श्रावण वद्य २
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
सुरेन्द्रनाथ बानर्जींचें निधन !
शके १८४७ च्या श्रावण व. २ रोजीं बंगालमधील सुप्रसिद्ध राजकारणीं पुरुष व विख्यात वक्ते सर सुरेन्द्रनाथ बानर्जी यांचें निधन झालें. आय्.सी.एस. होऊन भारतांत आल्यावर सिल्हटचे मॅजिस्ट्रेट व कलेक्टर म्हणून यांची नेमणूक झाली. पुढें सरकारी अधिकार्यांशीं खटका उडाला म्हणून हे नोकरींतून निवृत्त झाले. देशांतील अन्यायजनक परिस्थितीचा विचार करुन त्यांनीं कलकत्ता येथील ‘मेट्रोलिटन इन्स्टिट्य़ूट’ मध्यें इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम पत्करुन ते आपले विचार विद्यार्थ्यांपुढें मांडू लागले. स्टुडंट्स असोसिएशनतर्फे यांनी एक मोठा दौरा काढला. पुण्याच्या आणि अहमदाबादच्या राष्ट्रसभेंचे अध्यक्षस्थान यांनाच देण्यात आलें होतें. यांची लोकप्रियता बंगालच्या फाळणीच्या वेळीं खूपच वाढली. परंतु पुढें बंगालमधील तरुणांची वाढतीं अत्याचारी कृत्यें पाहून यांना आपली भाषा नरम करावी लागली. आणि शेवटीं सन १९०७ च्या येथील काँग्रेसमध्यें सुरेन्द्रनाथ टिळकविरोधी पक्षांत सामील झाले. सन १९१९ च्या गव्हर्नमेंट आँफ इंडिया अँक्टच्या जाँइंट पार्लमेंटरी कमिटीकरितां चार महिने हे इंग्लंडला जाऊन आले; आणि ‘असकारितेचा झाला कमिटीकरितां चार महिने हे इंग्लंडला जाऊन आले; आणि ‘असहकारितेचा झाला एवढा पुकारा पुरे झाला’ असें आपलें मत जाहीर केलें; व स्वत: असह्काराचे मोठे विरोधी बनले. सन १९२१ मध्यें १ जानेवारीस सरकारनें यांना ‘सर’ केलें आणि स्थानिक स्वराज्य व वैद्यकीय खातें याचे हे दिवाण बनले. डब्ल्यू. सी. बानर्जी यांच्यानंतर त्यांचें ‘बंगाली’ साप्ताहिक यांनीं ताब्यांत घेऊन तें दैनिकाच्या स्वरुपांत सतरा वर्षे चालविलें. यांचें वक्तृत्व इतकें परिणामकारक व भावनामय असे कीं, एखाद्या बंडाची उठावणी किंवा उपशम करणें हा यांच्या हातचा मळ असे. म्हणूनच आपल्या मित्रमंडळींत हे ‘सरेंडर नाँट’ (अपराजित) या नांवानें प्रसिद्ध होते. भाषेवरील प्रभुत्व, उच्च भावनांनीं नटलेलें कल्पनावैपुल्य, सुंदर भाषाशैली व मर्दानी आवेश या गुणांमुळें यांच्या भाषणांचे पडसाद सर्व जगांत उमटत. लाँर्ड मिंटो यांच्या कारकीर्दीत सभा उधळून लावतांना यांना लाठीचा प्रसाद मिळाला होता.
- ६ आँगस्ट १९२५
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP