पौष शुद्ध १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
राजाराम शास्त्री भागवत यांचे निधन !
शके १८२९ च्या पौष शु. १ रोजी महाराष्ट्रातील सुधारक व प्रसिद्ध नवविचार प्रवर्तक राजाराम शास्त्री भागवत यांचे निधन झाले. तीन वर्षे मेडीकल काँलेजांत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जुन्या शास्त्र्यांजवळ पांच - सहा वर्षे संस्कृतचें अध्ययन केले, त्यानंतर ते सेंट झेवियर काँलेजमध्यें संस्कृत शिकवू लागले. याच वेळी त्यांनी बाँम्बे हायस्कूल व मराठा हायस्कूल काढून तेथे बाविस वर्षे अध्यापन केलें. कर्ते समाजसुधारक म्हणून त्यांची ख्याति होती. वेदोक्त धर्माकडे त्यांचा ओढा असून जातिभेद व खाण्यापिण्याचे निर्बध यांविरुद्ध ते होते. मूलगामी व स्वतंत्र विचार त्या वेळी समाजाला न झेपल्यामुळे त्यांची काही काळ उपेक्षाच झाली. क्वचित प्रसंगी ते विक्षिप्तही ठरत. शब्दांच्या व्युत्पत्या व भाषाशास्त्रांतील नवे सिद्धांत यांच्या प्रतिपादनास मराठींत त्यांनीच सुरुवात केली. त्यांची ' विधवा-विवाह शास्त्र कीं अशास्त्र ? ', 'मराठ्यासंबंधी चार उद्घगार', ' ब्राम्हण व ब्राम्हणधर्म ' ' व्रात्यस्त्रोतम ' इत्यादि पुस्तकें प्रसिद्ध आहेत. राजाराम शास्त्री यांचा जन्म शके १७७३ मध्यें राजापूर तालुक्यात झाला. यांच्या घराण्याचें मूळचें नांव 'राऊत" असे होतें. कोणी एक पुरुष पेशव्यांकडे बारगीर असून तो चाबूकस्वार व अश्वविद्यानिपुण होता. म्हणून हें नाव यांच्या घराण्यास होते. पुढे राजाराम शास्त्री नांवारुपास येऊन त्यांची नेमणूक सेंट झेवियर काँलेजांत संस्कृतचे प्रोफ़ेसर म्हणून झाली. स्वत: पदवीधर नसतांना त्यांनी अंगच्या गुणांवर ही कामगिरी सुमारे ती वर्षे चांगल्या रीतीनें पार पाडली. सन १८८४ मध्यें 'बाँबे हायस्कूल ' नांवाची जी संस्था मुंबईस निघाली तिच्या संस्थापकांत राजाराम शास्त्री हे एक होते. शास्त्रीबोवांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी 'वार्ताहर ' नांवाचे एक मासिक कांही दिवस काढले होतें, भाषाशास्त्रावरहि शास्त्रीबोवांचे लिखाण अत्यंत महत्वाचे आहे. 'मराठ्यांविषयी चार शब्द ' यासारखे ऎतिहासिक लेखहि यांनी लिहिलेले आहेत.
- ४ जानेवारी १९०८
N/A
References : N/A
Last Updated : October 03, 2018
TOP