श्रीशुक सांगता- हे कुलभूषण परीक्षिति राजा ! याप्रमाणे भववंतांनी उपदेशरुपाने आज्ञा केली. त्याप्रमाणे यादवांनी प्रभासाला जाण्याचा निश्चय केला आणि त्यांनी रथांची तयारी केली. ॥१॥
हे राजा परीक्षिता ! परंतु हा सर्व प्रकार पाहून उध्दव व्याकुलित झाला. तो भगवंताचा अनन्य भक्त होता. त्याने भगवंताचे भाषण ऐकलेच होते व व घोर व भयंकर अनर्थ प्रत्यही होत आहेत हेही पाहिले होते. ह्या एकनिष्ठ भक्ताने जगन्नायक श्रीकृष्णाला एकांतात गाठले, त्याच्या चरणावर मस्तक ठेऊन नमस्कार केला, हात जोडले आणि तो म्हणाला. ॥२-३॥
उध्दव म्हणतो, देवाधिदेवा ! योगेश्वरा ! तुझ्या नामांचे व चरित्राचे श्रवण व कीर्तन पवित्र व पुण्यकारक आहे. भगवान् ! विप्रांनी यादवकुलाला दिलेल्या शापाचा निरास करण्याला समर्थ असताही तू त्याचा निरास केला नाहीस, म्हणून मला वाटते की, या कुलाचा संहार करवूनच मग हा भूलोक सोडून जावे, असा तुझा संकल्प आहे. ॥४॥
केशवा ! तुझ्या चरणकमलाचा विरह मला एक क्षणार्ध सुध्दा दु:सह होईल, हे तू जाणतासेच. म्हणून कृपा कर आणि निजधामाला जाशील, तेव्हा मलाही बरोबर ने. ॥५॥
कृष्णा ! तुझ्या लीला म्हणजे मंगलमूर्तीचा प्रत्यक्ष अवतार होय. त्या लीलांच्या श्रवणरुपी अमृताचा आस्वाद ज्या भक्ताच्या कर्णांनी घेतला, त्याला दुसर्या कशाचीही अपेक्षा उतर नाही. ॥६॥
तू शयनावर पहुडलास, आसनावर बसलास, फिरु लागलास, मुक्काम केलास, स्नान करु लागलास, खेळ खेळण्यास आरंभ केलास, भोजन करु लागलास म्हणजे (तुझी सेवा करण्याचे ज्या भक्ताचे नित्यव्रत आहे ) ते आम्ही तुझे भक्त तुला, म्हणजे प्राणाहूनही प्रिय असणार्या अशा आत्म्याला , सोडून जाण्याला कसे समर्थ होऊ? ॥७॥
देवा तु उपभोगिलेली माळा, तुझ्यासाठी सिध्द केलेला सुवासिक गंध, वस्त्रे, अलंकार यांनीच आम्ही भक्त मंडित होतो. या अलंकारांनी व तुझ्या पात्रांतील उच्छिष्ट भक्षणाने मात्र आम्ही मायेचा पराभव करण्यास समर्थ होतो. ॥८॥
वातांबु म्हणजे वायूचे व जलाचे मात्र भक्षण करुन तपश्चर्या करणारे ऋषी, सर्वत्याग करणारे श्रवण, नैष्ठिक ब्रह्मचारी, हे अवघड तपश्चर्या करुन व तद्योगे शांत व निर्मळ होऊन ब्रह्मनामक तुझ्या वैकुंठास जातात. ॥९॥
हे योगेश्वर भगवंता ! हा संन्यासाचा अवघड मार्ग होय. परंतु आम्ही , या भ्रामक संसारामध्ये राहून जर तुझ्या मंगल चरित्राचे श्रध्देने श्रवण केले तर या अति सोप्या भक्तिमार्गाने आम्हाला हा दुस्तर भवसागर सहज लीलेने तरुन जाता येतो. ॥१०॥
जगताचा उध्दार करणारी तुझी कृत्ये, मनाला उत्कृष्ट शांती देणारे तुझे भाषण , गमन, हास्य, अवलोकन थट्टा इत्यादि जे जे काही तू मनुष्ययोनीत जन्म घेऊन मनुष्याचे अनुकरण करण्यासाठी केलेस, त्याचे स्मरण-कीर्तन करणार्या आम्हाला संसाराची मुळीच भीती नाही. असे जरी आहे तरी पण देवा, तुझा वियोग मला कसा सहन व्हावा ? म्हणून तू मला घेऊनच निजधामास जा. ॥११॥
श्री शुक राजास सांगतात- राजा ! भगवान् देवकीनंदनाला याप्रमाणे उध्दवाने नम्र विज्ञापणा केली. श्रीकृष्ण त्या परमप्रिय व एकनिष्ठ भक्ताला म्हणाले. ॥१२॥
अध्याय पहिला समाप्त