श्रावण शुद्ध १४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
खुदिराम बोस फांसावर !
शके १८३० च्या श्रावण शु. १४ रोजीं बाँब फेकून अत्याचार करणारे बंगाल्यांतील पहिले क्रान्तिकारक खुदिराम बोस यांना फांशी देण्यांत आलें. या काळांत भारतांत क्रान्तिकारकांचे पर्व सुरु झालें होतें. बंगाल्यांतील क्रांतिकारकांनीं बाँबचा उपयोग करण्याचें ठरविलें. आधीं कांहीं दिवस चंद्रनगरच्या मेयरच्या घरांत फेंकलेला बाँब प्राणघातक ठरलेला नव्हता. परंतु मुझफरपूर येथील डि० जज्ज सि. किंग्जफोर्ड यांच्या गाडीवर टाकण्यांत आलेला बाँब प्राणघातक ठरला व या नव्या साधनाकडे भारतीय क्रांतिकारकांचे लक्ष गेलें. रात्रीं साठेआठच्या सुमारास हा बाँब फेंकला. यामुळें मिसेस केनेडी व त्यांची मुलगी यांची हत्या झाली. बाँबचा स्फोट झाल्यानंतर त्याचा आवाज तीन मैलपर्यंत ऐकूं गेला. मुझफूरपासून चोवीस मैल अंतरावर असलेल्या खुदिराम बोस यांना अटक करण्यांत आली. या तरुणाचें वय त्या वेळीं अठरा-एकोणीस वर्षांचें होतें. बाँबस्फोटानंतर खुदिराम रातोरात चोवीस मैलांचे अंतर तोडून गेले होते. मुझफरपूर येथील प्रकारानंतर कलकत्ता येथील माणिकतोळा बागेंतील चौतीस तरुणांना अटक झाली. बारींद्रकुमार घोष, उपेंद्रनाथ बानर्जी, हेमचंद्रदास, इंदुभूषणराय चौधरी, अरविंद घोष, इत्यादि मंडळीं त्यांत होती. झडतींत एक ग्रंथालय सांपडलें. ज्वालाग्राही पदार्थ तयार करणार्या कृतींची अनेक पुस्तकें तेथें होतीं. खुदिराम बोस यांना झालेली फांशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून अनेक प्रयत्न झाले. पण यश आलें नाहीं. शेवटीं श्रावण शु. १४ रोजीं हा बंगाली तरुण धैर्यानें फांसावर चढला ! भारतांतील या क्रान्तीच्या घटनेमुळें सर्व जगांत खळबळ उडाली. ‘लंडन टाइम्स’ नें लिहिलें - "बाँब गोळे उडतात यामुळें भिऊन जाऊन सरकार भलत्याच सवलती व भलतेच अधिकार देणार नाहीं. सरहद्दीपाशीं शत्रु येऊन भिडला, आणि अराजक माजवूं पाहणार्यांनी देशांत कट केले तरी हिंदुस्थानभर राज्य करण्याचेम व हिंदुस्थानचा विकास करण्याचें महत्कार्य नेटानें पुढें चालविलें पाहिजे. -"
- ११ आँगस्ट १९०८
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP