उध्दवगीतेची वैशिष्टये
उध्दव गीता
‘पुराणी श्रेष्ठ भागवत। त्याही माजी उध्दवगीत।’
अशी ज्याची महती एकनाथांना सांगितली गेली ती उध्दवगीता हे या विविधागीताच्या दुसर्या खंडाचे वैशिष्टयच मानावे लागेल. पुराणांमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या भागवतपुराणाच्या एकादशस्कंधातील सहाव्या अध्यायाच्या एकोणचाळीसाव्या श्लोकापासून उध्दवगीतेस प्रारंभ होतो. म्हणजे सहावा अध्याय हा उध्दवगीतेसाठी पहिला अध्याय होय. तसेच मूळ भागवतातील एकादशस्कंधाच्या आठव्या अध्यायात पिंगलागीता, तेराव्या अध्यायात हंसगीता, तेविसाव्या अध्यायात भिक्षुगीता तर सव्वीसाव्यात ऐलगीता आल्या आहेत. त्यामुळे ते ते अध्याय गाळले आहेत. सर्व गीता अकरादिवर्णक्रमाने पुढील खंडातून येणार आहेत. स्वजनमोहाने विचारविमूढ बनलेल्या अर्जुनाला कर्तव्यप्रवण करण्यासाठी भगवंतांनी रणांगणावर भगवद्गीता सांगितली. तर भगवंताच्या वियोगकल्पनेने शोकमग्न बनलेल्या उध्दवाला कार्य करण्यास प्रवृत्त करण्यासाठी कृष्णभगवंतांनी उध्दवगीता सांगितली. अशा प्रकारे या दोन्ही गीतांना भगवंतांचा आधार असल्याने महत्त्व प्राप्त होते. मात्र दोन गीतांमधील परिस्थिती व श्रोते भिन्न असल्याने दोहोत काही तत्त्वे समान असली तरी विषयभिन्नताही मोठया प्रमाणावर आढळते.
उध्दवगीतेत भगवद्गीतेप्रमाणे केवळ तत्त्वज्ञान सांगितलेले नाही तर त्यात मंदिरे, मूर्तिपूजा, पूजेचा विधी , चातुर्वर्ण्य, त्यांची कर्तव्ये, आश्रम, दैनंदिन कर्मे अशा अनेकविध विषयांचा अंतर्भाव केलेला आढळतो.
‘नाहं तवाड् घ्रिकमलं क्षणार्धमपि केशव।
त्यक्तुं समुत्सहे नाथ स्वधाय नय मामपि॥’
असे विनवणार्या उध्दवाला ‘ तू बदरिकाश्रमात जाऊन तप करणे योग्य आहे. माझी भक्ती करणे हे तुझे कर्तव्यकर्म आहे याव्दारेच तुला मुक्ती मिळू शकेल’ हे पुढील अध्यायांमधून वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांनी उध्दवाला पटविले आहे.
नि:संग राहूनही आयुष्यामध्ये मनुष्य ज्ञान प्राप्त करुन घेऊ मोक्ष मिळवू शकतो हे सांगत असताना भगवंतांनी प्रथमत: अवधूतांच्या २४ गुरुंची कथा थोडक्यात सांगून नि:संगाची महती पटविली आहे. पुढे साधू कसा असतो या उध्दवाच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून सहाव्या अध्यायात साधुत्वाने विस्ताराने वर्णन आले आहे. तर अकराव्या अध्यायात विभूती सांगितल्या आहेत. या विभूती पहात असता भगवद्गीतेचेच अनुकरण येथे केल्यासारखे वाटते.- ‘अक्षराणामकारोऽस्मि’ ‘काल: कालयतामहम्’ ‘मासानां मार्गशीर्षोऽहम्’, ‘आदित्यानामहं विष्णु:’, ‘ऐरावंत गजेन्द्राणाम्’ ‘सर्पाणामस्मि वासुकि:’ यासम कितीतरी विभूती दोहोतही समान आहेत तर काही ठिकाणी थोडे शब्द बदलले आहेत. मनुष्याने देवाला शरण जाऊन आत्मोन्नतिपूर्वक लोकोध्दार करीत आयुष्य सार्थकी लावावे असा विचार सांगत असतानाच येथे भगवंत चातुर्वर्ण्य, त्यांची कर्तव्ये, आपत्तिकालीन कर्तव्ये यांचेही सविस्तर विवेचन करतात. गीतेप्रमाणेच सत्त्वरजादी त्रिगुणांचा विचारही येथे थोडया वेगळ्याप्रकारे येतो त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे सत्त्वगुणात धर्मप्रवृत्ती, भगवद्भक्ती व वासनात्याग ही चिन्हे दिसतात. सत्त्वगुणाची वाढ झाली असता दिसणार्या फलांचे व गुणांचे पृथक्करण भगवंतांनी उध्दवगीतेत केले आहे. पुढे भक्ती हेच परमश्रेय असे सांगून ध्यानयोगाचे महत्त्व भगवंत विशद करतात.
‘विषयान् ध्यायतश्चित्तं विषयेषु विषज्जते।
मामनुस्मरतश्चित्तं मय्येव प्रविलीयते।’
अशी ग्वाही देऊन पुढे भगवंत भक्ती, ज्ञान, कर्म हे योग व या योगांच्या अधिकार्यांचे वर्णन करतात. या वर्णनात व भगवद्गीतेच्या कर्मयोगी, ज्ञानयोगी व उत्तम भक्त यांच्या वर्णनात शाब्दिक तसेच आशयाचेही साम्य आढळते. त्यातील गुणदोषव्यवस्थाही सांगतात. हे वर्णन करीत असतानाच ओघाने सृष्टीच्या मूलतत्त्वांविषयी
‘कति तत्त्वानि विश्वेश संख्यातान्यृषिभि: प्रभो।’
असा प्रश्न विचारणार्या उध्दवाचा संशय भगवंतांनी दूर केला आहे. मूलतत्वांच्या संख्येविषयीची २८ पासून ४ मूलतत्त्वांपर्यंत मानणार्या मतांचा उल्लेख उध्दवाने केला असता -
युक्तय: सन्ति सर्वत्र भाषन्ते, ब्राह्मणो यथा।
अशा प्रकारे श्रीकृष्ण युक्तिवाद करतात. येथेच प्रकृती-पुरुष, जन्ममृत्यू या काहीशा क्लिष्ट विषयांचे भगवंतांनी सोप्या शब्दात स्पष्टीकरण केले आहे. सांख्यांचे तत्त्वज्ञान, भक्तांनी संयम कसा करावा, भक्तीतील पूजाविधी अशा विविध विषयांची चर्चा उध्दवगीतेत आहे. यामुळे भक्ताला या गीतेच्या अध्ययनाचा पुष्कळ फायदा होऊ शकतो.
भागवतपुराणा हे अध्यात्मप्रधान व त्यातही भक्तीचा पुरस्कार करणारे म्हणून प्रसिध्द आहे. भागवतातील भक्तीचे तत्त्वज्ञान त्याच्या एकादशस्कंधात सर्वांशाने वर्णिले आहे. एकादशस्कंधाचा बराचसा भाग उध्दवगीताच आहे. म्हणूनच उध्दवगीतेचे महत्त्व भागवतधर्मात अनन्यसाधारण आहे.
N/A
References : N/A
Last Updated : March 14, 2018
TOP