श्रावण शुद्ध १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“पण मोंगलांस दमास आणूं !”
शके १६८५ च्या श्रावण शु. १ ला मराठयांच्या फौजेनें राक्षसभुवन येथें निजामास गांठून अकल्पितपणें त्याचा प्रचंड पराभव केला.
एरव्ही, निजामाशीं सख्य करणारा राघोबादादा तर त्याच्यावर फार संतप्त झाला होता. गोपिकाबाईला त्यानें लिहिलें “यवनाशीं सख्य करावयासी लिहिलें, तरी हे गोष्ट कदापि व्हावयाची नाहीं. दबून सलोखा केला तर तो वरसास बोकांडी बसेल. यास्तव लबाडी फिरो न करी असें शासन केलें पाहिजे. नाचण्यावर्यांची भाकरी खाऊम, पण मोंगलांस दमास आणूं” या निश्चयानें राघोबा जूनपासूनच तयारींत होता. पण कर्तबगार माधवराव पेशव्यांनीं मोठया मुत्सद्देगिरीनें राघोबाचा बेत लांबविला. पावसाळयांत मराठे सहसा स्वारीवर जात नसत. पण या वेळीं मात्र मुद्दाम गोदावरि नदीचें पाणी अपरंपार चढलेले असतांना निजाम हलके हलके सैन्य पार करीत असतांना कांहीं एक वार्ता न देतां अचानक मराठयांनीं शत्रूस गांठून त्याचा फन्ना उडविला. लढाईनंतर माधवराव पेशवे लिहितात - “निजामचें आमचें झुंज जालें. फार निकडीचें हत्यार जालें. त्याचा मोड झाला. आमची फत्ते झाली. विठ्ठल सुंदर याचें डोचकें कापून आणलें”
या राक्षसभुवनच्या लढाईचें महत्त्व फार आहे. पानिपतच्या संहारामुळें मराठी राज्य खिळखिळें झालें होतें. छत्रपति, नागपूरचे भोसले, प्रतिनिधि वगैरे सत्ताधीश पेशव्यांस मानीत नव्हते. निजाम याच संधीची वाट पाहत होता. पेशव्यांच्या घरांत भांडणें सुरु होतीं, कारभारी मंडळींत मतभेद होते. अशा या बिकट प्रसंगी माधवराव पेशव्यांनीं स्वत:च्या हिंमतीवर मराठेशाहीचें तारुं सांवरुन धरले. निजामाच्या पराभवामुळें मराठयांचा पुन: सर्वत्र वचक बसला; आणि माधवरावास पुढील प्रचंड उद्योगास अवश्य असणारें साहस, अनुभव आणि लष्करी शिक्षण मिळालें. याबद्दल रियासतकार सरदेसाई लिहितात - “या अवधींत आप्त, शत्रु, मित्र, आपले, परकीय, भिन्न भिन्न प्रकारच्या यशापयशाचे नमुने, जाळपोळीचे प्रकार, इतकें कांहीं माधवरावाच्या निदर्शनास आलें कीं, राज्य कसे हांकावें याची जणुं उत्कृष्ट शिकवणच त्यास या वेळीं प्राप्त झाली.”
- १० आँगस्ट १७६३
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP