उध्दवगीता - अध्याय एकविसावा

उध्दवगीता

उध्दवा म्हणाला , अच्युता ! ही जी योगप्रक्रिया सांगितलीस ती आत्मज्ञान नसणार्‍या पुरुषाला साधणे भारी कठिण आहे ,असे मला वाटते. म्हणून कोणत्याही पुरुषाला सहज साधेल असा तुझ्या प्राप्तीचा उपाय मलाही सहज समजेल असा सांग. ॥१॥
पुंडरीकाक्षा ! अनेक योगी मनाचा आत्म्याशी योग करण्यासाठी मनोनिग्रह करण्याचा प्रयत्न करतात. परंतु बहुधा ते निष्फल होतात. कारण, मनाला शांती देणारा मनोनिग्रह करणे फारच श्रमाचे काम आहे. हे श्रम न झाल्यामुळे हे क्लेशभागी योगी खिन्नच होतात. ॥२॥
म्हणून हे कमलाक्षा ! शक्याशक्यतेचा विवेकपूर्वक विचार करणारे तुझे हंसरुपी भक्त तुझ्या शुध्दानंद स्रवणार्‍या पादकमलाचा आश्रय करतात. हा आश्रय त्यांना निरायासाने, सुखाने साध्य होतो. परंतु योगकर्मांच्या अभिमानाने उध्दत झालेले मानी लोक तुझ्या पादकमलाचा आश्रय करीतच नाहीत. कारण ते तुझ्याच मायेने विहत म्हणजे जिंकलेले असतात. ॥३॥
हे विश्वहितकरा अच्युता ! तुला अनन्य भावाने भजणार्‍या तुझ्या दासांचाही दास तू होतोस व त्यास कृतार्थ करतोस यांत काय नवल आहे ? देवा ! ब्रह्मदेवादी महासंपन्न देवदेवतांची मुकुटमंडित शिरे तुझ्या पायी रुळत असताही तू रामावतारी वानरांसारख्या क्षुद्र प्राण्यांचेही सख्य पत्करुन त्यांची सेवा केलीस. ॥४॥
सर्व जीवांचे व जडांचे नियंत्रण करणारा, भक्तांना अत्यंत प्रियै असणारा आणि सर्व पुरुषार्थाची प्राप्ती करुन देणारा तू आहेस. तू देवा ! तुझ्या उपकारांनी बध्द झालेला कोणता बरे भक्त तुझा त्याग करील? देवा !  कोणताही तुझा जाणता भक्त केवळ सांसारिक विषयप्राप्ति व्हावी, आणि तुझे विस्मरण व्हावे म्हणून तुझी भक्ती करीत नाही. कारण त्याला ठाऊक असते की, तुझी अनन्य भक्ती करणार्‍या भक्तांचे सर्व आत्मिक पुरुषार्थ साध्य होतातच. ॥५॥
देवा ! ब्रह्मदेवाचे तुझ्या ज्ञानी भक्तांस, तुझ्या अनुग्रहाने नित्य वाढणारा आनंद उपभोगणार्‍या व त्या उभयतांचे स्मरण असणार्‍या तुझ्या भक्तांस, तुझ्या अनंत उपकारांच्या कर्जांतून कधीच मुक्त होता येत नाही. देवा ! तुझे उपकार किती म्हणून स्मरावे ? गुरुच्या स्वरुपाने उभा राहून आमच्या ज्या बाह्यविषयक वासना त्यांचा तू नाश करतोस, आणि देवा ! गुरुरुपाने व चैत्यरुपाने आमचे आत्मरुप आम्हास प्रत्यक्ष स्पष्ट करतोस. ॥६॥
श्रीशुक म्हणाले, परम प्रेमळ दास उध्दव याची विनंती ऐकून आपल्या सत्त्वादिगुणमंडित मायेच्या साहाय्याने ब्रह्मा, विष्णु व रुद्र या तीन रुपांनी जगाची उत्पत्ती, स्थिती व लय असे खेळ खेळणारा तो देवदेवेश्वर श्रीकृष्ण प्रेमयुक्त गोड हास्य करुन बोलू लागला. ॥७॥
श्रीभगवान्‍ म्हणाले, उत्तम प्रश्न विचारलास, उध्दवा ! आतां तुला मला प्रिय असणारे धर्म सांगतो की ज्याचे पालन केले असता अजिंक्य मृत्यूवरही मर्त्य मनुष्याला जय मिळतो. ॥८॥
सावधान चित्ताने माझे स्मरण ठेऊन केवळ माझ्या ठिकाणी मन आणि चित्त यांचे आधान करुन आणि माझ्या भागवतधर्मविहित सर्व कर्तव्ये माझ्या प्रीत्यर्थ मात्र करावी. ॥९॥
माझ्या साधु भक्तांनी जे प्रदेश आपल्या वास्तव्याने पवित्र केले असतील ते पुण्य प्रदेश पहावे, तेथे यात्रा कराव्या. तसेच, देवादिकांमध्ये जे भक्त झाले त्यांचीच कर्मे आपण करावी. ॥१०॥
एकटयानेच अथवा अनेकांनी एकत्र जमून गायन-नर्तनप्रभृतींसह सर्व योग्य महाराजोपचारांनी प्रतिपर्वणीला, यात्राप्रसंगी, जन्मोत्सवाचे वेळी माझ्या प्रीत्यर्थ यथाशक्ति महापूजा करावी. ॥११॥
स्फटिकासारखे स्वच्छ चित्त असलेल्या माझ्या भक्ताने सर्व भूतांचा आंतबाहेर मीच स्पष्टरुपाने ओतप्रोत भरलेला आहे व व्यक्तीच्या अंतरंगामध्ये मीच आत्मस्वरुपाने स्पष्ट वास्तव्य करतो आहे असे पाहावे. आकाश जसे नि:संग तसा मी नि:संग आहे, हे मात्र विसरु नये. ॥१२॥
उध्दवा ! याप्रकारे मद्भक्ताने ज्ञानदृष्टीचा अवलंब केला म्हणजे सर्व भूते मत्स्वरुपात आहेत असे तो मानू लागतो व सर्वांचा सारखा सत्कार करतो. ॥१३॥
ब्राह्मण व अन्त्यज, साव व चोर, गुणी व गुणशून्य , दयाळू व दुष्ट या सर्वांचे ठिकाणी जो समदृष्टि ठेवणारा तोच ब्रह्मवेत्ता, ज्ञानी उत्तम भक्त होय. ॥१४॥
प्रत्येक मानवी जीवात माझे स्वरुपाची भावना कायमची ठेवता येऊ लागली म्हणजे लवकरच माझ्या भक्ताचे स्पर्धा, मत्सर, तिरस्कारबुध्दि हे विकार अहंकारासकट नष्टच होतात. ॥१५॥
आपले स्वकीय थटटा करता तिकडे व आपल्या स्वत:च्या दृष्टीची लाज असते, तिच्याकडे लक्ष न देता श्वान, चांडाल, गाय, खर=गाढव, कोणीही दिसो त्याला भूमीवर साष्टांग नमस्कार घालाव. ॥१६॥
याप्रमाणे सर्वत्र ईश्वर आहे ही भावना जोवर उत्पन्न होत नाही, तोवर वाचा, मन आणि शरीर यांच्या व्दारा वरील उपासना अखंड चालवावी. ॥१७॥
सर्वत्र आत्मा भरलेला आहे, अशी मनोभावना दृढ झाली म्हणजे माझ्या भक्ताच्या दृष्टीलाही परमेश्वर दिसतो. तो सर्वथा नि:संशय झाला म्हणजे तो कर्मांच्या पलीकडे गेला असे समजावे. ॥१८॥
मनात, बोलण्यात व कृतीत सर्वत्र परमेश्वरी रुपाची भावना करणे हेच सर्व मोक्षसाधनात अत्यंत उत्तम साधन होय, असा माझा निश्चयात्मक सिध्दांत आहे. ॥१९॥
उध्दवा ! निर्गुणस्वरुपी जो मी त्या माझ्या व्यवस्थित निश्चयाने हा निष्काम धर्म स्थापन केला आहे म्हणून उपक्रम- नाशप्रभृती इवलासा सुध्दा दोष यात नाही. ॥२०॥
भक्तोत्तमा उध्दवा ! भयप्रभृती कोणतेही अर्थशून्य कर्म असो, ते जर मला निष्काम बुध्दीने अर्पण केले तर तोही उत्तम धर्म होतो. ॥२१॥
ह्या असत्य म्हणजे मायामय आणि मर्त्य देहांतच ह्या लोकी सत्यरुप व अमृतरुप जे ब्रह्म त्याची प्राप्ती करुन घेणे हीच बुध्दिवंतांच्या बुध्दीची म्हणजे विवेकाची व चतुर पुरुषाच्या चातुर्याची खरी कामगिरी आहे. ॥२२॥
उध्दवा ! देवास अगम्य असणारे जे ब्रह्मज्ञान, त्याचा संक्षेपत: व विस्तरश: स्पष्ट व नि:संदिग्ध युक्तींनी अनेक प्रकारे अनेक दृष्टींनी मी तुला उपदेश केला आहे. हे ब्रह्मज्ञान झाले म्हणजे जीवाच्या सर्व शंका नष्ट होऊन तो मुक्त होतो. ॥२३-२४॥
तुझ्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन तुला हे जे ज्ञानाचे कांड उलगडून सांगितले, त्याचे जो अनुसंधान ठेवील त्याला ते परब्रह्म प्राप्त होईल. ॥२५॥
तसेच माझ्या भक्तांमध्ये जो या मत्प्रणीत ज्ञानाचा पुष्कळसा व समर्पक रीतीने प्रसार करील, त्या ब्रह्मज्ञानप्रसारकाला मीच आपले आत्मस्वरुप देईन. ॥२६॥
जो या परम मंगल व परम पवित्र भागवतधर्माचे नित्य पारायण करुन माझे देदीप्यमान ज्ञानरुप प्रकट करील, तो शुध्द, निर्मळ, निष्पापच होतो यात संशय नाही. ॥२७॥
तसेच जो पुरुष श्रध्दापूर्ण अंत:करणाने व एकाग्र मनाने नित्य या ज्ञानकथेचे श्रवण करील , तो या श्रवणानेच माझी पराभक्ती करतो असे होऊन त्याचे सर्व कर्मबंध तुटून जातील.॥२८॥
उध्दवा ! ही ज्ञानकथा तू नीट ऐकून अंत:करणांत साठविली आहेस ना? तुझ्या मनानेच उत्पन्न केलेले शोकमोह नाहीसे झाले ना? ॥२९॥
ध्यानांत ठेव की, हे ज्ञानरहस्य भोंदू, नास्तिक,वंचक, श्रवणाची इच्छा नसणारे, अभक्त आणि दुष्टशीलाचे लोक यास सांगावयाचे नाही. ॥३०॥
हे दोष ज्यांच्यात नसतील व जे वेदभक्त, प्रेमळ, सात्त्विक व पवित्र असतील त्यास आणि भक्ति करणार्‍या स्त्रियास व शुद्रास ही ज्ञानकथा अवश्य सांगावी. ॥३१॥
मी उपदेशिलेले ज्ञान समजले व उमजले म्हणजे कळून घेण्याचे असे काहीही शिल्लक उरतच नाही. मधुर अमृतपानानंतर पेय असे काहीच शिल्लक रहात नाही. ॥३२॥
व्यावहारिक ज्ञान, कर्म, योग (कर्मयोग), व्यापार, राजकारण यांनी जे जे अर्थ प्राप्त होतात, ते चारी पुरुषार्थ मद्रूपाने भक्तांस मिळतातच. ॥३३॥
सर्व कर्मे टाकून देऊन जो मर्त्य आपले सर्व काही जेव्हा मला अर्पण करितो, तेव्हा त्या मोक्षाची प्राप्ती सुलभ झालेल्या पुरुषाला मीच कल्याणाप्रद स्थिती देऊन शेवटी सायुज्य मुक्ती देतोच देतो. ॥३४॥
श्रीशुक्ताचार्य म्हणाले, याप्रमाणे आपल्यास मोक्षाचा योगमार्ग दाखविणार्‍या पुण्यश्लोक श्रीकृष्णाचें भाषण ऐकल्यावर उध्दवाने हात जोडले, कृतज्ञतेने त्याच्या डोळयांतून अश्रु गळू लागले, त्याचा कंठ दाटून आला व त्याच्या तोंडांतून शब्द बाहेर पडेना ! ॥३५॥
तथापि प्रेमाने क्षुब्ध झालेले ते आपले चित्त स्थिर करुन आपल्यास कृतकृत्य झालो असे मानणारा तो कृतज्ञ उध्दव, आपले दोन्ही हात व मस्तक कृष्णचरणकमलांवर ठेऊन बोलू लागला. ॥३६॥
उध्दव म्हणाला, आजपर्यंत ज्या मोहजन्य गाढ अज्ञानरुपी अंधकाराने माझा आश्रय केला होता, तो अज्ञानांधकार हे ब्रह्मदेवजनका ! तुझ्या समागमानेच आज नाहीसा झाला आहे. विभावसूच्या म्हणजे तेजस्वी अग्रीच्या आश्रयाला असणार्‍याला थंडीचे वा अंधाराचे किंवा भीतीचे भय कशाला वाटेल? ॥३७॥
देवा ! माझ्यावर दया करुन तू या दासाचा विज्ञानरुपी दीप आज पुन: प्रकाशित केलास. अशा रीतीने दासावर उपकार करणार्‍या तुझे पायाचा आश्रय सोडून कोणता कृतज्ञ दुसर्‍याच्या छायेखाली राहण्याची इच्छा करील बरे? ॥३८॥
सृष्टिव्यवहार अखंड चालावा म्हणून तू आपल्यामायेकरवी दाशार्हादि यादवकुलांसंबंधाने जो दृढ मायापाश माझ्या मनात पसरला होतास तो आज तुझ्या आत्मज्ञानाच्या तीक्ष्ण तरवारीनें पार तुटून गेला. ॥३९॥
योगेश्वरा कृष्णा ! तुला शतश: प्रणाम असोत ! देवा ! मी तुला शरण आलो आहे, आता कृपा करुन एक गोष्ट कर: ती ही की, तुझ्या चरण्पंकजाचे ठिकाणी माझी प्रीतिपूर्वक भक्ती अखंड राहील, असा उपाय मला सांग. ॥४०॥
श्रीभगवान्‍ म्हणाले, उध्दवा ! तू आताच माझा जो बद्रिकाश्रम आहे तेथे जा. तेथे माझ्या पायापासून निघालेली अलकनंदा नावांची गंगा आहे; त्या तीर्थांत स्नान कर, आणि आचमनपूर्वक संध्याकर्म करुन शुध्द हो. ॥४१॥
या अलकनंदेचे दर्शन होताक्षणी तुझ्या अंत:करणात पापमल असलाच तर तो धुऊन साफ जाईल. तेथे वल्कले परिधान कर, आणि नुसती रानातील फळे व कंदमुळे खात जा. ॥४२॥
शीतोष्णे, सुखदु:खे सहन कर, सात्त्विक ऐस, इंद्रिये स्वाधीन ठेव, शास्त्रीय ज्ञानपूर्वक अपरोक्षसाक्षात्कार करुन घे. त्यायोगे बुध्दीला स्थैर्य येऊन तुझी वृत्ती शांत, निर्विकारी होईल. ॥४३॥
मी जे जे तुला उपदेशिले आहे, त्याचे विचारपूर्वक मनन, निदिध्यासन कर; वाणी मन माझ्याठिकाणी स्थिर ठेव, व माझ्या भागवत धर्मांमध्येच सदोदित रममाण हो. असे केलेस म्हणजे या अभ्यासाने तू तीन गतींना पार करुन मत्स्वरुपाप्रत प्राप्त होशील. हा माझा तुला अमोघ आशीवार्द आहे. ॥४४॥
श्रीशुक म्हणाले, संसागविषयक बुध्दीचे हरण करणार्‍या हरीची आज्ञा ऐकल्यावर उध्दवाने त्याला प्रदक्षिणा घातल्या, पायांवर लोळण घेतली, आणि आपल्यास कृष्णपरमात्म्याचा वियोग होणार या दु:खाने तो व्याकुळ झाला. त्याने अश्रुरुपाने श्रीकृष्णाचे चरण भिजवून टाकले. ॥४५॥
पूज्य पुरुषोत्तमाच्य प्रेमळ व उध्दारक समागमाने उत्पन्न झालेला स्नेह संपणार, समागम तुटणार या दु:खाने व भीतीने विव्हल झालेला उध्दव स्वत:जाण्यास असमर्थ होतो, तरी आज्ञा म्हणून श्रीकृष्णापादुका मस्तकावर धारण करुन मोठया कष्टाने तो श्रीकृष्णाचा निरोप घेऊन निघाला ! ॥४६॥
उध्दवाने अंत:करणांत श्रीकृष्णमूर्ती अचल ठेवलीच होती. तो महाभागवत, जगव्दितकर कृष्णाने सांगितल्याप्रमाणे बद्रिकाश्रमी गेला; व तेथे त्याने ज्ञानपूर्वक दृढ भक्तीचा अभ्यास केला आणि शेवटी श्रीकृष्णाच्या धामाला गेला. ॥४७॥
राजा ! हे जे आनंदाने तुडुंब भरलेले आनंदरुप ज्ञानामृत, श्रीकृष्ण जो परमात्मा, ज्याचे चरणकमल मोठेमोठे योगेश्वर आराधितात, त्या भक्तवत्सल श्रीकृष्णाने महाभागवत उध्दवनिमित्ताने सर्व भगवद्भतांस सांगितले आहे. त्याचा श्रध्देने आस्वाद घेऊन त्यातचा रममाण होणारा कोणताही भागवत मुक्त होईल. त्याच्या सत्समागमांत असणारे लोकही मुक्त होतील. ॥४८॥
राजा ! आपल्या भक्तास येणारी संसारांतील दु:खे व भीती यांचा उपद्रव नाहीसा व्हावा म्हणून वेदवेदांताचा निर्माता जो भगवान्‍ त्याने वेदांचा प्राणच असणारे हे ज्ञानविज्ञानरुपी उपदेशामृत वेदसमुद्रातून भक्तांना पिण्यासाठी काढले आहे. आपल्या भृत्यरुपी देवांची सर्व दु:खे व भीती नष्ट करण्यासाठी ज्याप्रमाणे त्याने समुद्रमंथन करुन त्यातून अमृताचा कलश बाहेर काढला व देवास अमृत पाजले,तो आद्य पुरुष जो श्रीकृष्ण पुरुषोत्तम त्याला मी सर्व भावाने नमस्कार करितो. ॥४९॥
॥ अध्याय एकवीसावा समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 14, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP