श्रावण वद्य ५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
दिल्लीच्या तख्तावर घण !
शके १६८२ च्या श्रावण व. ५ या दिवशीं सदाशिवराव भाऊ यांनी दिल्ली जिंकली ! अहमदशहा अब्दाली यास नजीबखान व सुजा उद्दौला मिळाले आणि यमुनेच्या तीरावर जें युद्ध झालें त्यांत दत्ताजी शिंदे पडले. ही बातमी दक्षिणेंत येतांच बळवंतराव मेहेंदळे, समशेरबहादुर, दमाजी गायकवाड, इत्यादींना बरोबर घेऊन सदाशिवरावभाऊ दिल्लीच्या रोखानें निघाले. आणि श्रावण व. ५ रोजीं त्यांनीं दिल्ली जिंकली. दिल्ली हस्तगत झाल्यावर सदाशिवरावभाऊंना फारच आनंद झाला. मराठ्यांच्या वैभवाची आणि पराक्रमाची साक्ष अब्दालीस पटली ! श्रीवर्धनच्या एका पोरानें भगवा झेंडा पांचशें वर्षांच्या मुसलमानी राजधानीवर रोविला ! ...... आणि थोड्याच अवधींत भाऊसाहेबांनीं दिल्लीच्या राजतख्तावर घण घातला ! या भव्य, प्रचंड, अद्भुत घटनेनें सर्वांचे डोळे दिपून गेले. भाऊंच्या या कृत्यावर आक्षेप घेणारांना कै. शिवरामपंत परांजपे यांनीं उत्तर दिलें आहे. या घटनेंतील ‘राजकीय अर्थ’ त्यांनीं स्पष्ट केला आहे. ते लिहितात : "बंगाल, बिहार, ओरिसा, लाहोर, अयोध्या, गुजराथ, वर्हाड, विजापूर,गोवळकोंडा आणि दौलताबाद या सर्व ठिकाणच्या हिंदु प्रजेला जखडून टाकण्यासाठीं गुलामगिरीच्या शृंखला येथेंच घडविल्या जात होत्या. अखंड भारतांतील लोकांच्या अंत:करणाला चावून चावून रात्रीं झोंप येऊं न देणारे साप आणि विंचू याच वारूळांतून बाहेर पडत होते ! असें हें तख्त म्हणजे मोंगलाई सत्तेची मूर्तिमंत प्रतिमा होती ! तिच्यावर आघात करुन भाऊसाहेबांनीं महम्मद गिझनी, तैमूरलंग, नादिरशहा, अब्दाली, .......... अशी वाढत जाणारी माळ तोडून टाकली, आणि दिल्लीचें तख्त नव्हे तर हिंदुस्थानच्या गुलामगिरीचें डोकेंच फोडून टाकलें ! -" भाऊसाहेब पेशवे यांनीं केलेला हा पराक्रम त्यांच्या चरित्रांत अत्यंत अद्भुत असाच आहे. त्यांच्या या कृत्यानें सर्वत्र दरारा बसून मराठ्यांचें नांव उत्तरेंत दुमदुमूं लागलें.
- १ आँगस्ट १७६०
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP