श्रावण वद्य ३०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


सेखोजी आंग्रे यांचें निधन !

शके १६५५ च्या श्रावण व. ३० रोजीं मराठ्यांच्या आरमारावरील प्रसिद्ध अधिकारी सेखोजी ऊर्फ जयसिंगराव आंग्रे यांचें निधन झालें. सेखोजी आंग्रे हे कान्होजीरावांचे चिरंजीव होत. हे मोठे राजनिष्ठ असून इमानी सेवक होते. हबशांचे प्राबल्य मोडून मराठी राज्याचा विस्तार करण्यासाठीं हे मनापासून झटत असत. "यांच्यांत भारदस्तपणा, शालीनता, कर्तृत्वाची आवड, व उत्तम धैर्य हे गुण विशेष होते. यांच्या वेळीं राजकोटच्या गाजीखानानें कोंकणांत लूट केली. त्याचें पारिपत्य यांनी व चिमाजी अप्पांनीच केलें. यांच्याच वेळीं कोंकणपट्टीवरील मुसलमानांचा अमल पूर्णपणें नाहींसा झाला." सन १७६३ मध्यें यांनीं सिद्दीपासून थळ व रावळी हे दोन किल्ले हस्तगत केल्यावर मुंबईकर इंग्रजांस मोठीच चिंता पडली. ‘रोझ’ नांवाच्या जहाजाचा पाडाव केल्यावरुन यांना इंग्रजाला दंड म्हणून ७,६०३ रुपये व जहाज परत करावें लागलें. दंडाराजपुरीवरील स्वारींत सेखोजी गुंतले असतांनाच त्यांना ताप येऊं लागला. त्यामुळें स्वारी सोडून ते कुलाब्यास परत आले. आणि तेथेंच "श्रावण व. ३०, आनंद संवत्सरीं सेखोजी आंगरे देवाज्ञा झाले." यांच्या आईस पेशव्यांनी लिहिलें -"पुत्रशोक न करतां विचारानें दु:खाचें परिमार्जन करावें आणि लोकांचीं समाधानें करावीं. - " यावर बाईंनी उत्तर केलें. - "ईश्वराच्या इच्छेनें जो प्रसंग त्या समयीं यावयाचा तोच येत आहे. भवितव्यता कधींहि टळणार नाहीं. .... दु:खाचें परिमार्जन करुन आमच्या घराण्यानें जो पूर्वापार लौकिक संपादला आहे त्याचें रक्षण करणें हाच माझा स्वधर्म आहे, असें मी समजतें; आणि स्वामी कार्यावर नजर देऊन तें सिद्धीस नेणें यांतच सर्व कृतार्थता आहे. मजला माझ्या पुत्रापेक्षां स्वामीकार्याच्या यश:सिद्धीचें महत्त्व अधिक वाटतें. पुत्रशोकांत गुंतून मी सरदारीचा लौकिक कधींहि गमावणार नाहीं -" सेखोजीची कामगिरी फारच मोठी आहे. हे स्वभावानें शांत असून सर्वांना ममतेनें वागविणारे होते.

- ऑगस्ट १७३४

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP