श्री अवधूत म्हणाले, राजा ! मनुष्यास जे जे म्हणून अत्यंत प्रियकर असते, त्याचा परिग्रह करणे दु:खदायक होते. हे जाणून जो अकिंचन म्हणजे दरिद्री राहतो, त्याला उत्कृष्ट प्रकारचे सुख सदोदित मिळते. ॥१॥
एका टिटव्याजवळ काही खाद्य होते, तोपर्यंत इतर निरामय बलवान् टिटव्यांनी त्याला मार मारुन पुष्कळ त्रास दिला . पुढे त्या टिटव्याने आपल्या जवळचे आमिष टाकून दिले, तेव्हा त्याला निर्वेध सुख मिळाले. (परिग्रह ठेवू नये, ही टिटव्याची शिकवण होय.) ॥२॥
लहान बालकाला मानापमानाची क्षिती नसत, घराची किंवा बायकापोरांची काळजी नसत. ते आपल्याशीच रमते व खेळते. बालकाप्रमाणे आता मला मानापमानाची क्षिति किंवा संसाराची काळजी नाही. मी आत्मसंतुष्ट, आत्मविहारी आहे. राजा ! मुग्ध बालक व गुणातीत योगी या दोघांस चिंताशून्य परमानंदसागरांत पोहता येते. ॥३-४॥
(अवधूत म्हणाले, राजा, आता एकाकी राहण्याचा गुण मी एका कुमारिकेपासून कसा घेतला, ते ऐक.) वडिल माणसे बाहेर गांवी गेली आहेत अशा वेळी वधूनिश्चय करण्याच्या हेतूने एका कुमारीचे घरी काही पाहुणे आहे. त्यांच्या जेवणाची तजवीज त्या कुमारिकेलाच करावी लागली.साळी कांडून तांदूळ करण्यासाठी ती उखळावर गेली व कांडूं लागली. तेव्हा तिच्या हातातं शंखाची कांकणवजा वलये होती ती वाजू लागली. आवाज बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून तिने, एक , दुसरे, तिसरे अशी एकामागूनेक कांकणे हातांतून काढली व दोनच कांकणे हातात ठेऊन कांडूं लागली. ॥५-७॥
तिने जरी याप्रमाणे केले, तरी आवाज बंद होईना. तेव्हा तिने फक्त एककच कांकण हातात ठेवले तेव्हा मात्र आवाज बंद झाला. मी विश्वरहस्य जाणण्याचे इच्छेने हिंडत असता माझ्या दृष्टीला हे कुमारीचें वर्तन पडले व मी शिकलो की, पुष्कळ लोक एकत्र जमले म्हणजे भांडण होते; दोनच असले तर गप्पागोष्टी चालतातच . तेव्हा एकाकी असणे हे त्या मुलीच्या हातातील कांकणांनी मला शिकविले. ॥८-१०॥
साधनेच्छु पुरुषाने आपले आसन स्थिर करुन (पूरकादि प्राणायामाच्या साहाय्याने) प्राणवायु स्वाधीन करुन मन एकाग्र करावे आणि निरलसपणे योगाभ्यासाच्या साहाय्याने आपले मन लक्ष्यावर म्हणजे परम्पदावर ठेवावे. ॥११॥
नंतर त्या परमपदावर एकाग्र झालेले हे मन हळू हळू कर्मरेणूंचा म्हणजे वसनाधुळीचा त्याग करण्यास समर्थ होते. आणि असे झाले म्हणजे सत्त्वगुणाची वृध्दी होऊन रज व तम या गुणांचा लय होतो. आणि असे झाले म्हणजे सत्त्वगुणाची वृध्दी होऊन रज व तम या गुणांचाअ लय होतो . आणि असे झाले म्हणजे ते मन विषयशून्य होऊन निर्वाणाच्या अवस्थेला प्राप्त होतो. ॥१२॥
बाण तयार करण्यात निमग्र झालेल्या एका बाणकाराणे जवळून (वाजत गाजत जाणारी) राजाची स्वारी पाहिली नाही. अर्थात् एकाग्रतेमुळे त्याचे लक्ष त्या राजाच्या स्वारीकडे गेले नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरुपात ज्याचे मन गुंतले आहे त्या योगी पुरुषाने आंतील बाहेरील हे यत्किंचितही मनात येऊ देऊ नये हे मी त्या बाणकारापासून शिकलो. ॥१३॥
राजा ! साप एकटा असतो. त्याला स्वत:च घर नसते. तो नेहमी गुप्त ठिकाणी असतो. मुंग्यांनी केलेल्या वारुळांत स्वस्थ असतो. घर बांधून रहाणे हे चंचल मनाच्या माणसाला पराकाष्ठेचे दु:ख देते. तसेच त्यापासून त्याचा काही फायदाही होत नाही. हा देह क्षणभंगुर म्हणून गृहदिक करुच नये. ही गोष्ट सापाने मला शिकविली. ॥१४-१५॥
आपल्या नार्भीतून लोकरीचे तंतु तोंडाने बाहेर काढून त्यांचे स्वत:च गिळून टाकतो. हे कोळ्याचे कृत्य पाहून मी अनुमान काढले की, एकच एक परमेश्वर असला पाहिजे त्या ऊर्णनाभीप्रमाणेच तो परमेश्वर आपल्या स्वत:च्याच संकल्पाने स्वत:मधूनच त्रिगुणात्मक माया निर्माण करतो, तिचे सत्त्वादी गुणांचा क्षोभ करुन स्वत:च्याच कालसामर्थ्याने तो ईश्वर तद् व्दारा आपण सूत्रात्मा म्हणजे क्रियाशक्तिमान् महत्त्व निर्माण करतो म्हणजे होतो आणि महत्त्वाच्या गुणव्यापारांनी हे ब्रह्मांड निर्माण होते आणि या ब्रह्मांडांत पूर्वसंचितानुसार जीव संसारांत म्हणजे जन्ममरणाच्या चक्रांत सांपडून सुखदु:ख अनुभवितात,.पुढे नियमित काल लोटल्यावर त्या परमेश्वराला कोळ्यानेच सर्व संहार करण्याची इच्छा होते. तेव्हा तो स्वत:च्या कालसामर्थ्याने आपणच उत्पन्न केलेल्या ब्रह्मांडाचा संहार करतो. (म्हणजे आपल्या स्वरुपांत सर्व ब्रह्मांड मायेसह घेतो. यालाच प्रलयकाल म्हणतात. संहारकाली व प्रलय झाल्यानंतर त्रिगुणात्मक माया संक्षुब्ध झाल्या कारणाने तिचे विषम स्थितीत असणारे जे गुण ते प्रलयकाळी शांत होतात, समता पावतात आणि ईश्वसंकल्पासह माया नाहीशी होते. ऊर्णनाभीने आपले जाळे गिळल्यावर तो एकटाच राह्तो, तसा परमेश्वर श्रीनारायण एकटा, सच्चिदानंदस्वरुप असतो. तो एकच एक अव्दितीय असून विश्वकाली सर्व जीवांचा आश्रय व आधार असतो. व्यवहारकाली दिसणार्या जडांचा (प्रकृतीचा, सांख्योक्त प्रधानाचा ) व पुरुषांचा म्हणजे जीवांचा नियंता व सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम हाच नारायण होय. एकटाच ईश्वर जगत् कसे निर्माण करतो व कसा संहार करतो, याला उर्ण कोळ्याचे उत्तम उदाहरण आहे. ॥१६-२१॥
भिंगुरटीने धरलेला व स्वत:च्या घरटयांत नेलेला कीटक भयाने त्या भिंगुरटयाचे अखंड ध्यान करतो आणि शेवटी आपला देह न सोडताही भिंगुरटयाचे स्वरुप ध्यानामुळे प्राप्त करुन घेतो. ( या कीटकाने मला शिकविले की, ) अखंड ध्यान केले असता - मग ते स्नेहाने , व्देषाने किंवा भयाने, कोणत्याही मनोवृत्तीने करा- ज्याचे आपण ध्यान करतो त्याचे रुप याच लोकी व याच देही आपल्यास प्राप्त होते. (ध्यानाचे हे सामर्थ्य मला समजले) ॥२२-२३॥
राजा ! याप्रमाणे माझ्या चोवीस गुरुंपासून अनेक प्रकारचे शिक्षण मी घेतले. आता, माझ्या स्वत:च्याच देहादिकांकडून मी काय शिकलो ते ऐक. ॥२४॥
या देहानेच मला विवेक (सत् कोणते, असत् कोणते यांची निवड) व वैराग्य (विषयांविषयी तिटकारा ) शिकविले. पहा की , या देहाला जन्म आहे, मरण आहे, ही दोन्ही दु:खदायक आणि देह आहे तोपर्यंत ही सर्वदा दु:खाचीच माळ जीवाच्या गळ्यांत असते. (हे पाहून वैराग्य उत्पन्न होते व शेवटी हा देह अग्नीचे, मातीचे किंवा काकशृगालप्रभृति वनपशूंचे भक्ष्य होणार म्हणून तो देह माझा नव्हे , दुसर्यावा आहे, हे पाहून ते पूर्वीचे वैराग्य दृढतर होते. तसेच देह माझा नव्हे , दुसर्याचा आहे, हे पाहून ते पूर्वीचे वैराग्य दृढतर होते. तसेच देह माझा नव्हे हा विवेक आणि या विश्वांत जी जी भूते म्हणजे पृथ्वीप्रमुख तत्त्वे आहेत तीही देहाप्रमाणेच अनित्य, असत् आहेत असा यथार्थ विवेक होतो. ) तसेच, भार्या, पुत्र, धन, पशू, दास, गृह , आप्त, इष्टमित्र वगैर परिवार स्वत:च्याच सुखासाठी मोठे कष्ट सोसून वाढवून पालनपोषण केला असताही अंतकाली त्यांचा वियोग अति दु:खद होतो. शिवाय त्याच्या कल्याणासाठी धनसंचय केला त्याचाही विरह होतो, हे परमावधीचे दु:ख होय. राजा ! ज्या देहाला दु:ख सोसून मी न्हाणिले, खाऊ पिऊ घातले, प्रेमाने नटविले, तो देह तरी काय करतो? तर वृक्ष जसा दुसर्या वृक्षाचे बीज उत्पन्न करुन नष्ट होतो, त्याप्रमाणेच हा देहही दुसर्या आणि दु:खद जन्मांची पेरणी करुन निघून जातो ! कोण दु:खदायी कृतघ्नता ही या देहाची ? आपली जिह्वा म्हणजे भूक, आपली तहान, आपले शिश्न, आपली त्वचा, उदर, श्रवण (कान), नाक, दृष्टि, प्राण ही सर्व आपाआपल्या परीने जीवांना सतावून सोडतातच. (प्रत्येक इंद्रियाचा हट्ट निराळा ! ) यामुळे गृहपति ( देहपति) जो जीव हा देव व हे विषयोपभोग नकोत असे वैराग्य माझा देहच मला शिकवितो. ॥२५-२७॥
परमेश्वराने आपले अगाध सामर्थ्य उपयोगात आणून वृक्ष , सर्प, पशु, पक्षी, दंश (डांस) जलचरादी तेव्हा शेवटी त्याने एक अपूर्व असा देह उत्पन्न केला . तो देह म्हणजे मानव हा होय या मानव देहात रहाणार्या जीवाला देहसामर्थ्यानेच सर्वचिकित्सक बुध्दी उत्पन्न होते व तद्व्दारा ब्रह्माचे अपरोक्ष दर्शन घेण्याची अमोघशक्ती या मानवशरीरस्थ जीवाला मिळते. अशा महिम्याचा देह उत्पन्न केला, तेव्हा देवाला अमाप आनंद झाला. ॥२८॥
अनेक जन्म घेतल्यानंतर (पूर्वसुकृतानें ) प्राप्त होणारा हा देह दुर्लभ व विनाशी असताही अत्युत्तम पुरुषार्थ साधून देणारा आहे. करिता हा प्राप्त झाला असता विवेकी बुध्दिमंताने लवकर म्हणजे मृत्यू येण्याच्या आधी असा प्रयत्न करावा की, ज्या योगे नि:श्रेयस अथवा अत्यंत सुखाची प्राप्ती करुन देणारा मोक्ष मिळेल. ॥२९॥
अशा प्रकारे माझ्यात वैराग्याची उत्पत्ति होऊन माझ्या बुध्दीत ब्रह्मज्ञानाचा प्रकाश पडला आहे. मी सर्वसंग परित्याग करुन अभिमानशून्य होऊन समधानवृत्तीने पृथ्वीसंचार करीत आहे. ॥३०॥
राजा ! एकाच गुरुपासून सुस्थिर आणि पुष्कळ ज्ञान मिळाणे शक्य नाही. ब्रह्म एकच एक आणि अव्दितीय आहे, पण तत्स्वरुप सांगणारे अनेक ऋषींचे अनेक संप्रदाय आहेतच. असो; तुझ्या प्रश्नांची उत्तरे यथामति दिली. ॥३१॥
नंतर, श्रीअवधूताचा उपदेश ऐकून आमच्या पूर्वजांचा पूर्वज जो यदुराजा त्याने सर्वसंगाचा परित्याग केला आणि भेदाभेदबुध्दी टाकून देऊन तो समबुध्दी झाला. ॥३३॥
अध्याय चवथा समाप्त.