श्रावण वद्य ३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
इंग्रज आणि शिंदे-भोसले !
शके १७२५ च्या श्रावण व. ३ रोजीं इंग्रज अधिकारी जनरल वेलस्ली यानें शिंदे व भोसले यांच्याविरुद्ध लढाई पुकारली. अठराव्या शतकाच्या अखेरीस मार्क्विस आँफ वेलस्ली हा हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल म्हणून आला तेव्हां राजकीय परिस्थिति मोठी गंभीर होती. हिंदुस्थानांत फ्रेंचांची सत्ता बळावत होतीच; परंतु युरोपमध्यें नेपोलियनचा उदय झाल्यामुळें इंग्रजांना फार धास्ती वाटत होती. इंग्रजांच्या विरुद्ध टिपूनें सर्व मुसलमानांचा एक संघ निर्माण केला होता. आणि मराठ्यांच्यामध्येंहि अशीच एकजुट निर्माण झालेली होती. पेशवे, शिंदे, गायकवाड, भोसले, वगैरे अनेकांच्या मदतीनें ‘मराठा काँन्फीडरसी’ निर्माण झाली होती. या बिकट परिस्थितींतून धूर्त इंग्रजांनीं वाट काढली आणि या सर्वांवर विजय मिळविला. निजाम आणि मराठे यांच्या साह्यानें इंग्रजांनीं टिपूचा पराभव केला आणि त्यांचे श्रीरंगपट्टणचें राज्य काबीज केलें, आणि त्यानंतर कांही कुरापत काढून निजामासहि हतवीर्य करुन त्याच्याजवळील फ्रेंच सैन्य घालवून दिलें. व आपली तैनाती फौज ठेवून दिली. आणि आतां इंग्रजांचें सारें लक्ष ‘मराठा काँन्फिडरसी’ कडे लागलें. मराठी राज्याचें दुर्दैव याच वेळीं आपली संधि साधीत होतें. यशवंतराव होळकरांच्या भीतीनें बाजीराव सिंहगडाहून महाडास आणि तेथून वसईस गेला. आणि त्यानें इंग्रजांशीं लाजिरवाणा तह केला ! बाजीराव इंग्रजी कृपेमुळें परत गादीवर येणार होता. त्याच्या पदरीं इंग्रजी तैनाती फौज राहणार होती, त्यामुळें बाजीराव इंग्रजांच्या हातचें बाहुलें बनला. या वेळीं पुण्याच्या दरबारीं महादजींचे दत्तक-पुत्र दौलतराव शिंदे यांचें वर्चस्व होतें. त्यांच्या पदरीं फ्रेंच फौज चांगलीच तयार झालेली होती. तेव्हां आतां शिंद्यांकडे लक्ष देणें इंग्रजांचें कर्तव्य होतें. सर्वत्र फंदफितुरी करुन इंग्रजांनीं मोठींच कृष्णकारस्थानें रचलीं. त्यांनीं बाजीरावास गादीवर बसविलें. आणि दौलतराव शिंदे यांचे अजिंक्य लष्कर आणि जय्यत तोफा यांचा नाश करण्यास ते प्रवृत्त झाले. त्याप्रमाणें जनरल वेलस्ली यानें श्रावण व. ३ रोजीं लढाई पुकारली.
- ६ आँगस्ट १८०३
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP