उध्दवगीता - अध्याय नववा

उध्दवगीता

श्री भगवान्‍ म्हणतात, इंद्रिये , मन व प्राण या सर्वांस ज्याने योगबळाने आकलन करुन घेतले आहे आणि ज्याने माझ्यावर चित्त स्थिर केले आहे अशा योग्याकडे अनेक सिध्दी धावत येतात.॥१॥
उध्दव म्हणतो, अच्युता ! योग्यांस सिध्दी प्राप्त करुन देणारा तूच आहेस. म्हणून कोणत्या धारणेने कोणती सिध्दी प्राप्त होते, सिध्दी कशी असते, आणि सिध्दीच्या संख्या किती आहे, हे सर्व मला सांग. ॥२॥
श्री भगवान्‍ म्हण्दतात, योगात निपुण असलेले पंडित म्हणतात की सिध्दी अठरा असून त्यांच्या धारणाही अठरा आहेत या सर्व सिध्दी माझ्या आश्रयाने चालणार्‍या आहेत. यापैकी ८ प्रधान व १० गौण आहेत. ॥३॥
त्यांत अणिमा, महिमा, लघिमा या तीन सिध्दी  देहसंबंधी होत. विशिष्ट इंद्रियांची तव्दिषयांसह प्राप्ती, अदृष्टांचे दर्शन, निसर्गशक्तीचे प्रेरकत्व प्रभुत्व, वशिता आणि कामपूर्तता; अशा या ८ प्रधान सिध्दी त्या माझ्या सिध्द होत. या माझ्या म्हणून निसर्गसिध्द आणि सर्वश्रेष्ठ आहेत. ॥४-५॥
आणि देहांत ऊर्मिशून्यत्व (क्षुधातृषादिकांची अबाधकता आणणे, दूरचे पाहणे, दूरचे ऐकणे, मनासारखी शीघ्रगती, वाटेल ते रुप घेणे, परकायाप्रवेश, स्वच्छंदमरण, स्वर्गांगनाप्राप्ती, संकल्पसिध्दी आणि निरंकुश आज्ञा, त्रिकालज्ञन, शीतोष्णादी व्दंव्दांवर सत्ता, दुसर्‍याचे  मन जाणणे, अग्रि -सूर्य- उष्ण- जल- विष इत्यादिकांचे स्तंभन (त्यांचे परिणाम थांबविणे), आणि अजिंक्यता या योगधारणांनी प्राप्त होणार्‍या अनंत सिध्दीपैकी काही सिध्दी केवळ उदाहरणादाखल होत. आता ज्या धारणेने सिध्दी प्राप्त होतात तिचे विवेचन ऐक. ॥६-९॥
पंचमहाभूतांची अतिसूक्ष्म रुपे म्हणजे तन्मात्रा ती माझीच रुप होत. माझ्या या तन्मात्र रुपाचे ध्यान करणार्‍याला ‘ अणिमा’ सिध्दी प्राप्त होते. ॥१०॥
विश्वरुपाचा जो मी आत्मा आहे. त्या माझ्या म्हणजे महदात्म्याच्या ठिकाणी मन ठेवून जो एकाग्र ध्यान करतो त्यास पंचमहाभूतांतील महत्स्वरुपी ‘महिमाअ’ सिध्दी मिळते. ॥११॥
भूतांचा परमाणू मी आहे. माझ्या ठिकाणी मनाची धारणा केली म्हणजे काल सूक्ष्मत्वाचे स्वरुप अशी ‘लघिमा’ सिध्दी मिळते. ॥१२॥
विकारातूण उत्पन्न झालेल्या माझ्या अहंतत्वाच्या ठिकाणी जो पूर्ण मन ठेवून ध्यान करतो तो योगी सर्व इंद्रियांचा आत्मा, नियंता होतो. ही ‘प्राप्ति’ नामक सिध्दी होय. ॥१३॥
जो योगी आपले मन क्रियाशक्तिप्रधान जे ‘महत्‍’ तत्त्व अथवा अव्यक्त ‘ सूत्रात्मा’ तो मीच आहे असे जाणून, त्या सूत्रात्म्याची धारणा करतो, त्याला सर्वोत्तम ‘ प्राकाश्य’ सिध्दी (भोग्य विषयांचे ज्ञान) मिळते. ॥१४॥
कालस्वरुपी जो त्रैलोक्याधीश विष्णू त्याच्या ठिकाणी मनोधारण केली म्हणजे ‘ प्रभुता ’ सिध्दी मिळते; या सिध्दीने जीव आणि जड यावर योग्याची सत्ता प्रतिष्ठापित होते. ॥१५॥
‘भगवान्‍’ हे ज्याचे नांव, त्या नारायणाचे ‘तुरीय’ नावाचे जे स्वरुप , तेथे म्हणजे या माझ्या तुरीय स्वरुपाचे ठिकाणी मनाची धारणा केली म्हणजे तो योगी मध्दर्मामद्रूप होतो आणि तो ‘वशिता’ नामक सिध्दी प्राप्त करुन घेतो (वशी = सर्वांस ताब्यात ठेऊन आपण स्वतंत्र असणारा) ॥१६॥
माझ्या निर्गुण ब्रह्म स्वरुपाचे ठिकाणी स्फटिकासारखे शुध्द झालेले आपले मन जो योगी ठेवतो, त्याला परम आनंदाची प्राप्ती होते. त्याच्या सर्व  कामना नष्ट होतात. (या सिध्दीला ‘कमपूर्ति’ ‘पर्याप्त कामता’ म्हणतात) या महासिध्दी होत. ॥१७॥
(आता गौण सिध्दी सांगतो त्या ऐक.) श्वेतव्दीपाचा स्वामी जो शुध्द व धर्मस्वरुप मी, त्या माझे ठिकाणी जो मन ठेवील, त्या स्वरुपाचे ध्यान करील, तो क्षुधातृषाप्रभृती ऊर्मींच्या पलीकडे जातो; शुध्द सत्त्वाचा होतो. या सिध्दीला ‘श्वेतता’ किंवा ऊर्मिशून्यता म्हणावे. ॥१८॥
मी आकाशात्मा प्राणरुप आहे. (हा समष्टि प्राण होय) माझ्या ठिकाणी जो नाद आहे त्याचे चिंतन करणार्‍या हंसाला म्हणजे जीवाला, आकाशांत असणार्‍या भूतांचे आवाज ऐकण्याचे सामर्थ्य येते. ही ‘दूरश्रवण’ नामक सिध्दी होय. ॥१९॥
सूर्याचे ठिकाणी नेत्र आणि नेत्रात सूर्य, असा संयोग करुन तेथे माझे ध्यान मनाने करणारा योगी सर्वद्रष्टा होतो. ही ‘सूक्ष्मदृक्‍’ सिध्दी .॥२०॥
मन आणि देह व त्यांचा अनुचर प्राणवायू ही माझ्यात युक्त करुन जे माझी धारणा करतात त्यांस त्या धारणेच्या सामर्थ्याने जेथे मन जाते तेथे स्वदेहालाही वायुगतीने नेता येते. ही शीघ्रगति’ नामक सिध्दी होय.॥२१॥
माझ्या ठिकाणी राहून योग करण्याचा ज्याने अभ्यास दृढ केला, त्या योग्याच्या मनाला माझ्या संयोगाच्या बळावर आश्रयाने इष्ट वाटेल ते ते मनास आवडणारे रुप घेता येते . येथे मन हेच उपादान आहे. ‘रुपसिध्दी’हीच होय.॥२२॥
इतरांच्या शरीरात शिरण्याची इच्छा करणारा जो सिध्द योगी, त्याने त्या दुसर्‍या शरीरांत प्रविष्ट झालो आहो अशी भावना दृढ केली म्हणजे आपले शरीर सोडून तो आपला वायुभूत प्राण त्या इतर शरीरात प्रविष्ट करतो. जसा भ्रमर या पुष्पाला सोडून दुसर्‍या पुष्पांत शिरतो तसा. या सिध्दीला ‘परकायाप्रवेश’ म्हणतात. ॥२३॥
‘इच्छामरण’ सिध्दी अशी - टांचेने मलव्दार दाबून बंद करावे म्हणजे अपान वायू उर्ध्वगती होतो. तेथे त्याची व प्राणाची गांठ पडून ते एकस्वरुप होतात. मग त्या प्राणवायूस हृदय, वक्ष, कंठ, शिर, यांमधून ऊर्ध्वगतीने ब्रह्मरंध्रापर्यंत न्यावे. त्यानंतर शरीराचा त्याग करावा. याला ‘इच्छामरण’ सिध्दी म्हणतात. ॥२४॥
देवांच्या क्रीडेसारखी क्रीडा करता यावी, अशी इच्छा असेल त्याने मन्मूर्तिरुप जे शुध्द सत्त्व त्याचे चिंतन योगपूर्वक करावे. म्हणजे सत्त्ववृत्ती असणार्‍या देवांगणा विमाने घेऊन येतात व त्या योग्याची सेवा करतात. ही ‘संकल्पप्राप्ति’नामक सिध्दी. ॥२५॥
केव्हाही मद्भक्ताने सत्यस्वरुप अशा माझ्या ठिकाणी मन युक्त केले तर त्याने बुध्दिपूर्वक जे संकल्प जसे केले असतील ते ते संकल्प त्याच स्वरुपाने त्याला मिळतात. ॥२६॥
मी सर्वनियंता व सर्वस्वतंत्र आहे, माझ्या भक्तियोगाने नियंतृ-स्वतंत्रस्वरुप ज्याला प्राप्त झाले आहे त्या पुरुषाचा कोणीही आज्ञाभंग करु शकत नाही. कारण त्याची आज्ञा ती मीच केलेली आज्ञा असते. ॥२७॥
(आता क्षुद्रसिध्दी कोणत्या त्या सांगतो) माझ्या भक्तीच्या सामर्थ्याने शुध्दसात्त्विक गुणी झालेला धारणाचतुर जो योगी, त्याला त्रिकालज्ञान होते. आपले जन्ममरणादिकांचे व जगतोत्पत्यादिकांचे ज्ञान त्याला होते. ॥२८॥
पाणी जलचरांना इजा करु शकत नाही, त्याप्रमाणेच अत्यंत श्रम करुन ज्याने माझ्याशी योग साधला त्या मुनीच्या योगस्वरुपाला अग्रिप्रभृति भूते कसलाही अपकार करु शकत नाहीत. ॥२९॥
उध्दवा ! श्रीवत्स , तसेच शंख , गद, चक्र, प्रभृति शस्त्रास्त्रे यांनी युक्त त्याचप्रमाणे गरुडांकित ध्वज, छ्त्र, चामर इत्यादि चिन्हांनी सुभूषित असा मी आहे. माझे अखंड ध्यान करणारा सदैव अजिंक्यच होतो. ॥३०॥
या अशा योगधारणेने माझी एकनिष्ठ उपासना करणार्‍या मुनीच्या आश्रयाला या मागे सांगितलेल्या सर्व ऋध्दि-सिध्दी प्राप्त होतात. ॥३१॥
जो जितेंद्रिय आहे, दमनशील आहे, प्राणायामांत परमश्रेष्ठत्व पावला आहे आणि जो मनाने मत्स्वरुपाची धारणा नित्य करतो, त्याला दुर्लभ अशी सिध्दीच नाही. ॥३२॥
परंतु आत्मयोग नावाच्या उत्तमोत्तम योगांत ज्याचे मन अभिरत झाले आहे, त्याच्या मार्गांत ह्या सिध्दी म्हणजे मोठमोठया अडचणीच होत. मत्स्वरुप- प्राप्ती होण्याला या सिध्दी आड येतात आणि मोक्षकाल लांबणीवर टाकतात. ॥३३॥
कोणाला पूर्वसंस्कारामुळे जन्मत:, कोणला औषधांनी, तपाने , मंत्रांनी सर्व सिध्दी प्राप्त होतात. योगानेही या मिळतात. परंतु माझी धारणा अखंड करणे हा जो योग आहे, त्याशिवाय इतर कोणत्याही योगाने मत्स्वरुपाची प्राप्ती होणार नाही. ॥३४॥
उध्दवा ! मी सर्व सिध्दींचा प्रवर्तक, पालक व पोषक आहे, मी त्यांचा स्वामी आहे. योग , सांख्य, धर्म, ब्रह्मज्ञान यांचा हेतु, यांचा पती, यांचा प्रभू मी आहे. ॥३५॥
सर्व जगताच्या व जगतांतील पदार्थांच्या आंत व बाहेर पंचमहाभूते असतात, तसा मी स्वत: सर्व देहधारी जीवांचा (जडाचाही आहेच) नियंता त्यांच्या आत व बाहेर राहून त्याचे नियमन करणारा मी, आत, बाहेर, सर्वत्र असतो. ॥३६॥
अध्याय नववा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP