उध्दव म्हणतो, कमलनयना वासुदेवा ! तूच वेद प्रकट करुन त्या तुझ्या वेदांत विधी आणि निषेध म्हणजे अमुक कर्म निषिध्द आहे असे प्रतिषेध सांगितले आहेस ना? तात्पर्य, देवा ! कर्मांचे, कर्तव्याकर्तव्यांचे गुण (चांगलेपणा) व दोष (वाईटपणा) याचे तूच निरुपण केलेस. ॥१॥
प्रतिलोमामुळे म्हणजे श्रेष्ठवर्णातील स्त्रीचा कनिष्ठवर्णी पुरुषाशी विवाह होऊन संतती झाली अथवा अनुलोमामुळे म्हणजे श्रेष्ठवर्णी पुरुषाचा कनिष्ठवर्णी स्त्रीशी विवाह होऊन संतती झाली असता वर्णाश्रमांमध्ये निंद्य भेद उत्पन्न होतात, वर्णसंस्कार होतो. स्वर्ग चांगला, नरक वाईट , हे तुझेच तारतम्य ना? ॥२॥
विधिनिषेध सांगणारे तुझेच वेद विधिनिषेधांची दृष्टी ठेवल्याशिवाय समजणार कसे व ही दृष्टी ठेवलीच नाही, तर वेदात , सामंजस्य येणार कसे? आणि त्यांचा विवेक करता आला नाही तर प्राणिमात्रांचे कल्याण कसे होणार? ॥३॥
अदृश्य अशी पुण्यात्मक अथवा पापात्मक असणारी फले, त्यांची साध्ये व साधने ही आम्हास तर काय, पण प्रत्यक्ष पितरास व देवासही समजावून देण्यास एक तुझा गुणदोषद्रष्टा वेदच समर्थ साधन आहे. आणि गुणदोषज्ञान वर्ज्य करा असे म्हणतोस हे काय? एवंच, ही गुनदोषदृष्टी तुझ्या वेदाची आहे, आमची नव्हे. कृष्णा ! गुणदोषज्ञानाची प्रतिष्ठापना करणारा वेदच आमची गुणदोषदृष्टी कशी नाहीशी करु शकेल? तेव्हा भेद दृष्टी जी आहे ती भ्रमात्मकच आहे की काय हेही मला समजेना. ॥४-५॥
श्री भगवान् म्हणतात, उध्दवा ! जीवांचे कल्याणच करण्याच्या सदिच्छेने मी ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तियोग असे तीनच योग सांगितले आहेत. चवथा कोणताही उपाय नाही. ॥६॥
कर्मांचा व त्याच्या फलांचा वीट आल्यामुळे कर्म टाकून देणार्या जीवासाठीं मी ज्ञानयोग सांगिलता आहे. तसेच, जे सकामवृत्तीचे जीव कर्मातच आसक्त असतात, ज्यांना कर्मे व कर्मफले नकोशी झालेली नसतात, त्यांच्यासाठी कर्मयोग सांगितला आहे. ॥७॥
परंतु ज्या पुरुषाच्या चित्तांत माझ्या इच्छेने अथवा अन्य अज्ञात कारणाने माझ्या चरित्रात्मक कथांवर श्रध्दा उत्पन्न होऊन ती स्थिर होऊ लागली आहे, पण जे कर्माला पूर्णत: कंटाळले नाहीत किंवा कर्मांमध्येच फारसे आसक्त नसतात त्यांच्या कल्याणासाठी सर्व मन कामना पूर्ण करणारा भक्तियोग सांगितला आहे. ॥८॥
उध्दवा ! जोपर्यंत कर्मापासून चित्त पराड्मुख झालेले नसत, अथवा माझ्या कथांचे श्रवणमननच करावे अशी श्रध्दा उत्पन्न झाली नसते तोपर्यंत त्या त्या पुरुषाने विहित कर्मांचे आचरण करणे हेच इष्ट आहे. ॥९॥
उध्दवा ! जो निष्काम पुरुष स्ववर्णाश्रमधर्माने सांगितलेली कर्तव्ये करुन यज्ञव्दारा माझे यजन करतो, तो जर विहित आचरणाचे उल्लंघन आणि अविहित आचरण करणारा नसेल , तो स्वर्गालाही जात नाही; व म्हणून नरकालाही जात नाही. ॥१०॥
या जगांत राहून जो स्ववर्णाश्रमांची स्वकर्तव्ये करतो, जो निष्पाप व शुध्दचित्त आहे, त्याला तदिच्छेनुसार शुध्द ज्ञान प्राप्त होते; किंवा माझ्या भक्तीचा तरी त्याला लाभ होतो. ॥११॥
उध्दवा ! नरकवासी लोक, स्वर्गवासी लोक म्हणजे देव, हे सुध्दा भूलोकी जन्म व्हावा, अशी इच्छा करीत असतात. ज्ञान अथवा भक्ति (किंवा दोन्ही) यांचा इच्छेनुसार लाभ ह्याच भूलोकी होतो. हा लाभ स्वर्गस्थ दैवी शरीराला व नरकस्थ शरीराला होत नाही. ॥१२॥
असो: उध्दवा ! बुध्दीवंत पुरुषाने नरकलोकाची इच्छा करु नये, पण स्वर्गाची सुध्दा इच्छा करु नये.फार काय? पण ज्ञानभक्तिसाधकाने मनुष्यालोक प्राप्त व्हावा अशी सुध्दा इच्छा करु नये. कारण , मनुष्यदेह प्राप्त झाल्यास तो तो जीव प्रमाद करण्याची शक्यता असते. ॥१३॥
हे सर्व मानवी देहाचे कर्तृत्व ज्याला सकारण ठाऊक आहे, त्याने मृत्युची गांठ पडण्यापूर्वीच पुन: जन्म येणार नाही असा प्रयत्न ज्ञानव्दारा वा भक्तिव्दारा सावधपणे करावा. यद्यपि मानवदेहच मोक्ष मिळवून देण्याला समर्थ असला तरी तो देह मर्त्य आहे, केव्हा तरी त्याची सोबत तुटणारी आहे हे त्यान ध्यानात ठेवावे. ॥१४॥
उदाहरण, ज्या झाडावर आपण आपले घरटे बांधले आहे, ते झाड यमतुल्य अरण्यवासी तोडीत आहेत, असे पाहतांच झाडावर आसक्ती न ठेवता पक्षी आपले घरटे सोडतो आणि निर्भय स्थानी जाऊन राहतो. ॥१५॥
त्याचप्रमाणे निष्कारण असणार्या दिवस-रात्रि आपल्या आयुष्याच्या दोर्या प्रतिक्षणी तोडीत आहेत, हे लक्षांत घेऊन मृत्युभयाने कंपित होणार्या पुरुषाने देहादिकांवरील आसक्ती सोडून तो शांत व स्वस्थ होतो. ॥१६॥
उध्दवा ! ही नरदेहनौका म्हणजे एक सर्वश्रेष्ठ यदृच्छेने प्राप्त झालेली, दीर्घ प्रयत्न केला तरी न मिळणारी, तारणार्या सर्व अवजारांनी सज्ज असलेली, सद्रुरुरुपी उत्तम नाखव्याने वल्हविलेली आणि परमेश्वरानुग्रहरुपी अनुकूल वारा साह्य करीत असलेली उत्तमोत्तम नौका होय. ही प्राप्त झाली असताही जो पुरुष भवसागर तरुन जाण्याची दृढ इच्छा करीत नाही, तो खरोखर आत्मवैरी होय. ॥१७॥
ज्यावेळी कर्माचा कंटाळा व वीट येतो व त्यामुळे कर्मवैराग्य उत्पन्न होते, त्यावेळी इंद्रियनिग्रह करावा आणि अभ्यास करुन मनाला निश्चल करण्याचा प्रयत्न करावा व ते सफल करावे. ॥१८॥
मनाची प्रयत्नाने धारणा करीत असताही ते चांचल्य मन लवकरच भटकू लागते. तेव्हा निरलसपणे व सावधपणे त्या मनाला आवडणार्या विषयावर स्थिर करावे ( व तेथे लक्ष ठेवावे.) नंतर हळू हळू त्या मनाला जीवाने स्ववश करुन आत्मपदी स्थिर करण्याचा उद्योग निष्ठेने करावा. ॥१९॥
हे मनाला एकटेच कधी भटकू देऊ नये. त्याजवर सारखी दृष्टी ठेवावी आणि आपण स्वत: प्राणवायूला व इंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवावे. नंतर आपली बुध्दी सत्त्वसंपन्न करुन (सत्त्वगुणांनी सबल करुन) त्याला (मनाला) आत्मवश करावे. ॥२०॥
मनाला स्वाधीन करुन घेऊन त्याचा संग्रह करण्याचा हा योग अति महत्त्वाचा आहे असे मानले जाते. पहा की, एखाद्या चपळ घोडयाला वश करावयाचे असेल तर चतुर चाबुकस्वार त्या वारुच्या अंत:करणाला कल पाहून त्याच्या कला प्रमाणेच वागवितो, व याप्रमाणे त्या वारुचा विश्वास संपादून शेवटी त्याला आत्मवश करतो. ॥२१॥
याप्रमाणे योगाभ्यासव्दारा मनाला कांहीसे वळविल्यावर याला सांख्यदर्शनाचे म्हणजे सदसव्दिवेचक ज्ञानाचे खाद्य द्यावे. प्रकृतीशी, मूळकारणाशी आरंभ करुन देहापर्यंतच्या सर्व कार्यांचा कार्यकारणाच्या अन्वयाने जन्म कसा होतो आणि देहासारख्या अंतिम कार्यापासून आरंभ करुन मूळकारण जी प्रकृती तेथपर्यंत उलट मार्गांने -कार्यांतून कारणात प्रवेश करणार्या मार्गाने कार्याचा लय कारणात कसा होतो, हे पहावे, या जन्ममरणरुपी भावांचे चिंतन करु लागले म्हणजे मन हळु हळू निवळू लागते. ॥२२॥
याप्रमाणे निर्विष्ण, विरक्त आणि गुरुपदेशानुसार ज्ञान झालेल्या पुरुषाच्या मनाला केलेल्याचेच पुन: पुन: चिंतन करण्याची आवड उत्पन्न होते. ॥२३॥
यमनियमांचे प्रणयन करणारा योगमार्ग, जड व अजडांचा विवेक करुन त्यांची शुध्दी करणारी आन्वीक्षिका विद्या किंवा माझी उपासना हीच साधने घेऊन मन योग्याचे स्मरण करते . योग , आन्वीक्षिकी व उपासना ह्या तीन साधनांनी मात्र परमात्म्याचे अनुसंधान राखणे शक्य आहे. ॥२४॥
मार्गभ्रष्ट होऊन योगी ज्ञान्याने निंद्य आचरण एखादे वेळी केलेच, तर त्या योग्याला प्रायश्चित देण्याला ज्ञान किंवा भक्ती हीच समर्थ असतात. ॥२५॥
स्ववर्णाश्रमानुसार कर्तव्ये करण्याचा जो अधिकार तद्व्दारा आपली विहित कर्तव्ये करणे हा परम उपकारक गुण होय. वस्तुत: कोणतेही कर्म असो, ते स्वभावत: अशुध्दच आहे. तेव्हा जीवांनी कर्मासक्तीचा त्याग करावा ही सदिच्छा धारण करुनच गुणदोषांची विधाने केली आहेत, म्हणजे गुणदोष सांगून कर्मांचा संकोच केला आहे. या संकोचरुपी स्वधर्माचरणानेच पापांची निवृत्ती होत असते, म्हणून दुसर्या प्रायश्चित्तांची अपेक्षाच नाही. (येथे ज्ञानयोग संपविला). ॥२६॥
माझ्या, सगुणस्वरुपी जो मी त्याच्या कथांवर श्रध्दा बसू लागली म्हणजे इतर कर्मांविषयी वैराग्य उत्पन्न होते. तो भक्त इतर कर्मे टाकतो. परंतु कामना तेथून सर्व दु:खात्मक असे ठाऊक असूनही त्याला त्या टाकण्याचे सामर्थ्य प्रथमत: असत नाही. ॥२७॥
म्हणून त्या भक्ताने श्रध्दापूर्वक, दृढ , निश्चयपूर्वक आणि प्रेमपूर्वक माझे भजन करु लागावे. आणि त्या त्या वासनांचा उपयोग घेत असतानाच, त्या सर्व निंद्य आहेत, त्याज्य आहेत, दु:खमूलक आहेत, अशा मनापासून निंदा करावी. ॥२८॥
उध्दवा ! मी तुला पूर्वी जो उत्तम भक्तियोग सांगितला आहे, त्या भक्तियोग मार्गाने माझे अखंड भजन करावे. हे तेथे कामांचे, वासनांचे, विषयाभिलाषाचे नाव उरत नाही, कारण त्या भक्ताच्या हृदयात मी परमात्मा राहू लागतो. ॥२९॥
निखिल जीवांचा आत्मा जो मी त्या माझे ऐकांतिक भक्तियोगाने साक्षात् अपरोक्ष दर्शन झाले की हृदयाची ग्रंथी तुटते, सर्व संशय फिटतात. सर्व संचिते सुटतात. ॥३०॥
म्हणून माझी अनन्यभक्ती करणार्या व माझेच चिंतन करणार्या मद्भक्तियोग्याला ज्ञानाचा किंवा वैराग्याचा उपयोग येथे होण्याचा फारसा संभवच नाही. ॥३१॥
जे कर्मांनी साध्य असते, जे तपाने, ज्ञानाने, वैराग्याने, योगाने, दानाने किंवा अन्य कल्याणवह उपायांनीच मिळणे शक्य असते. ॥३२॥
ते सर्वच्या सर्व माझा भक्त भक्तियोगव्दारा अनायासाने मिळवितो. फार काय, पण स्वर्ग, मोक्ष अथवा प्रत्यक्ष वैकुंठ सुध्दा त्याला हवासा वाटला तर तो त्यास मिळतो. ॥३३॥
अरे ! जे साधू निष्काम असतात, धैर्यधर असतात, माझे एकनिष्ठ भक्त असतात, त्यांना मुळीच कसलीही इच्छा़च नसते. मी त्यांना कैवल्यरुपी मोक्ष दिला, जन्ममरणशून्यता दिली, तरी त्यांना ती नकोच असते. ॥३४॥
ही त्यांची निष्कल निरपेक्षता (काही नको असणेपणा) हेच परम श्रेष्ठ नि:श्रेयस् , हेच अती महत्त्वाचे फल आहे. म्हणून निरपेक्ष भक्ताची भक्ती हीच निरपेक्ष अशा मला अत्यंत प्रिय आहे. ॥३५॥
उध्दवा ! माझे जे अनन्य भक्त असून साधुवृत्तीचे, समत्वाची दृष्टी ठेवणारे व बुध्दीच्या पलीकडचा अशा मला ते प्राप्त होतात. त्यांना विधिनिषेधांपासून (विधि हा गुण व निषेध हा दोष) उत्पन्न होणार्या पुण्यापापांचा स्पर्शच नसतो. तुला ‘गुणदोषदृष्टिक’ असणे हा दोष व ती दृष्टि टाकणे हा गुण’ हे जे मी सांगितले, ते हेच होय. ॥३६॥
असो; मी आतांपर्यंत जो मार्ग दाखविला , तद्नुसार एकनिष्ठेने जे माझे भक्त वर्तन करतात, त्यांना अत्यंत निर्भय असे जे माझे स्थान वैकुंठ, ते नि:संशय प्राप्त होते. माझ्या स्थानास या वैकुंठालाच ‘परब्रह्म’ असे म्हणतात. ॥३७॥
अध्याय चौदावा समाप्त.