श्रावण वद्य ७
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
श्रीकृष्णाचा जन्मदिवस !
श्रावण व. ७ हा दिवस कृष्णजयंतीचा म्हणून सर्व भरतखंडांत साजरा होत असतो. श्रीकृष्णाच्या सर्व जीविताप्रमाणें त्याच्या जन्माची हकीकतहि अलौकिक अशी आहे. मथुरेचा वसुदेव व त्याची पत्नी देवकी हे कंसाच्या कारावासांत दिवस काढीत होते. शूरसेन राजा कंस हा देवकीचा बंधु. परंतु याच देवकीच्या मुलाकडून कंसाचा वध होणार या नारदाच्या भविष्यामुळें कंस भयभीत झाला. देवकीचीं सहा अपत्यें एकामागून एक अशीं त्यानें नाहींशीं केलीं. देवकी आठव्या खेपेस गर्भवती असतांना श्रावण महिन्यांत वद्य सप्तमीस प्रसूत झाली. या खेपेस गर्भवती असतांना श्रावण महिन्यांत वद्य सप्तमीस प्रसूत झाली. या मुलास तरी वांचवावें म्हणून वसुदेवांने खटपट केली. बाहेर सोसाट्याचा पाऊस पडत असला तरी वसुदेव नूतन बालकाला घेऊन गाढ झोपेंत असलेल्या पहारेकर्यांना चुकवून कैदेमधून बाहेर पडला. यमुना नदी ओलांडून तो गोकुळांत नंदाच्या घरीं आल्यावर तेथें त्यानें बालकास ठेविलें. आणि नंदाच्या मुलीस घेऊन तो परत कारागृहीं आला. इकडे नंदगृहीं यशोदादेवीला पुत्र झाला म्हणून आनंदीआनंद झाला - !
भारतीय संस्कृतींत कृष्णचरित्राचा महिमा मोठा आहे. दुर्जनांचा नाश, साधूंचें संरक्षण आणि धर्माची संस्थापना हें कृष्णचरित्राचें सार आहे. गलितधैर्य अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठीं - ‘धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते, धर्मोचित युद्धाखेरीज क्षत्रियास श्रेयस्कर असें कांहीं नाहीं. -’ असा उपदेश श्रीकृष्णांनीं केला आहे. आणि स्वत: कंस, जरासंध, नरकासुर, शिशुपाल, इत्यादि दुष्ट राजांचा वध करुन कृष्णांनीं जनतेला सुखी केलें. कृष्णाच्या वेळीं भारतीय धर्मास ग्लानि येत होती; त्या दृष्टीनें श्रीकृष्णाचें धर्मस्थापनेचें कार्य विशेष महत्त्वाचें आहे. श्रीकृष्णासंबंधीच्या अद्भुत गोष्टी आणि विकृत कल्पना पुराणकालांत रुढ झाल्या तरी ऐतिहासिक दृष्टीनें पाहतां हेंच स्पष्ट होतें कीं - "कृष्ण हा मनुष्याप्रमाणें जन्मला, वाढला, जगला व निवर्तला. परंतु त्याच्या हस्तें घडलेल्या महान् कार्यावरुन त्याला देवत्व प्राप्त झालें -"
------------------
(२) काकासाहेब खाडिलकरांचे निधन !
शके १८७० च्या श्रावण व. ७ रोजीं सुप्रसिद्ध नाटककार, ‘नवाकाळ’ दैनिकाचे संस्थापक व माजी संपादक, लो० टिळकाचे सहकारी श्री. कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर याचें निधन झालें. काकासाहेबांचा जन्म शके १७९४ मध्यें सांगली येथें झाला. पुणें येथील फर्ग्युसन व डेक्कन काँलेजांतील शिक्षण संपल्यानंतर काकासाहेब देशभक्तीनें प्रेरित होऊन टिळकांच्या सूचनेवरुन ‘केसरी’ संस्थेंत उपसंपादक म्हणून काम पाहूं लागले. लोकमान्यांच्या सांगण्यावरुन खाडिलकर नेपाळमध्यें गेले. आणि तेथें ‘कौलांचा कारखाना’ काढून गुप्त राजकारण त्यांनीं रंगविलें. तेथून आल्यानंतर ‘केसरी’ तच प्रामुख्यानें ते काम पाहूं लागले. सन १८९७ च्या झालेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या वेळीं कृष्णाजीपंत खाडिलकरच मुख्य संपादक होते. पुढें टिळकांच्या मृत्यूनंतर सन १९२१ मध्यें त्यांनीं आपलें स्वत:चें असें ‘नवाकाळ’ दैनिक काढलें. तेंहि थोड्याच अवधींत लोकप्रिय झालें. या पत्रांतील राजकीय लेखांमुळें खाडिलकरांना सन १९२९ सालीं एक वर्षाची शिक्षाही भोगावी लागली. परंतु पुढें दोनतीन वर्षांत पत्राला स्थैर्य प्राप्त होतांच हे निवृत्तीच्या मार्गाला लागले. सांगली येथें दत्तमंदिर बांधून तत्त्वज्ञान व धर्म या विषयांत ते रंगून गेले. याखेरीज खाडिलकरांचीं मराठी नाटकें वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ‘कीचकवध’, ‘भाऊबंदकी’, ‘मानापमान,’ विद्याहरण,’ द्रौपदी’, ‘स्वयंवर’, इत्यादि त्यांची नाटकें एके काळीं रंगभूमीवर चांगलींच गाजलेंलीं होतीं. पौराणिक नाट्यकथेंतून प्रचलित राजकारणाचें रेखाटन अत्यंत प्रभावीपणानें खाडिलकरांची लेखणी करीत असे. काकासाहेबांना दोन वेळां नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळालेला असून सन १९३३ मध्यें नागपूर महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षहि झाले होते.
- २७ आँगस्ट १९४८
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP