श्रावण शुद्ध ४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
संभाजी राजांचा पराक्रम !
शके १६०४ च्या श्रावण श्रु. ४ रोजीं छत्रपति संभाजी राजे यांनीं मराठयांच्या प्रांतास उपद्रव देणारीं पोर्तुगीझांची जहाजें पकडलीं.
छत्रपतींच्या आसनावर संभाजी कायम झाल्यावर त्याला मुख्यत: जंजिर्याचे सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीझ आणि मोंगल बादशहा यांच्याशीं युध्द - प्रसंग करावे लागले. रायगड राजधानीच्या नजीकच सिद्दीचें स्थान होतें. ‘घरांत जैसा उंदीर, तैसा महाराजाचे राज्यास सिद्दी’ असल्यामुळें त्याचें पारिपत्य करण्याचें संभाजीनें प्रथम ठरविलें. परंतु या मोहिमेंत संभाजीला फारसें यश प्राप्त झालें नाहीं. कारण गोव्याचे पोर्तुगीझ सिद्दीला मदत करीत असत, तेव्हां पहिल्यानें पोर्तुगीझाचा मोड केल्याखेरीज इलाज नव्हता. म्हणून संभाजीनें आपला मोर्चा पोर्तुगीझांकडे वळविला. धार्मिक जुलूम करुन मराठयांचा व्यापार नष्ट करणें हे उद्योग पोर्तुगीझांचे सुरु होते. याच वेळीं शहाजादा अकबर बापाविरुध्द बंड करुन संभाजीच्या आश्रयास आला होता. आणि संभाजीविरुध्द मोंगलांना मदत करण्याचें काम पोर्तुगीझांनीं चालू ठेविलेंच होतें, त्यामुळें संभाजीचा रोष अधिकच वाढला. अकबराची बाजू संभाळून मोंगलांशीं लढा देण्यासाठीं संभाजीला पश्चिम किनारा आपल्या ताब्यांत ठेवणें इष्ट वाटलें. आणि त्याप्रमाणें संभाजीनें हुकूम केला कीं,कोणाचींहि लढाऊ किंवा व्यापारी जहाजें परवानगीशिवाय पश्चिम समुद्रांतून वावरुं नयेत. यामुळें अर्थातच पोर्तुगीझांच्या स्वातंत्र्यास बाध येऊन ते लढण्यास तयार झाले. परवानगीविना हिडणारीं जहाजें संभाजीनें पकडलीं; आणि थोडक्याच दिवसांत रायगडाजवळील चौल नांवाच्या पोर्तुगीझांच्या ठिकाणास संभाजीनें वेढा दिला. आणि दोघांचा उघड असा संग्राम सुरु झाला. चौलच्या वेढयास संभाजीस अपयश आलें तरी पुढील फोंडयाच्या वेढयांत मात्र तो विजयी झाला. या वेळीं संभाजीला अनेकांशीं निकराचीं युध्दें करावीं लागलीं. पोर्तुगीझांनीं सावंताला पुढें करुन संभाजीशीं पुन्हा युध्दाला सुरुवात केली. परंतु संभाजी डगमगला नाहीं.
- २८ जुलै १६८२
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP