वें अवघें प्रिय । देहगेहादि जायातनय । वृत्तिक्षेत्रादि अमुत्र विषय । मायामय हें जाणूनी ॥३॥
मायामय हें कळलें कैसें । सद्गुरुचित्सूर्यप्रकाशें । उपनिषज्ज्ञान दृष्टिवशें । रजतमनाशें विवळल्या ॥४॥
अविद्येची हरली नीज । स्वप्नभ्रमाची मानिली लाज । अपरोक्षबोधें चक्षु सुतेज । वास्तव उमज स्वात्मत्वीं ॥५०५॥
तेव्हां स्वप्नींचा भवसागर । विषयसुखाचा अभ्यासमात्र । अनेक दुःखीं अतिदुस्तर । तो ते नर निस्तरती ॥६॥
ये श्लोकीं सूत्रप्राय । त्रिविध बोलिला तरणोपाय । तोचि श्लोकचतुष्टयें । वृत्तिन्यायें विधि वर्णी ॥७॥
याचि श्लोकींच्या तीन्ही परी । सूचिजती प्रथमाकारीं । तेथ सावधान क्षणभरी । होऊनि चतुरीं परिसिजे ॥८॥
ज्ञानेंकरूनि तरती एक । न बुडोनि तरले ते द्वितीय देख । प्रत्यगात्मत्व विवेक । तरले साधक तीसरे ॥९॥
द्विविध प्रत्यगात्मत्वविवेक । दोघे करिती मूर्खामूर्ख । एवं चौश्लोकीं सम्यक । सत्यलोकपति वदला ॥५१०॥
आत्मानमेवाऽऽत्मतयाऽविजानतां तेनैव जातं निखिलं प्रपंचितम् ।
ज्ञानेन भूयोऽपि च तत्प्रलीयते रज्वामहेर्भोगभवाभवौ यथा ॥२५॥
ज्ञानें करूनि कैसे तरले । तेंचि पाहिजे परिसिलें । तरी या भवाब्धीचें पहिलें । होणें झालें तें ऐका ॥११॥
अविद्येच्या अंगीकारें । स्वस्वरूपाचिया विसरें । तमोगुणाच्या आविष्कारें । झालें अंधारें कारण ॥१२॥
तयामाजीं सत्त्वाभासें । विपरीतज्ञानें विक्षेपवशें । मनबुद्ध्यादि वृत्तिविशेषें । जीवित्वदशे विरूढविलें ॥१३॥
तेणें मिथ्या दृश्य प्रपंच । तो विवर्त केला साच । तेव्हां तापत्रयाचे जाच । सोशी शोच्य होऊनी ॥१४॥
सामोर भिंतीचा कोन्हाडा । खचित दर्पणीं पाहतां मूढां । भ्रमें दुसरा दिसे वाडा । नुमजोनि वेढां लागे पैं ॥५१५॥
मागीलचि पुढें भासे । भ्रमास्तव नुमजे ऐसें । मग आप्तोक्तिगुरूपदेशें । कळे जैसें यथोक्त ॥१६॥
आत्मा आत्मत्वें नेणोन । अध्यासिलें प्रपंचभान । सद्गुरुवाक्यें होतां ज्ञान । होय निरसन भ्रमाचें ॥१७॥
जैसा रज्जूवरी सर्प । भ्रमाक्तज्ञानें जो आरोप । तो अपवादें पावे लोप । कळतां रूप रज्जूचें ॥१८॥
रज्जूसर्पाचें होणें जाणें । स्वआस्तिक्यें ज्ञानाज्ञानें । एक तरले प्रकारें येणें । ऐसें द्रुहिणें विवरिलें ॥१९॥
आतां तरले याचि परी तरले । नाहींच भवाब्धि स्पर्शले । तेही जाती निरूपिले । श्रवण केलें पाहिजे ॥५२०॥
N/A
References : N/A
Last Updated : April 29, 2017
TOP