श्रावण शुद्ध ९
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
ब्रह्मेंद्रस्वामींची समाधि !
शके १६६७ च्या श्रावण शु. ९ रोजीं शाहूमहाराज, बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीरावसाहेब, इत्यादि थोर राजपुरुषांचे गुरु ब्रह्मेंद्रस्वामी यांनीं समाधि घेतली.
सन १७०० ते १७४५ पर्यंतच्या पंचेचाळीस वर्षांत जेवढया राजकीय घडामोडी झाल्या तेवढयांत ब्रह्मेंद्रस्वामींचें थोडें तरी अंग होतें. आंग्रे, प्रतिनिधि, शाहू, बाजीराव, चिमाजीआप्पा आणि या सर्वांच्या राण्या ब्रह्मेंद्रस्वामींच्या भजनीं लागल्या होत्या. या राजे लोकांना भिक्षावृत्तीवर सधन होऊन सावकारी करणार्या ब्रह्मेंद्रस्वामींकडून कर्ज मिळत असे. दिल्लीकडील कारस्थानें, निजामाचें उच्चाटन, जंजिरा, वसई येथील मोहिमा अशा महत्वाच्या प्रसंगीं बाजीरावानें स्वामींचा सल्ला विचारला आहे.
ब्रह्मेंद्रस्वामी सामान्य साधूंपैकींच एक असून राष्ट्राची किंवा राजकारणाची व्यापक जाणीव त्यांना नव्हती. राजे - सरदारांचें हित चिंतून ते सधन झाले तरी त्यांत अप्पलपोटेपणा नसावा. मंदिरें बांधणें, विहिरी, तलाव, घाट, धर्मशाळा बांधणें, इत्यादि लोकोपयोगी कामें त्यांनीं केलीं. हीं सारीं पुण्यकर्म त्या वेळीं असत. तरी पण समग्र राष्ट्राचे शाश्वत कल्याण कशांत आहे याची जाणीव स्वामींना नसावी. पोर्तुगीझ, इंग्रज, हबशी यांचें कावे त्याना समजले नाहींत. राष्ट्राचें अकल्याण त्यांनीं जाणूनबुजून केलें नसलें तरी आप आपसांतील संशय व व्देष वाढत असतां अधिकारवाणीनें ते नाहीसें करणें ही गोष्ट स्वामींकडून झाली नाहीं. त्यांच्या सर्व पत्रांचा विषय बहुधा पैसा आणि कर्ज हाच असे. या स्वामीचें संस्थान ऐहिक ऐश्वर्यानें नटलेलें होतें तरी त्यांचें स्वत:चें आचरण निष्कलंक होतें. पैशाचा उपयोग वाईट मार्गाकडे केव्हांच झाला नाहीं.
शेवटच्या आयुष्यांत स्वामी धावडशी येथें राहत. सन १७४५ च्या श्रावणांत कृष्णातीरीं त्यांनीं वार्षिक समाधीचें अनुष्ठान चालविलें. नववे दिवशींच समाधि सोडून दर्भासनावर रामनामोच्चार करीत त्यांनीं शेवटची निद्रा केली.
- २६ जुलै १७४५
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP