पौष वद्य १०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
श्रीशिवरायांचा वाढता प्रताप !
शके १५८१ च्या पौष व. १० रोजीं श्रीशिवराय यांनीं चालून आलेले आदिलशाहीचे सरदार रुस्तुमिजमान व फाजलखान यांचा पराभव केला. अफझलखानाच्या वधानंतर श्रीशिवरायांचें महत्त्व फारच वाढून बादशहाचा एक मोठाच डाव फसल्यासारखा झाला होता. आतां विजापूरकरांच्या ताब्यातील प्रांत व किल्ले सोडविणें हेंच एक ध्येय शिवाजीमहाराज्यांच्यासमोर होते. २८-११-१६५९ रोजीं मोठ्या युक्तीनें पन्हाळा किल्ला शिवाजीच्या हातांत आला. या समयीं कोल्हापूर प्रांतांत विजापूरच्या एका सुभ्याचे काम रुस्तुमिजमान नांवाचा सरदार पहात असे. त्याच्या प्रांतांतील पन्हाळा किल्ला फारच मजबूत होता. याशिवाय पावनगड, खेळणा, रांगणा, हे प्रसिद्ध किल्ले जिंकावेत अशी मनीषा शिवाजीची होती. अफजलखानाच्या वधानंतर अण्णाजी दत्तो यांच्या कडून पन्हाळा हस्तगत झाला. पावनगड, वसंतगड हेहि किल्ले मिळाले. तेव्हां शिवाजीचा बंदोबस्त करणें विजापूर दरबारला अत्यंत आवश्यक वाटलें. या कामगिरीवर रुस्तुमिजमान व फाजलखान यांची नेमणूक झाली. आदिलशाहीच्या हुकमावरुन या दोघांनीं फौज जमा केली व ते शिवाजीवर चालून आले. परंतु पौष व. १० रोजीं शिवाजीनें त्यांचा संपूर्ण मोड केला आणि कृष्णा नदीच्या पलीकडे त्यांना हांकून दिलें. व शिवराय स्वत: खंडण्या वसूल करीत करीत थेट विजापूरपर्य़ंत चालून गेले. त्यांना प्रतिकार करावा असें कोणासहि वाटलें नाहीं. त्यांचा पाठलाग करणेहि शत्रूंना अशक्य होऊन बसलें. रायबागसारखीं समृद्ध स्थळें शिवाजीच्या हातीं आलीं. आणि त्यानंतर नेताजीनें गदग लक्ष्मेश्वरपर्यंतचा मुलूख लुटला. याप्रमाणें बरीच लूट जमा करुन शिवाजी राजगडीं परत आला. शिवाजीचा हा पराक्रम पाहून आदिलशहा घाबरुनच गेला. रुस्तुमिजमान तर उघडपणें शिवाजीचा मित्र बनला होता. "आतां विजापूरचें राज्य संपून शिवाजीचें चालू होणार, त्याचा बाप शहाजी सतरा हजार फौज घेऊन कर्नाटकांतून त्याचे मदतीस येत आहे" अशी बातमी पाश्चात्य व्यापारी वरिष्ठांस कळवूं लागले.
- २८ डिसेंबर १६५९
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP