उध्दवगीता - अध्याय सतरावा

उध्दवगीता

श्री भगवान‍ म्हणाले, उध्दवा ! पूर्वऋषींनी निश्चित केलेले जे सांख्यशास्त्र ते तुला सांगतो.  ते सांख्य समग्र समजून उमजले म्हणजे व्दैत किंवा विकल्प उत्पन्न करणारी जीवभ्रांती नष्टच होते. ॥१॥
ज्याकाळी युगास आरंभ विकल्प झाला नव्हता, त्या काळी ज्ञानाचे व ज्ञेयाचे (ज्ञात होणार्‍या पदार्थांचे) स्वरुप एक आणि विकल्पशून्य असे. युगांतील पहिले जे कृतयुग त्यातील लोक विवेकनिपुण असतात, म्हणून त्यावेळी विकल्प म्हणजे ‘आपपर भेद’ नव्हता. ॥२॥
ते ब्रह्म निरुपाधिक, भेदशून्य , सद्रूप व सर्वगामी असताही मायेने त्याला दोन प्रकारांनी दृश्य स्वरुपात आणले; आणि मनाला व वाणीला वर्णिता येतील असे केले. ॥३॥
त्यातील पहिला प्रकार म्हणजे प्रकृती होय . हिला दोन स्वरुपे असतात. मायेने केलेला दुसरा प्रकार म्हणजे ज्ञान . या ज्ञानाला ‘पुरुष’ ही संज्ञा आहे. ॥४॥
पुरुषांचे (जीवाचे) अनुमत घेऊन मी प्रक्षुब्ध केलेल्या प्रकृतीपासून सत्वादि तीन गुण उत्पन्न झाले. ॥५॥
त्या गुणांपासून सूत्र होऊन त्याचा व महत्तत्त्वाचा संयोग झाला. नंतर त्याच्या विकारांपासून मोहक अहंकार झाला. ॥६॥
हा वैकारिक अहंकार सात्त्विक, राजस व तामस असा तीन प्रकारचा होतो. तो स्वरुपत: चित्‍ व अचित्‍ यांच्या मिश्रणाचे कार्य असून, तो शब्दस्पर्शादी पंच तन्मात्रा, ज्ञानकर्मांची इंद्रिये आणि मन यांचा जनक आहे. ॥७॥
तमोगुणघटित तन्मात्रांपासून पृथ्वी-आकाश-वायुप्रभृती पंचमहाभूते, तैजसापासून कर्ण, स्पर्श, नेत्रप्रभृती पांच ज्ञानाचीं व हस्तपादादि पांच कर्मांची इंद्रियें, वैकारिकापासून दाही इंद्रियांच्या देवता व मनोदेवता झाल्या. ॥८॥
मी (परमेश्वराने) प्रेरणा केली म्हणून महत्‍ आदि सर्व भाव एकत्रित झाले. या सर्वांच्या क्रियेने एक अंडे म्हणजे ब्रह्मांड उत्पन्न झाले. हे ब्रह्मांड माझे उत्तम निवासस्थान आहे. ॥९॥
त्या जलांतच वास्तव्य करणार्‍या ब्रह्मांडांत माझे सगुण स्वरुप मी प्रकट केले; त्या माझ्या सगुण शरीराच्या नाभीमधून ‘विश्व’ या नांवाचे कमल व त्या कमलात स्वयंभू ब्रह्मदेव यांची उत्पत्ती झाली. ॥१०॥
ब्रह्मदेव रजोगुणी आहे. त्याने तप केले, तेव्हा माझ्या प्रसादामुळे विश्वाचा आत्मा असणार्‍या त्या ब्रह्मदेवाने  स्वर्लोक,  भुवर्लोक आणि भूलोक अशी तीन भुवने उत्पन्न केली. ॥११॥
स्वर्गलोकांत देव राहतात. भुवर्लोकात भूते राहतात व भूलोक मानवादी मर्त्य जीवांनी व्यापला आहे. या तीन लोकांच्याही पलीकडे असणार्‍या अति भुवनात सिध्द राहतात. ॥१२॥
भूलोकाच्या अधोभागी जी सप्त पाताळे आहेत त्यात असुर व नागलोकप्रभृती राहतात. याप्रमाणे हे लोक व त्यांची स्थाने, प्रभू ब्रह्मदेवाने निर्माण केली. सत्त्वादी तीन गुणांपासून होणार्‍या सर्व गती म्हणजे फळे भूप्रभृति तीन लोकातच मिळतात, परंतु योगादिकांची निर्मळ फळे मह:, जन, तप, सत्य या चार लोकात मिळतात. माझे भक्तांस मात्र वैकुंठ लोक मिळतो. ॥१३-१४॥
मीच कालरुपी परमेश्वर हे चौदा भुवनाचे विश्व उत्पन्न करुन त्या त्या विशिष्ट भुवनांची प्राप्ति त्या त्या विशिष्ट कर्माने व्हावी असे ठरवितो.याप्रमाणे गुणांचा प्रवाह असणार्‍या या संसारात जीव केव्हा वर , केव्हा खाली जातात. अणु, ब्रह्म, कृश, स्थूल अशा रीतीने जे जे पदार्थ निर्माण होतात, त्या सर्वांत प्रकृति आणि पुरुष यांचा संयोग असतो. ॥१५-१६॥
या विश्वाच्या कार्यांत जे आदि व अंती असते ते मध्ये असते व तेच सत्य असते. पदार्थांच्या उत्पत्तीपासून नाशापर्यंत जे विकार, रुपांतरे होतात, त्यांनीच व्यवहार चालतो. सुवर्णाचे व पृत्तिकेचे विकारच व्यवहारोपयोगी असतात. ॥१७॥
प्रकृतीचे उपादान करुन जे महतत्त्वादि निमित्त कारण ते अपर म्हणजे  अहंकाररुपी कार्य प्रकृतीपासून उत्पन्न करते, व जे कार्याच्या पूर्वी व नंतर असते त्याला व्यवहारात सत्य म्हणतात.॥१८॥
त्या सत्याचे (१) प्रकृति हे उपादान कारण आणि (२)परम पुरुष हा त्याचा आधार आहे. (३) काल हा गुणांचा प्रकाशक आहे.प्रकृती , पुरुष व काल  हे त्रय ब्रह्मरुप म्हणजे असणारा मीच आहे.  ॥१९॥
जोपर्यंत  मी ईक्षण करतो, विचार करतो, तोपर्यंत मात्र कार्यकारणस्वरुपी जगड्‍व्याळ संसार अखंड असतो. देही जीवाच्या उपभोगाप्रीत्यर्थ हा संसार, मी स्थितीचा शेवट करीपर्यंत चालत राहतो. ॥२०॥
जीव जगतांचे जन्म - स्थिति-लय- चालविणार्‍या विराटाला मीच व्यापलेले आहे. प्रलयकाल आला म्हणजे  सर्व चौदा भुवनांसकट तो पंचत्वरुप विभागाला योग्य होतो, म्हणजेच नष्ट होतो. ॥२१॥
प्रलयकाली जीवाचे शरीर अन्नामध्ये, अन्न धान्यबीजामध्ये, बीजे पृथ्वीमध्ये व पृथ्वी गंधामध्ये याप्रमाणे प्रत्येक वस्तु उपादन कारणात जाऊन राहते. ॥२२॥
तसेच गंध जलात, जले रसात, रस तेजात, तेज रुपात, रुप वायूत, वायू स्पर्शात. स्पर्श आकाशात, आकाश शब्दात आणि इंद्रिये कारणात लीन होतात. ॥२३-२४॥
उध्दवा ! तसेच इंद्रियांच्या- प्रवर्तक देवतांचासर्वकार्य- समर्थ असणारे जे मन, त्यामनामध्ये लय होतो. शब्द- तन्मात्रा अहंकारामध्ये व प्रभावशाली अहंकार महत्तत्त्वामध्ये लय पावतो. तसेच, गुणोत्कृष्ट महतत्त्व सूक्ष्मस्वरुपामध्ये, गुण अव्यक्त अशा मूलप्रकृतीमध्ये, मूलप्रकृती अव्यय जो काल त्यामध्ये, आणि तो काल सगुण ब्रह्मात, आणि शबल ब्रह्म अजन्मा जो आत्मा, त्या ‘मी’ मध्ये लीन होते. आणि सर्वांच्या जन्ममृत्यूचे अधिष्ठान असणारा निर्गुण आत्मा अखंड स्वस्वरुपात असतो. ॥२५-२७॥
विचारपूर्वक चिंतन करणार्‍या सुविचारी मनात भेदाची भ्रांती उत्पन्न होतच नाही. व झालीच तर आकाशांत सूर्योदय झाला असता जसा अंधार टिकत नाहीं तशी ती टिकत नाही. ॥२८॥
याप्रमाणे प्रपंचामधील अभ्युदयाची व परमार्थांतील नि:श्रेयसाची दृष्टी ठेऊन मी अनुलोम- प्रतिलोम पध्दतीने तुला सकल संशयांचा उच्छेद करणारे हे साग्र सांख्यदर्शक स्पष्ट सांगितले. ॥२९॥
अध्याय सतरावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP