उध्दव म्हणाला, श्रीकृष्णा ! वर्णाश्रमधर्माचे आचरण करणार्या सर्व मानवांचा जो भक्तिरुप धर्म तू पूर्वी सांगितलास आणि ज्या स्वधर्माचे आचरण केले असता जीवाला तुझी आत्यंतिक भक्ती उत्पन्न होईल, ती पध्दति कृपा करुन मला स्पष्ट समजेल अशा रीतीने सांग. ॥१-२॥
माधवा ! सृष्टीच्या प्रारंभी हंसस्वरुप घेऊन तू ब्रह्मसभेमध्ये ब्रह्मदेवाला व सनकादिकांना अत्यंत कल्याणावह असा धर्म सांगितला आहेस हे खरे आहे; ॥३॥
तथापि, हे शत्रुंजया ! पूर्वी ब्रह्मलोकी तो धर्म विहित केला तो धर्म आता या लोकी फारसा अथवा मुळीच उपयोगी पडणार नाही. ॥४॥
हे अच्युता ! प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्य सभेत सर्व विद्या मूर्तिमंत विद्यामान असता. जर तुझ्याशिवाय धर्मप्रवचन करणारा, त्याची स्थापना करणारा व त्याचे प्रतिपादक, धर्म निर्माण करणारा आणि धर्माचे रक्षण करणारा सापडणे अशक्यच आहे. ॥५॥
आणि हे मधुसुदना ! धर्मसंस्थापक, धर्मोव्दारक आणि धर्मसंरक्षक असा तू अनाद्यनंत महापुरुष, ही पृथ्वी सोडून निजधामाला गेल्यानंतर, तो नष्टप्राय झालेला त्वस्थापित धर्म मग कोण सांगणार? ॥६॥
म्हणून हे जगदीशा ! सर्व धर्मांचे पूर्ण ज्ञान असणार्या देवा ! तुझ्या भक्तीनेच विशिष्ट असणारा जो सर्वमंगलकारक धर्म नित्य आहे, त्याचे अनुष्ठान कोणत्या मनुष्याने कोणत्या पध्ततीने करावे, हे मला सांग. ॥७॥
श्री शुकाचार्य म्हणतात, राजा ! याप्रमाणे भगवत्सेवकांमध्ये मुख्य अशा उध्दवाने विचारले असता संतुष्ट होऊन भगवान् श्रीकृष्ण मनुष्याच्या कल्याणकरिता पुरातन धर्म सांगू लागला. ॥८॥
श्रीकृष्ण म्हणाला, उध्दवा ! हा तुझा प्रश्न धर्माला अनुकूल असून सर्व जीवांस व विशेषत: वर्णाश्रमी आर्यास कल्याणावह होणारा आहे . असो. ॥९॥
पूर्वी कृतयुगांत सर्व मनुष्ये एकच वर्णाची होती. त्या वर्णाचे नाव हंस. उध्दवा ! त्या वेळी विद्यमान असणारा प्रत्येक पुरुष कृतकृत्य असे. म्हणून त्या युगाला ‘कृतयुग’ असे नाव मिळाले. ॥१०॥
त्या वेळी वेद केवळ ओंकारस्वरुप मात्र होते. वृषस्वरुप (गोस्वरुप, वृष= वृषभ) धारणा करणारा जो मी धर्म, तो त्या वेळी चतुष्पाद म्हणजे सत्यादिचारी परिपूर्ण असा होतो. त्या काळी एकाग्र तपश्चर्येने परिशुध्द झालेले ऋषि माझी उपासना करीत. ॥११॥
महाभाग उध्दवा ! पुढे त्रेतायुगामध्ये माझ्या हृदयांतूनच प्राण म्हणजे नि:श्वास, या रुपाने कर्म विहित करणारी वेदत्रयी (ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद ही त्रयी) प्रकट झाली. तेव्हां तीन भाग आहेत ज्याचे असे (यज्ञरुपी) कर्म सुरु झाले. हौत्र म्हणजे ऋग्वेदांतर्गत होत्याचे कर्म, यजुर्वेदांतील अध्वर्यूचे कर्म आणि सामवेदप्रणी उद्रात्याचे कर्म, अशा तीन मुखांनी मीच प्रकट झालो. ती कर्मस्वरुपी मी म्हणून त्रेतायुग हे नाव. ॥१२॥
तसेच, विराटस्वरुपी अशा माझ्या मुखापासून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, उरुंपासून वैश्य आणि माझ्या चरणांपासून शूद्र असे चार वर्ण निर्माण झाले. त्या प्रत्येक वर्णाचे स्वाभाविक गुण भिन्न होते. तद्नुसार त्यांचा अनुष्ठानादि धर्माचारही निराळा झाला. ॥१३॥
त्याचप्रमाणे माझ्या जघनापासून (कटिपश्चाद्भागापासून) गृहस्थाश्रम झाला. माझ्या हृदयापासून ब्रह्मचर्याश्रम झाला व माझ्या वक्ष: स्थलापासून वनाप्रस्थाश्रम आणि माझ्या मस्तकापासून संन्यास उत्पन्न झाला. ॥१४॥
उध्दवा ! या चार वर्णांच्या व चार आश्रमांच्या प्रकृति- स्वभाविक गुणधर्म जन्मभूमीच्या क्षेत्रानुसार म्हणजे आनुवंशिक संस्करानुसार प्रकट होत. नीच जन्मभूमि असेल तर नीच व उत्तम क्षेत्रांतून प्रकृति, असा भेदभाव उत्पन्न होऊन वर्णाश्रम ठरले. ॥१५॥
ब्रह्मप्रकृतीचे ब्राह्मणांचे गुणधर्म - शम, दम, तप, अंतर्बाह्य शुध्दी, समाधान, क्षमा, ऋजुता, ईशभक्ती, दया आणि सत्य हे होत. ब्राह्मणाचे हे स्वाभाविक गुण किंवा ह गुण उत्कर्षाने असतील ती प्रकृति विप्राची. ॥१६॥
तेज (प्रताप), बल, धैर्य, शौर्य, सहनशीलता, औदार्य, उद्योगप्रियता, अचंचलता (चिकाटी), ब्राह्मण्यता (वेद व ब्राह्मण यांवर श्रध्दा) आणि प्रभुता ह्या क्षत्रियांच्या प्रकृति होत. ॥१७॥
आस्तिक्यबुध्दी (श्रध्दा), दानशूरता, विचारानुसारच उच्चार व आचार (ढोंग नसणे), वेदब्राह्मणांची सेवा, संपत्तिसंग्रहा- संबंधाने असमाधान ( जास्ती मिळविण्याची हाव व तत्प्रीत्यर्थ उद्योग) ह्या पांच गुणधर्मांची प्रकृती वैश्याची असत. ॥१८॥
व्दिज, देव आणि धेनु यांची निष्कपट सेवा करणे आणि या सेवेचा मोबदला मिळेल त्यांत संतुष्ट असणे, ही शूदाची लक्षणे होत. ॥१९॥
हे वर्णाचे वैशिष्टय दाखविणारे धर्म झाले. आता सर्व वर्णांस सर्वदा पूज्य असणारे गुण सांगण्याच्या आधी अतीशूद्रांचे गुण सांगतो ते ऐक. आत बाहेर मलीनपणा, खोटे बोलणे व चोरी करणे यांची आवड, सर्व ठिकाणी वेदादि धर्मावर अविश्वास, उकरुन भांडण काढण्याची हौस, काम क्रोध लोभ हे गुण ज्या पुरुषांत दिसतील त्याला शूद्र म्हणावे. ॥२०॥
हिंसाशून्यता, सत्यप्रीति, अपहार - बुध्दीचा अभाव, काम क्रोध लोभ या समाजघातक मनोवृत्तींचा अभाव आणि लोकांचे प्रिय व हित करण्याकडे लक्ष , हा सर्व वर्णांस योग्य असणारा धर्म आहे. ॥२१॥
गर्भाधानादी संस्कारानंतर उपनयन (गुरुकुलात जाण्याला अधिकार देणारा संस्कार; मौजीबंधन) झाले म्हणजे दुसरा जन्मच होतो. म्हणून ज्यांचे उपनयन होते त्यास व्दिज (याच देही दोन जन्म असणारा) म्हणतात. या ब्रह्मचार्याने गुरुगृही राहावे, इंद्रियनिग्रही असावे अध्ययन करावे. ॥२२॥
त्याने मेखला (मुंज -गवताचे कटिसूत्र ), मृगासन, दंड-काठी, माळ, यज्ञोपवीत, कमंडलू वगैरेंनी युक्त असावे. त्याने जटा वाढवाव्या ,ब्रह्मचारी करताना दात व कौपीन (वस्त्र) यांच्या शुध्दीकडे लक्ष देऊ नये, आसन रंगवूं नये आणि नेहमी हातामध्ये दर्भाचे पवित्रक घालावे. ॥२३॥
स्नान, भोजन, होम, जप, मलविसर्ग इ. करताना मौन ठेवावे. नखे , केश (खाकेतील व गुह्यभागांतील सुध्दा) काढू नये. ॥२४॥
ब्रह्मचार्याने केव्हांही बुध्दिपुर: सर वीर्याचा नाश करु नये. यदाकदा वीर्यस्खलन कधी आपोआप झालेच, तर लगेच स्नान करुन प्राणायम करावा आणि त्रिपदा गायत्रीचा जप करावा. ॥२५॥
होमकुंडांतील अग्रीची, गुरुजीची, गोमातेची, ब्राह्मणांची, ज्ञानवृध्दांची, देवाची उपासना शुचिर्भूत राहून नित्य एकाग्र मनाने (समाधान वृत्तीने) करावी. सकाळची व सायंकाळची संध्या करताना मौन धरावे व गायत्रीचा जप नेमाने करावा. ॥२६॥
आचार्य (उपदेष्टा गुरु) प्रत्यक्ष परमेश्वर आहे अशी दृढ भावना ठेऊन केव्हाही व कोठेही त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अपमान करु नये. तो केवळ मनुष्य आहे असे समजून त्याच्या मान्यतेसंबंधाने व्देष किंवा असूया असू नये. कारण गुरु म्हणजे सर्व देवांचे आश्रयस्थान असते. ॥२७॥
सकाळी व संध्याकाळी आणलेली भिक्षा गुरुजींना अर्पण करावी आणि जेवढा भाग आपल्यास गुरुजी देतील, तेवढयावरच निर्वाह करावा. मात्र त्यांची आज्ञा झाल्यास इतर पदार्थांचा स्वीकार करावा. आणि नेहमी मन स्वाधीन ठेवून इंद्रियांचा निग्रह करावा. ॥२८॥
आचार्यांची सेवा करीत असता अत्यंत नम्र वृत्ती धारण करावी. नेहमी हात जोडून असावे. गुरुजी बाहेर फिरण्यास गेले, शयनारुढ झाले, किंवा आसनावर बसले असतील तेव्हा ब्रह्मचार्याने त्यांच्यापासून फार लांब नाही अशा स्थानीं असावे. हे सामान्य ब्रह्मचार्याचे धर्म होत. ॥२९॥
या प्रकारचे भोगाविरहित आचरण मन:पूर्वक ठेवून विद्या संपेतोपर्यंत ब्रह्मचर्य अविच्छिन्न ठेवून गुरुगृही वास्तव्य करावे. ॥३०॥
आता एखाद्या विद्यार्थ्याला वेदांच्या भुवनात किंवा ब्रह्मभुवनात जाण्याची दृढ इच्छा असेल, तर त्याने नैष्ठिक ब्रह्मचार्याची दीक्षा घेऊन पुढील अध्ययनासाठी गुरुजीस आपला सर्व देहच अर्पण करावा. ॥३१॥
वस्तू, अग्नी, गुरु, आपला जीवात्मा व इतर सर्व भूते या सर्वच ठिकाणी श्रीपरमेश्वर आहे अशी भावना ठेवावी. ॥३२॥
ह्या ब्रह्मचार्याने स्त्रियांचे दर्शन, त्यांचा स्पर्श, त्यांच्यांशी भाषण, अथवा इतर प्रकारचा विनोद करु नये; आणि एकत्र आलेल्या नरमाद्यांचे विलास पाहण्याचे तर पहिल्याप्रथम टाकून द्यावे. ॥३३॥
इतर ब्रह्मचार्यांप्रमाणे ह्या नैष्ठिकाने नियमत: मलविसर्जन, आचमन, स्नान, संध्योपासन, ऋजुता, तीर्थाटन आणि गायत्रीजप , ही कर्मे नियमित करावी. आणि अस्पृश्यांस स्पर्श करु नये, अभक्ष्यभक्षण करु नये, अथवा गप्पागोष्टी, चकाटया पिटीत बसू नये. ॥३४॥
हे कुलदीपक उध्दवा ! सर्व भूतांचे ठायी मी परमेश्वर नांदत आहे, अशी भावना ठेवून , मन, वाणी आणि शरीर ही सर्व स्वाधीन ठेवावीत, हा नियम सर्व आश्रमास विहित आहे. ॥३५॥
असे हे कडकडीत व्रत नैष्ठिकाने मद्भक्तिपूर्वक एकाग्र मनाने चालविले म्हणजे त्याच्या तीव्र तप:प्रभावाने त्याचा कर्मवासनाजन्य व कर्मवासनाजनक सूक्ष्म देह शुध्दतम होतो. तो निर्मळ, एकनिष्ठ, वेदाध्ययनाने अग्रीसारखा तेजस्वी होतो. ॥३६॥
ब्रह्मचर्याश्रम सोडून दुसर्या आश्रमात वेदार्थज्ञानाच्या प्रेरणेने शिरु इच्छिणार्या ब्रह्मचार्याने (यालाच उपकुर्वाण म्हणतात) गुरुला दक्षिणा द्यावी आणि त्याची आज्ञा घेऊन मंगलस्नान करावे (याला समावर्तन संस्कार अथवा व्यवहारात ‘सोडमुंज’ म्हणतात) ॥३७॥
ज्ञानप्रेरणेनुसार या व्दिजश्रेष्ठ सोडमुंज्याने गृहस्थाश्रम किंवा वानप्रस्थाश्रम किंवा संन्यासाश्रम यांपैकी कोणता इष्ट असेल तो आश्रय घ्यावा. अथवा, प्रथम, गृहस्थ, नंतर वनस्थ आणि मग संन्यस्त, अशा क्रमानेही जावे. उलट क्रम वर्ज्य आहे. ॥३८॥
गृहस्थाश्रमी होऊ इच्छिणाराने , कुलीन, आपल्या वर्णाची, आपल्यापेक्षा वयाने लहान ,अशी भार्या निवडावी. (कामशांत्यर्थ दुसरी हवीच असेल तर प्रथम क्षत्रिय,मग वैश्य, व मग शूद्र असा क्रम तरी ठेवावा.) ॥३९॥
यजन, अध्ययन, दान ही कर्में करण्याचा सर्व व्दिजांना अधिकार आहे. परंतु दान घेणे (प्रतिग्रह), शिकविणे (अध्यापन), आणि याज्ञिक कर्म चालविणे (याजन), ह्या कर्मांचा अधिकार मात्र ब्राह्मणासच आहे. ॥४०॥
आता दान घेतले असता तपाचा,तेजाचा व यशाचा भंग होतो, असे ज्या ब्राह्मणास वाटते त्याने अध्यापन व याजन ही कर्मे करुन कुटुंबनिर्वाह करावा. पण ही कर्मेही दूषित वाटत असतील, तर शेतकर्यांनी सर्व पीक नेल्यानंतर शेतांत शिल्लक राहिलेले दाणे टिपावे, त्याप्रमाणे शिलवृत्तीने जगावे या टिपण्याला ‘शिल’ म्हणतात. ॥४१॥
ब्राह्मणाचा देह फार महत्त्वाचा आहे. यासाठी क्षुद्र इच्छा धरुन तत्पूर्ती प्रीत्यर्थ, त्या देहाला खर्ची घालू नये. अत्यंत कठीण तपामध्येच त्याचा विनियोग करावा; आणि परोपकार करुन समाजाला सुख झालेले पहावे व परलोकीं अनंत शुध्दसुख भोवावे. ॥४२॥
आता सांगितलेली शिलवृत्ती आणि उंछ (बाजारांत दाणे विकतात तेथे सांडलेले धान्य टिपणे हे उंछ) या दोन वृत्ती आदरुन समाधानाने उदरनिर्वाह करणारा आणि आतिथ्यादि गृहस्थधर्म पाळून शुध्द धर्मांचे अनुष्ठान करणारा गृहस्थ, माझा एकनिष्ठ भक्त असेल म्हणजे तो अनासक्त असेल त्याला उत्तम प्रकारची शांती मिळते. ॥४३॥
जे माझ्या विप्रभक्ताला दारिद्रयाच्या संकटांतून सोडविण्याचे व्रत घेतात. त्यांना समुद्रांतून नाव जशी तारुन नेते त्याप्रमाणे संकटांतून मी तारतो. ॥४४॥
राजाने सर्व प्रजाननांची संकटे नाहीशी करुन लोकांचा उत्कर्ष करावा. राजा प्रजेचा पिता म्हणून त्याने प्रजेची सर्व संकटे निवारावी व आपल्यावरील संकट आपण स्वत:च वारावे. ‘धीर’ हत्तीचा नायक जसा इतर हत्तीवर आलेल्या आपत्तींचे निवारण करुन स्वसंरक्षणहि करितो, तसेच धीर राजाने वर्तन असावे. ॥४५॥
अशा व वर्तनाचा राजा इहलोकीच्या आपत्ती नष्ट करतो. अशाच राजाला स्वर्गलोकी नेण्यास सूर्यासारखे तेजस्वी नेण्यास सूर्यासारखे तेजस्वी विमान येते व तो इंद्रासह स्वर्गलोकाचे सुख भोगतो. ॥४६॥
योगक्षेम चालविण्याची आपदा प्राप्त झाल्यास ब्राह्मणाने वणिग्वृत्ती स्वीकारुन क्रयविक्रयाचे दुकान मांडावे, किंवा शस्त्रधर होऊन उपजीविका चालवावी . परंतु श्वावृत्ती म्हणजेच लांगूलचालनवृत्ती केव्हाही पत्कारु नये. ॥४७॥
चिपत्काली राजाने अथवा क्षत्रियांनी वैश्याची वृत्ती धारण करावी, किंवा मृगयेवर पोट भरावे. प्रसंगी ब्राह्मणाप्रमाणे अध्यापनाचेही काम स्वीकारावे. पण श्वावृत्ती स्वीकारु नये. ॥४८॥
वैश्याला आपत्प्रसंग आलाच तर शूद्रवृत्ती आचरावी आणि शूद्राने संकटकाळी कारुंचा धंदा (चटया विणणे वगैरे) करावा. ही केवळ आपत्ती टाळण्याची तोड आहे. आपत्ती संपली की ज्याची त्याने आपली वृत्ती घ्यावी (योगक्षेमासाठी श्रुतिस्मृतींनी विहित केलेले स्वकर्म पुन: हाती घ्यावे) ॥४९॥
वेदाध्ययन (स्वाध्याय), पितरांसाठी स्वधाकर्म, देवांच्या तर्पणासाठी स्वाहाकर्म , भूतांसाठी बलिदान आणि मनुष्ययज्ञासाठी अन्नादींचे संतर्पण यथाशक्ती करावे. उध्दवा ! देव, ऋषी, पितर, भूते ही सर्व माझीच स्वरुपे आहेत अशी श्रध्दा ठेऊन हे पंचमहायज्ञ प्रतिदिवशी करावेत. ॥५०॥
आपल्यास दुसरीकडून मिळालेले असो , किंवा आपण स्वत: कमावलेले असो, त्या धनाचा विनियोग पंचमहायज्ञांमध्ये सावधपणे करावा. मात्र या यज्ञांनी आपल्या आश्रितांची आबाळ होईल. असे करु नये. ॥५१॥
कुटुंबातील मंडळीवर केव्हांही आसक्त नसावे. कुटुंबी असूनही माझे ध्यान, भजन हा मुख्य धर्म सोडू नये. हे दृष्ट जग जसे नश्वर, नाशवंत आहे, असेच अदृष्टही (कर्मकलापाचा परिणाम फळ असल्यामुळे) नाशवंत आहे , असा शहाण्या पुरुषाने निश्चय ठेवावा. ॥५२॥
पुत्र, कलत्र, मित्र, आप्त, बंधुबांधव यांचा समागम आणि वाटेतील वाटसरुंचा संबंध एकसारखाच . निद्रा संपली म्हणजे निद्राकालातील स्वप्न जागेपणी नाहीसे होते तसेच या देहांतील ओळखीचे दारा, पुत्र स्नेही दुसर्या लोकात नसावयाचेच. ॥५३॥
असा विचार करुन तो (जीवन्मुक्त) पाहुण्यासारखा वागतो; म्हणून ते त्याला बंधक होत नाही. सारांश तो निर्गम आणि निरहंकार असतो. ‘मी’ व ‘माझे’ हे बंध त्याने तोडून टाकलेले असतात. ॥५४॥
असो; याप्रमाणे गृहमेध, अग्रिहोत्र इत्यादी कर्मांनी जो माझा भक्त माझेच यजन करतो. त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारावा अथवा चवथा संन्यासश्रम स्वीकारावा. किंवा ॥५५॥
परंतु जो मानव , देह , गेह, पुत्र धन असावे अशी आशा धरुन तदर्थच कर्म करतो; त्यांत आसक्त राहून , स्त्रैण आणि मंदमति बनतो, तो बिचारा ‘मी व माझे’ या दृढ रज्जूंनी संसाराच्या जन्ममरणात्मक चक्राला बांधला जातो. ॥५६॥
‘माझी वृध्दमापापितरे, माझ्या बाळांची तरुण आई, माझी लहान बालके, माझ्या व्यतिरिक्त अनाथ होतील, दीन होतील, माझ्या मागे त्यांचे आयुष्य कसे जाईल, जगलीच तर खातील काय? देवा ! मला जगलेच पाहिजे’ ॥५७॥
अशी रीतीने घरच्या विवंचनेने त्याचे हृदय दु:खी होते. याप्रमाणे ‘मी व माझे’ हे त्याचे ध्यान असल्यामुळे तो नेहमी असंतुष्टच राहतो आणि मेला म्हणजे घोर नरक लोकांत जाऊन पडतो ! ॥५८॥
अध्याय अकरावा समाप्त.